मनोज जोशी
कोंबडी आधी की अंड आधी? या प्रश्नाप्रमाणेच टीव्ही चित्रपट या माध्यमांचा जनमानसावर परिणाम होतो, की समाजात घडणा-या घटना लहान-मोठ्या पडद्यावर दाखविल्या जातात? हा देखील ठोस उत्तर नसलेला प्रश्न आहे. अलीकडे काही गुन्हे टीव्हीवरील गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून घडल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे, प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरवर चित्रपट तयार होत आहे. पबजी गेम खेळतान सचिन मीणाशी तिचे सूत जुळले आणि ती आपल्या चार मुलांना घेऊन ती नेपाळमार्गे भारतात आल्याचे सांगण्यात येते.
काही वर्षांपूर्वी अभिनेते विजू खोटे यांच्याशी गप्पा मारताना, सहज हा विषय छेडलला होता. पण त्यांनी याबाबत चांगलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, चित्रपटाचा जनमानसावर निश्चितच परिणाम होतो, पण हेही सत्य आहे की, वास्तवात घडणाऱ्या घटनाही चित्रपटात प्रतिबिंबित होतात. पण एखाद्या पंचक्रोशी किंवा त्या राज्यापर्यंत मर्यादित असलेली घटना चित्रपटांद्वारे सर्वत्र पोहोचते. त्यांनी सांगितलेला हाच मुद्दा महत्त्वाचा आहे!
काहीही असो, पण चित्रपटातून समाजाला काहीतरी सांगण्याचा काळ गेला आहे. प्रेक्षकांना गृहित धरलं जातं. एखादं तर्कहीन भावनिक दृश्य समोर मांडून प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं जातं. मध्यंतरी एक व्हिडीओ पाहण्यात आला होता. बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा तो व्हिडीओ होता. समोर प्रेक्षक आहेत आणि ते आपल्या सिनेकारकीर्दितील किस्से ते सांगत होते. ‘अमर अकबर अँथनी’ या अमर, अकबर आणि अँथनी झोपले आहेत तर, चौथ्या खाटेवर त्यांची (चित्रपटातील) आई निरुपमा रॉय आहे. या तिघांच्या हाताला जोडलेल्या नळीतून त्यांचे रक्त एका बाटलीत जाते आणि त्याच बाटलीतून निघालेली एक नळी आईच्या हाताला असते. त्यातून तिला रक्त दिले जाते… अमिताभ आणि ऋषी कपूरने दिग्दर्शक मनमोहन देसाईला सांगितले की, ‘वैज्ञानिकदृष्ट्या ते शक्य नाही. चुकीचं आहे.’ पण त्याने ऐकलं नाही. गम्मत म्हणजे, तो सीन पाहून समोरचा प्रेक्षक अधिक भावूक झाला… आणि हेच मनमोहन देसाईने इमॅजिन केलं होतं. अमिताभ बच्चन यांनी याच चित्रपटाचा दुसरा किस्सा सांगितला. ते म्हणाले, शेवटचं गाणं पाहा. आम्ही प्रत्यक्ष सांगतोय की, ‘एक जगह पर जमा हो तिनों, अमर… अकबर… अँथनी…’ तरीही त्या व्हिलन्सच्या गँगमधील एकालाही ते समजलं नाही! हे फक्त मनमोहन देसाईच करू शकतो.
एकूणच प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवण्याचा मसाला चित्रपटात घातला की, निर्माता-दिग्दर्शकाचे काम फत्ते. 1986मध्ये प्रदर्शित झालेला ‘कर्मा, त्याआधी 1975मधील सुपरडुपर हिट ‘शोले’ आणि 1957चा ‘दो आँखे बारह हाथ’ या तिन्ही चित्रपटांचं कथानक जवळपास सारखंच आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर, समाजाने ज्यांना नाकारलं आहे, अशा गुन्हेगारांच्या मदतीनं एक विधायक कार्य करायचं.
त्यापैकी ‘कर्मा’ आणि ‘शोले’मध्ये गुन्हेगारांचा वापर कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करण्यासाठी केल्याचं पहायला मिळते. अगदी फिल्मी भाषेत सांगायचं झालं, ‘लोहा लोहे को काटता है’! (‘शोले’सिनेमातलाच डायलॉग) ‘कर्मा’मध्ये फाशीची शिक्षा ठोठावलेले बैजू ठाकूर (जॅकी श्रॉफ), जॉनी (अनिल कपूर) आणि खैरुद्दीन चिश्ती (नासिरुद्दीन शाह) हे तिघे, कुख्यात आंतरराष्ट्रीय अतिरेकी डॉ. डँग (अनुपम खेर) याचा खात्मा करतात. ‘शोले’तही गब्बर सिंग (अमजद खान) याला पकडण्यासाठी ‘जय’ (अमिताभ बच्चन) आणि ‘वीरू’ (धर्मेंद्र) या दोन भुरट्या चोरांची मदत घेतली जाते.
‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटांत सहा सराईत गुन्हेगारांना सोबत घेऊन जेलर आदिनाथ (व्ही. शांताराम) एका पडीक जमिनीचे सोने करतो. त्यावर पिकणा-या भाजीपाल्याला बाजारात चांगली मागणी असते. इथेच हा सिनेमा इतर दोन चित्रपटांच्या तुलनेत वेगळा ठरतो. सराईत गुन्हेगार किंवा भुरटे चोर एखाद्या मोठ्या अतिरेक्याला किंवा डाकूला जेरबंद करू शकतात, हा तर्क करताच येणार नाही. अतिरेकी किंवा डाकूचा खात्मा करण्यासाठी गुन्हेगारांची मदत घ्यावी लागण्याइतपत आपले सुरक्षा दल किंवा कोणत्याही राज्यातील पोलीस दल कमकुवत तर निश्चितच नाही! पण तरीही या दोन्ही चित्रपटांनी खूप लोकप्रियता मिळवली. ‘शोले’ने तर अनेक विक्रम नोंदवले.
त्यापेक्षा गुन्हेगारांना पुन्हा गुन्ह्याच्या मार्गावर नेण्यापेक्षा श्रमाचं महत्त्व पटवून देत त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं, हे महत्त्वाचं आहे. व्ही. शांताराम यांच्या दो आँखे बारह हाथमध्ये तेच दिसते. मॉरिस फ्रायडमॅन यांनी असा वास्तवात प्रयोग केला होता. त्यापासून प्रेरणा घेत, व्ही. शांताराम यांनी हा चित्रपपट बनवला. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नाव देऊ नका, असे मॉरिस फ्रायडमन यांनी सांगितले होते.
‘दो आँखे बारह हाथ’मध्ये जेलर आदिनाथ याच्या सांगण्यानुसार सहा कैदी बाजारात जाऊन ‘ना नफा, ना तोटा’या तत्त्वावर भाजीपाल्याची थेट विक्री करतात. त्यामुळे प्रत्यक्ष ग्राहकाला त्याचा फायदा होतो. बाजाराची सूत्र मूठभर व्यापाऱ्यांच्या हाती असल्याचा फटका शेतकऱ्याबरोबर ग्राहकांना बसतो, हे वास्तवही त्यात पाहायला मिळते.