यश:श्री
आग्रा येथील ताजमहालचे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षण आहे. स्थापत्यशास्त्राचा हा उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. मुगल बादशाह शहाजहाँ याने जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल बांधून घेतला. कलारसिक असलेल्या शहाजहाँने कलाकार आणि कलेला राजश्रय दिला. या ताजमहालप्रमाणेच त्याचे सिंहासन देखील त्यावेळी चर्चेचा विषय ठरले होते. भारतीय परंपरेनुसार भारतातील राजेमहाराजे सिंहासनावर बसून राज्यकारभार चालवित होते. परंतु शहाजहाँ मोराच्या सौंदर्याने प्रभावित झाला होता. म्हणून परांपरागत सिंहासनाला दूर करत त्याने मयुरासन बनवून घेतले. हेच ते तख्त-ए-ताऊस! थोर विदुषी दुर्गा भागवत यांचा याविषयीचा एक लेख वाचनात आला होता. मोराला फारशी भाषेत ‘ताऊस’ म्हणतात. म्हणून त्या आसनाला ‘तख्त- ए- ताऊस’ म्हटले जात होते.
या आसनावरील मोराच्या पिसाऱ्याला वास्तव रूप देण्यासाठी शहाजहाँ याने राजकोषातील दुर्मीळ मौल्यवान असे हिरे-जवाहीर यांचा वापर केला होता. त्या जमान्यात या आसनाची किंमत सुमारे सात कोटी रुपये होतो, असे दुर्गाबाई भागवत यांनी म्हटले आहे.
नादिरशहाने ते आसन लुटले आणि इराणमध्ये तो घेऊन गेला. इराणमधील बादशहा ‘तख्त ए ताऊस’वर बसत होता. इराणचा शहेनशहा रझा शहा पहलवीने सव्वीस वर्षं शासन केल्यानंतर आपला राज्याभिषेक केला होता. त्यानिमित्त प्रसिद्ध झालेल्या विवरणांमध्ये म्हटले आहे की, डोळे दिपवून टाकणाऱ्या त्या सोहळ्यात (26 ऑक्टोबर 1967) इराणच्या झगमगणाऱ्या मयुरासनावर (तख्त ए- ताऊस) नवा शहेनशहा विराजमान झाला होता, असे दुर्गाबाईंनी म्हटले आहे.
तथापि, साधारणपणे ऐतिहासिक वस्तू, दस्तऐवज यांचे जतन केले जाते. मात्र, 1747मध्ये नादिरशहाचा मृत्यू झाल्यानंतर तख्त-ए-ताऊस गायब झाल्याचेही बोलले जाते, हे उल्लेखनीय. त्यामुळे कदाचित रझा शहा पहलवी याचे सिंहासन वेगळे, पण त्याप्रकारचे असू शकते.
हेही वाचा – ‘डालडा’चा फॉर्म्युला दिला नाही म्हणून आली बेकारी
मोराच्या पिसालाही महत्त्व
भगवद्-गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश युनेस्कोने मेमरी ऑफ वर्ल्ड रजिस्टरमध्ये केला आहे. भगवद्-गीता म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले ज्ञानामृत आहे. तर, श्रीकृष्णाची ओळख ही बासरी आणि मुकुटातील मोरपीस यावरून अधिक आहे. दुर्गाबाईंनी या मोरपिसाबद्दलही माहिती दिली आहे. मोराचे पीस हे तुघलकांचे सरकारी चिन्ह होते. घोडेस्वार आणि शिपायांच्या पकडीत तसेच त्यांच्या भाल्यांमध्ये मोराचे पीस लावण्यात येत असे. प्राचीन चीनमध्ये मिंग शासनकर्त्यांच्या जमान्यात मोराच्या पिसांवरून पदाधिकाऱ्यांची श्रेणी स्पष्ट होत असे.
भारतीय राजांनाही मोराचे आकर्षण
शहाजहाँप्रमाणे भारतीय राजांनाही मोराच्या सौंदर्याने आकर्षित केले होते. आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी मोराच्या पिसासारख्या नक्षींचा वापर केला होता. प्राचीन राजांच्या छत्रावरही मयुराची छाप दिसत असे. नाचणाऱ्या मोराच्या रंगबिरंगी पिसांसारखा या छत्राचा घेरा होता. त्यामध्ये अनेक रंगांचे मणी जडविले जात होते आणि मध्यभागी मोराचे शरीर किंवा खाली वाकलेली मोराची मान बसविण्यात येत होती. बाणभट्ट यांनी आपल्या ‘कादंबरी’ मध्ये याचा उल्लेख केला आहे.
कालिदासाच्या काळात मोर पाळण्याची रीत होती. राजप्रासादात तसेच श्रीमंतांच्या घरांमध्ये मनोरंजनासाठी मोर पाळले जात असे. पाळीव मोरांना त्यावेळी ‘क्रीडामयूर’ (‘रघुवंश’) किंवा ‘भवनशिखी’ (‘मेघदूत’मधील ‘पूर्वमेघ’) म्हणत असत. मयूरपालनाचा तो एक मोठा छंद होता. त्यांच्या पालनपोषणाकडेही खूप लक्ष दिले जात असे, असे दुर्गाबाईंनी त्या लेखात नमूद केले आहे.
हेही वाचा – दी ब्युटिफुल ट्री
पाटलीपुत्र येथील मौर्यांच्या महालात पाळीव मोर ठेवले जात असत. ते राजप्रासादाची शोभा वाढवित असत. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी मोरांना प्रशिक्षणही दिले जात असे. राजांचे नगर तसेच महालांशिवाय तपोवनातही मोर पाळले जात असत. च्यवन ऋषींच्या आश्रमात पुरूरवाच्या मुलासमवेत मणिकण्ठक नावाच्या मोराचे इतके भावबंध जुळले होते की, तो त्याच्या मांडीवर येऊन बसत असल्याचे वर्णन ‘विक्रमोर्वशीय’मध्ये केले असल्याचेही या लेखात म्हटले आहे.