बहुरंगी खीर बनविण्याचे साहित्य
- दूध – एक लिटर
- बारीक रवा – अर्धी वाटी
- मैदा – दोन चमचे
- खवा – पाव वाटी
- साखर – दीड वाटी
- ओले खोबरे – पाव वाटी
- बेदाणे – चवीनुसीर
- बदाम – आवडीनुसार
- खाण्याचे निरनिराळे रंग – प्रत्येकी एक टीस्पून
- तूप – अर्धी वाटी
कृती
- रव्यात थोडे तूप घालून रवा आणि मैदा भाजावा.
- गरम असतानाच त्यात पाऊण वाटी साखर, खोवलेले खोबरे आणि खवा घालून अगदी मंद विस्तवावर गोळा होईपर्यंत परतावे.
- नंतर ते खाली उतरवून, जितके रंग घालावयाचे असतील, तितके शिजविलेल्या गोळ्याचे भाग करून, त्या प्रत्येकात तो तो रंग घालावा.
- सर्व भाग वेगवेगळे चांगले मळून घ्यावेत. नंतर तुपाचा हात लावून प्रत्येक रंगाच्या गोळ्याच्या चण्याएवढ्या बारीक बारीक गोळ्या तयार करून, त्या हाताने घट्ट वळून ठेवाव्यात. गोळ्या सैल झाल्यास त्या दुधात घातल्यावर फुटण्याचा संभव आहे.
- दूध आटवून ते पाऊण लिटर करावे. त्याला थोडे कॉर्नफ्लोअर लावून दाटपणा आणावा.
- नंतर राहिलेली साखर, बेदाणे, बदामाचे काप आणि आधी केलेल्या निरनिराळ्या रंगांच्या गोळ्या उकळत्या दुधात घालून उकळी आणावी आणि खाली उतरवून ठेवावे.
हेही वाचा – Recipe : तांदळाची, गव्हल्याची अन् दुधीभोपळ्याची खीर
खीरमोहन बनविण्याचे साहित्य
- पनीर – एक किलो
- खवा – एक किलो
- मैदा – पाव किलो
- सोडा – अर्धा टीस्पून
- बेदाणे – आवडीनुसार
- वेलदोडे – स्वादानुसार
- तूप – अर्धी वाटी
कृती
- एक किलो पनीर घेऊन, त्यात खवा, मैदा आणि थोडासा सोडा एकत्र मिसळून खूप मळावे.
- या मळलेल्या गोळ्याचे लांबट गोल आकाराचे लहान गोळे करून घ्यावेत आणि या गोळ्यांमध्ये बेदाणे घालावेत.
- हे गोळे मंद विस्तवावर कढईमध्ये तुपात लाल रंगावर तळावेत.
- साखरेचा कच्चा पाक तयार करून त्यात तळलेले गोळे (खीरमोहन) घालावे आणि पाच ते दहा मिनिटे पाकात ठेवल्यावर ते बाहेर काढून घ्यावेत.
- नंतर पाक पुन्हा विस्तवावर ठेवून जरा पक्का करावा आणि त्यात हे खीरमोहन पुन्हा घालावेत.
हेही वाचा – Recipe : ओल्या हरभऱ्याची पोळी अन् मुळ्याची पोळी
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


