नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला!
एकेरात्री मी आणि राजेश म्हणजे माझा नवरा, पृथ्वी थिएटरला एक नाटक बघायला गेलो होतो. तिथे पोहोचायला जरा उशीरच झालेला, पण सुदैवानं नाटक सुरू झालं नव्हतं. तिथे गेल्यावर पाहिलं तर पार्किंग फुल्ल! मग काय गाडी जरा लांबच पार्क केली अन् नाटकाला जाऊन बसलो. खूप छान नाटक होतं. कॉमेडी नाटक आणि सर्व कलाकार उत्तम काम करणारे. मस्त एन्जॉय केलं.
नाटक संपल्यावर बाहेर आलो. जरा लांबपर्यंत चालावं लागलं… बाकीचे लोक निघून गेले होते. गाडीपर्यंत आलो आणि घात झाला… गाडीचा टायर पंक्चर झाला होता. खूप रात्र झाली होती, त्यामुळं आजूबाजूला कोणीही नव्हतं. बरं, गाडी नवीन होती आणि नवऱ्याला टायर चेंज करायला येत नव्हता. आली का पंचाईत!
आमची गाडी जिथे उभी होती, त्यासमोर 7-8 टॅक्सी पार्क केल्या होत्या. तिथे कोणाची हालचाल पण दिसत नव्हती. रस्त्याने एखाद-दुसरी गाडी किंवा रिक्षा जायची, पण हात केला तरी कोणीही मदतीला थांबत नव्हतं. राजेश म्हणाला की, “तू गाडीपाशीच थांब. गाडीत शूटिंगसाठी लागणारी कॅश आहे. कोणी टायर चेंज करणारा दिसतोय का, ते मी बघतो.”
“ठीक आहे,” म्हणून मी गाडीजवळच उभी राहिले. एकटीच. माहीत नव्हतं, तोपर्यंत ठीक होतं, पण जसं कॅशबद्दल कळलं, त्यानंतर टेन्शनच आलं ना!
हेही वाचा – Discipline : कडक शिस्त… आयुष्याला वळण लावणारी!
राजेश हिरमुसला होऊन परत आला. म्हणाला, “एखादी रिक्षा मिळाली तर, गाडी इथेच सोडून घरी जाऊयात. उद्या येऊन गाडी घेऊन जाईन.” मी “ठीक आहे,” म्हटलं आणि तेवढ्यात मला मस्त टपोरा काळा मुंगळा दिसला आणि मी भलतीच खूश झाले. हा माझा अनुभव आहे. मी लगेच राजेशला म्हणाले, “थांब रे, स्वामी आलेयत. Don’t worry!”
तेवढ्यात समोरच्या बाजूला पार्क केलेल्या टॅक्सींच्या इथे अचानक हालचाल जाणवली. एक ड्रायव्हर तिथून बाहेर आला. “काय झालं? काही मदत हवीय का?” असं त्यानं विचारलं. “हो,” म्हणून आम्ही त्याला गाडीचा पंक्चर टायर दाखवला. त्याने लगेच टायर बदलून दिला. आम्ही त्याला देण्यासाठी पैसे पुढे केले, पण त्याने ते घेतले नाहीत. त्याचे आभार मानून आम्ही निघालो.
“उद्या आपल्या इथल्या टायरवाल्याला पंक्चर टायर दाखवून घे,” असं मी राजेशला सांगितलं. राजेशने सरळ “नाही” सांगितलं. “तुला मुंगळा दिसला आणि त्यानंतर तो टॅक्सी ड्रायव्हर… त्याने टायर बदलून दिला, पण एक रुपयासुद्धा घेतला नाही. स्वामी आले म्हणालीस ना! आता त्या टायरला मी बघणारही नाही…”, असं तो म्हणाला.
हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…
आणि खरंच, ती गाडी 5-6 वर्षांनी विकून दुसरी गाडी घेतली. पण तो टायर कधीच खराब झाला नाही. शेवटी मुंबईचे रस्ते, बाकीच्या तीन टायरनी त्रास दिलाच. पण त्या टायरमध्ये गाडी विकेपर्यंत कधी हवासुद्धा भरली नाही. हा माझ्या स्वामींचा आशीर्वाद!
आजही एखाद्या कामासाठी बाहेर पडले किंवा अडचणीत सापडते, तर स्वामींचा जप केला आणि काळा मुंगळा दिसला की, मी खूश असते. काम होणारच याची खात्री असते ना!
खरंतर, एका जाणकार काकांनी मला सांगितलं होतं की, “महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलीस आणि समजा रस्त्यात खेळायची गोटी दिसली किंवा सापडली तर लगेच ती उचलून घरी घेऊन ये आणि देव्हाऱ्यात पुजायला ठेव. तुझी सगळी कामं कायम सुरळीत होतील.”
पण अजून तरी, माझ्यावर ती वेळ आली नही. कदाचित माझी स्वामींप्रतिची भक्ती कमी पडत असावी. पण स्वामींचा काळा मुंगळा मात्र मला बरेचदा धीर आणि हिम्मत देतोच. ही माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नव्हे!
श्री स्वामी समर्थ…