उन्हाळा आला की, विदर्भात चिवळीची आणि घोळीची भाजी दिसायला लागते. पुष्कळ लोक घोळीलाच चिवळ समजतात. परंतु विदर्भातील लोक या दोन भाज्यांमधील फरक अचूक ओळखतात. चिवळीची पाने एकदम बारीक आणि आकाराने तांदळाच्या दाण्यांएवढी असतात. याची देठे लालसर गुलाबी आणि एकदम गवताच्या काड्यांसारखी असतात. याची पाने मऊसर आणि पाण्याने भरलेली असल्याने स्पर्शाला एकदम नरम तसेच थंड असतात. त्यामुळे पूर्वी बऱ्याच गावांमध्ये जेव्हा कूलर, एसी नव्हते, त्या काळात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एका मोठ्या दुरडीत म्हणजे बांबूच्या टोपलीत ही चिवळ भाजी पसरवून घेत आणि त्यावर नरम सुती कापडाची किंवा साडी / पातळाची अथवा धोतराची चौघडी अंथरवून त्यावर लहान बाळांना ठेवत असत. कारण, ही भाजी मुळातच स्पर्शाला थंड असल्याने त्यावर त्या लहान बाळांना निजवले की, त्यांना गरमीचा त्रास होत नसे. याचसारखी घोळीची भाजी आहे. घोळीची पाने आकाराने मेथीच्या पानांसारखी गोलसर असतात आणि स्पर्शाला थंड आणि मऊ असतात. या भाजीचे देठ देखील थोडे जाडसर पण नरम आणि गुलाबी पांढरट रंगाचे असते. विशेष म्हणजे, या दोन्ही भाज्यांची लागवड करावी लागत नाही तर, या भाज्या शेतामध्ये आपोआप उगवतात आणि त्या गवतासारख्या पसरतात. यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.
पोटाला थंड आणि पौष्टिक असल्याने विदर्भातील लोक उन्हाळ्यात चिवळ आणि घोळ या भाज्यांचा आहारात जास्तीत जास्त वापर करतात. चिवळची भाजी सहसा कांदा आणि बेसन वापरून करतात, चिवळच्या भाजीचे मुटके देखील छान लागतात. घोळीची भाजी कैरीचा वापर करुन तुरीच्या वरणा सोबत आंबटगोड चवीची केली जाते. तसेच, कैरी टाकून या भाजीचा झुणका देखील छान होतो. या दिवसांत चिवळची भाजी, घोळीचे वरण किंवा झुणका, कैरी लोणचे आणि भाकरी, ठेचा किंवा लाल मिरच्यांची चटणी हे विशेष जेवण मानले जाते. मुंबई, पुणे या ठिकाणी चिवळ व घोळ या भाज्या मिळत नसल्याने तेथील लोकांना या भाज्यांचा परीचय बहुतेक नसावा आणि जरी तिकडे या भाज्या मिळत असल्या तरी यांचे प्रमाण कमी असावे असे वाटते. कदाचित या भाज्यांची पर्यायी नावे देखील वेगळी असू शकतात.
साहित्य
- चिवळी – पाव किलो
- बेसन – अर्धी वाटी
- कांदे – 2
- हिरव्या मिरच्या – 2,
- तिखट – दोन चमचे
- हळद – एक चमचा
- मोहरी – एक लहान चमचा
- जिरे – एक लहान चमचा
- हिंग – अर्धा चमचा
- मीठ – चवीनुसार
- तेल – एक पळीभर
- पाणी – अर्धी वाटी (किंवा गरजेनुसार)
हेही वाचा – Recipe : अतिशय स्वादिष्ट वांगे बुरानी!
कृती
- चाळणीमध्ये चिवळी घेऊन नळाच्या वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावी. असे केल्याने त्यामधील काडी कचरा आणि बारीक माती निघून जाईल.
- धुतलेली चिवळी कोरड्या कापडावर टाकून वाळवून घ्यावी आणि त्यानंतर चिरावी. कापडावर वाळवल्याने चिवळी चिरायला सोपी जाते.
- मिरच्या आणि दोन कांदे बारीक चिरून घ्यावे.
- कढईत एक पळीभर तेल घेऊन मंद आचेवर ठेवावे. नंतर मोहरी, जिरे टाकून ते तडतडल्यावर त्यात अर्धा चमचा हिंग टाकून बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा टाकून ते थोडे परतून घ्यावे.
- कांदा थोडा अर्धवट परतला की, त्यात एक चमचा हळद, दोन चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करावे.
- नंतर या मिश्रणात बारीक चिरलेली चिवळी टाकावी आणि गरजेनुसार हातावर पाणी घेऊन ते त्या भाजीवर शिंपडून चिवळी मंद आचेवर शिजवून घ्यावी.चिवळीला पाणी सुटत असल्याने ही भाजी शिजवण्याकरता जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे बेताने पाणी वापरावे.
- भाजी थोडी वाफवल्यावर त्यामध्ये एका हाताने वरून बेसन पेरत घालावे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने भाजी घोटत रहावी.
- अशा प्रकारे भाजी बेसनासोबत एकत्र कालवून मंद आचेवर वाफवून घ्यावी.
- पाच ते सात मिनिटांत चविष्ट अशी चिवळीची भाजी तयार होते. हवं तर याला चिवळीचा झुणका म्हणू शकता.
हेही वाचा – Recipe : शॅलोट्सचे चटपटीत लोणचे!
टीप्स
उन्हाळ्यात चिवळीची भाजी ज्वारीची भाकरी, सुक्या लाल मिरच्यांची लसणाची चटणी आणि कांदा, कैरीच्या लोणच्या सोबत मस्त लागते.
कधीकधी चिवळीच्या भाजी सोबत भाकरी न करता घडीची पोळी करून त्यासोबत आंब्याचा रस आणि कुरडई, पापड, भजी असापण जेवणाचा बेत करतात.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


