डॉ. विवेक वैद्य
“डॉक्टर, त्याला लवकर बरे करा. आज त्याचा क्लास बुडला. उद्या शाळा नको बुडायला…”
“डॉक्टर, दोन दिवस झाले शाळेत जात नाहीये. त्याच्या टीचर ओरडतील. पाहिजे तर इंजेकशन द्या… उद्या शाळेत्त जायलाच पाहिजे!”
“डॉक्टरसाब, कल इसकी युनिट टेस्ट है. कैसा भी कर के खडा करो इसको…”
हे संवाद आता माझ्यासाठी नवीन राहिलेले नाहीत. कोणाला या संवादात काही वेगळंही वाटणार नाही. कारण बहुतेकांना वाटले असणार, ही आजारी मुले मोठी असावी. दहावी, बारावीची… किमान आठवीच्या पुढची! …नाही, ही सगळी मुले आहेत, बालवाडी, ज्युनिअर, सीनियर केजी किंवा पहिलीतली!
मी कोणी बालरोगतज्ज्ञ नाही शिक्षणतज्ञ् नाही, तरीही काही गोष्टींबाबतीत माझे विचार नक्कीच सांगू शकतो. इथे मुलांना होणारे जे आजार आहेत, ते साधे, कोणतीही गुंतागुंत नसलेले आजार आपण विचारात घेत आहोत. कोणताही ताप, खोकला, पातळ संडास हे साधारण दोन ते चार दिवस राहते. अगदी कोणतेही औषध न घेता आपोआप जाणारी सर्दीही तितकेच दिवस राहते. ज्याच्या-त्याच्या प्रतिकारशक्तीवर आजाराचे दिवस अवलंबून असतात. लहान मुलात ते एखादा दिवस जास्त असू शकतो.
हेही वाचा – सुख सुख म्हणजे काय असतं?
रोगाबद्दल काही महत्तत्वाच्या गोष्टी समजावून घेऊ.
1) अचूक निदान, 2) योग्य औषधीची निवड आणि मात्रा (doses), 3) पुरेशी विश्रांती, 4) पथ्य (diet), 5) तपासण्या (साध्या आजारांना रक्त किंवा इतर तपासण्यांची गरज पडत नाही.)…
यातल्या तीन आणि चार गोष्टी रुग्णाच्या (म्हणजेच मुलांच्या आईवडिलांच्या) हातात आहेत. साध्या आजारांसाठी जास्तीचे किंवा महागडे प्रतिजैविके न देणे, हे डॉक्टरांच्या हातात असते. आजारपणात पुरेशी विश्रांती आवश्यक असतेच. त्याचप्रमाणे घरातील कोणी जवळची व्यक्ती (खासकरून मुलाची आई) जर त्याच्या निकट असली तर, भावनिकदृष्टया मुलाला एक आधार असतो. अशावेळी लहान मुलाला वा मुलीला लवकर बरे वाटावे म्हणून डॉक्टरांना हेवी ॲन्टिबायोटिक्स (प्रतिजैविके) देण्याचा आग्रह करणे (तेही जरूर नसताना) हे कितपत बरोबर आहे? शिवाय, आजारी असताना पुरेशी विश्रांती न देता त्याला शाळा किंवा क्लासला पाठवणे, याला काय म्हणावे? उलट, आता डिसेंबर आणि जानेवारी या थंडीच्या दिवसांत चौथीपर्यंतच्या शाळा, ज्या सकाळी साडेसातला सुरू होतात, त्यांची वेळ नऊ वाजता करण्यात यावी, असे अनेक बालरोगतज्ज्ञांचे मत आहे. जेणेकरून या लहान मुलांमध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होईल.
आता शिक्षणाबद्दल
ज्युनिअर केजीत जाणारा मुलगा दोन दिवस शाळेत न गेल्याने तो किती मागे पडणार आहे? सीनिअर केजीची मुलगी एक दिवस ट्युशनला गेली नाही तर, तिचा किती अभ्यास बुडणार आहे? पहिलीतला किंवा फर्स्टमध्ये असलेल्या विद्यार्थ्याने जर आजारपणामुळे एक युनिट टेस्ट दिली नाही तर, असे कोणते आभाळ कोसळून पडणार आहे?
हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!
कबूल आहे, सध्या स्पर्धेचे युग आहे. नववी, दहावी, अकरावी, बारावी परीक्षांसाठी खूप अभ्यास करावा लागतो. बारावीनंतरही…! पण तो निकष पाच-सात वर्षांच्या मुलाला कशाला? त्यांचे वय खेळायचे, बागडायचे… त्यांच्या डोक्यावर अभ्यासाचे बर्डन कशाला? उलट, हसत-खेळत शिक्षण ही पद्धत सरकार अवलंबत आहे… त्यामागे काही विचार असेलच ना? मुलांना खेळू द्या, बागडू द्या, फुलू द्या…
आमच्या लहानपणी एक गाणे होते –
पडू आजारी मौज हीच वाटे भारी…
यातली मौज म्हणजे शाळेला सुट्टी हीच होती….!


