आराधना जोशी
कपड्यांच्या एका ब्रॅण्डेड आऊटलेटमध्ये जाण्याचा नुकताच योग आला. हो हल्ली कपड्यांच्या दुकानांपेक्षा आऊटलेटमध्ये जाऊन खरेदी करण्याचं फॅड वाढलं आहे. आऊटलेटमध्ये तरुणवर्गाची गर्दी. बहुतेकजण मित्र-मैत्रिणींबरोबर खरेदीला आले होते. त्यांच्या आपापसात होणाऱ्या गप्पांमधून लक्षात आलं की, आता कॉलेजला सुट्टी असली तरी आऊटिंग करायला जाताना नवीन वॉर्डरोब असावा, यासाठी ही गर्दी होती. अनेकजणांना दर सहा महिन्यांनी आपला वॉर्डरोब बदलण्यात इंटरेस्ट असतो तर, काहींना विशिष्ट ब्रॅण्डचेच कपडे वापरायचे असतात. गंमत म्हणजे, कपडे खरेदी नेमकी कोणत्या ठिकाणाहून केली, हे जगाला दाखवण्यासाठी त्या-त्या आऊटलेटच्या कॅरी बॅगही महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
काही वर्षांपूर्वी एका संस्थेकडून तरुण वर्गात ब्रॅण्डची क्रेझ किती आहे, याबाबत एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यांच्या अहवालानुसार भारतातील तरुण पिढी ब्रॅण्डबाबत अत्यंत जागरूक आहे. पण हे जागरूक असणं केवळ कपड्यांपुरतं मर्यादित नाही तर, आयुष्यात प्रत्येक गोष्ट ब्रॅण्डेड हवी, असा या तरुण पिढीचा कल आहे.
सकाळी उठल्यापासून लागणाऱ्या टूथब्रश, टूथपेस्टपासूनच याची सुरुवात होते. विशिष्ट साबण, शॅम्पू, कंडिशनर, फेस क्रीम…. यादी बरीच मोठी आहे. मात्र या ब्रॅण्डच्या अट्टहासामुळे एकाच घरात पालकांचे साबण, शॅम्पू वेगळे आणि मुलांचे वेगळे असेही प्रकार बघायला मिळतात. घरी आईने ‘दूध हळद पी’ असं सांगितल्यावर नाक मुरडणारी ही पिढी विशिष्ट कॉफी आऊटलेटमध्ये बसून टर्मरिक लॅट्टे (हळदीचं दूध) मोठ्या चवीने पिताना दिसते. घरी आईने केलेली कोशिंबीर न खाणारी तरुण मुलगी बाहेर मित्र मैत्रिणींबरोबर ‘मी डाएटवर आहे,’ असं सांगून अनेकदा सलॅड बाऊल घेताना दिसते.
हेही वाचा – …असेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप
आजकाल वाढदिवसही घरी किंवा एखाद्या हॉटेलमध्ये साजरे होण्यापेक्षा पिझ्झा आऊटलेट किंवा फास्ट फूडसारख्या तत्सम काही जागी सेलिब्रेट होताना दिसतात. वाढदिवसाचे केकही विशिष्ट ब्रॅण्डचेच ऑर्डर केले जातात. वेफर्स, समोसा, कोल्ड्रिंक्स यांची जागा पिझ्झा, बर्गर यांनी घेतली आहे. नंतर डेझर्ट म्हणून आईस्क्रीम खायलाही आजची पिढी विशिष्ट आऊटलेटला प्राधान्य देते.
ब्रॅण्डेड मोबाईल, घड्याळे, गॉगल, लॅपटॉप, शूज याबाबतही तरुण पिढीला प्रचंड आकर्षण आहे. म्हणूनच नोकरी लागल्यावर पहिला पगार हा अशाच गोष्टींवर खर्च होतो, असंही सर्वेक्षणात दिसून आलं आहे. आताआतापर्यंत पिढ्यानपिढ्या खरेदी करत असलेल्या दागिन्यांच्या दुकानांमध्ये आता अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे काही विशिष्ट ब्रॅण्डचेच दागिने खरेदी करण्यातही आजची पिढी आघाडीवर आहे.
अर्थात, ब्रॅण्डची ही प्रचंड क्रेझ असली तरी त्यात ‘नाव’ महत्त्वाचं आहे, कारण काही हजार रुपये खर्च करून घेतलेले कपडे (मुख्यत्वे पॅन्ट) या अनेकदा गुडघ्यांवर फाटलेले किंवा फाडलेले, विटक्या रंगाचे असतात. कॉलेजमध्ये या अशा पोशाखाबरोबर अनेकदा स्लीपर्स (त्याही ब्रॅण्डेड) घालून बिनधास्तपणे तरुणाई वावरताना दिसते. अर्थात, हे अशा पोशाखाचं फॅड फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्येच आहे, असं नाही तर, अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्येही हल्ली अशीच फॅशन दिसून येते. आतापर्यंत कॉर्पोरेट क्षेत्रात फॉर्मल्सला असणारे महत्त्व हळूहळू कमी होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळेच आता शर्ट-पँट शिवून देणाऱ्या टेलर्सची दुकाने, विशेषत: जेन्ट्स टेलर्सची दुकानं शोधावी लागत आहेत. तर, इतर टेलर फक्त अल्टरेशन आणि चेन बदलून देण्यापुरतेच राहिले आहेत.
हेही वाचा – लेखिका कविता महाजन यांची अविस्मरणीय भेट
आज पालक बनलेल्या अनेकांना आपल्याच मुलांचे ब्रॅण्डसाठी वेडं होणं नवीन वाटत असलं तरी प्रत्येक पिढी कधीना कधी, या अशा ब्रॅण्डसाठी जीव टाकणारी होती, हे सत्य आहे. म्हणूनच आपल्या घरी कोणत्या ब्रॅण्डचा टेलिव्हिजन सेट, फ्रीज, मिक्सर आणायचा याबद्दल आपलीही लहानपणी काही स्वप्न होती आणि ती जर पूर्ण झाली तर होणारा आनंद कल्पनातीत असायचा. आज आपल्या मुलांना विशिष्ट शाळेत, विशिष्ट कोचिंग क्लासमध्ये किंवा विशिष्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी चालणारी पालकांची धडपड एक प्रकारे ब्रॅण्डशीच निगडीत नाही का?
आजची पिढी ब्रॅण्ड कॉन्शिअस असली तरी तीच त्यांची ओळख नाही. बाह्य रुपापेक्षाही अनेकदा त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवायला आवडतं. म्हणूनच एखाद्या विशिष्ट ब्रॅण्डचाच किती अट्टहास धरायचा, याचंही भान याच पिढीकडे आहे.