भाग – 2
निळा कोट आणि हेल्मेट बघितल्यावर नेहाला वाटले बसमध्ये भेटलेला तो तरुण नक्कीच सुपरवायझर असावा आणि मी जर ऑफिसर म्हणून या कंपनीत रुजू झाले तर, कदाचित तो माझ्या हाताखाली असेल. मी खुर्चीवर बसेन आणि तो आजसारखा कायम उभा राहील, न रागावता ‘मॅम, मॅम’ करेल. नेहा दिवास्वप्नात रमली असतानाच साहेबांच्या सेक्रेटरीने नेहाला सांगितले, ‘तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे.’
केबिनचा दरवाजा हळुवारपणे वाजवून नेहाने विचारले, ‘सर, मी आत येऊ का?’
साहेबांचा होकार मिळाल्यावर नेहा केबिनमध्ये शिरली आणि बघते तर काय! बसमधील तो तरुणच केबिनमध्ये साहेबांच्या चेअरवर बसला होता! ज्याला तिने अतिशय तुच्छ लेखले होते, ज्याचा सर्वांसमोर अपमान केला होता, तो तरुणच ‘भाटिया इंटरनॅशनल’ या कंपनीचा जनरल मॅनेजर होता.
नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. भीतीने थरथरत ती म्हणाली, ‘सॉरी सर, मला माफ करा. मी चुकले. मला माहीत नव्हतं तुम्ही कोण आहात ते!’
‘ठीक आहे नेहा. तुम्ही बसा. हे पाणी घ्या आणि बी कम्फर्टेबल. अहो, मला तरी कुठे माहीत होतं, तुम्ही आमच्या कंपनीतच येणार आहात. मी मानलं तुम्हाला, अगदी पत्ता विचारताना देखील भाटिया इंटरनॅशनलमध्ये तुम्हाला जायचे हे समजू दिलं नाही.’
हेही वाचा – इंटरव्ह्यूसाठी नेहा ऑफिसमध्ये पोहोचली खरी…
घाबरलेल्या नेहाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य निर्माण करण्यात राजला यश मिळाले होते. नेहा क्षणात तणावमुक्त झाली. नेहाने प्रथमच राजकडे निरखून पाहिले. अगदी तरुण, रुबाबदार, प्रसन्न मुद्रा, हसरा चेहरा, कुणावरही छाप पडेल असे व्यक्तिमत्त्व… ‘मी सकाळी राजकडे नीट बघितले असते तर कदाचित…’ नेहा मनातल्या मनात लाजली.
आलिशान वातानुकूलित केबिन, गोल फिरणारी खुर्ची आणि आधुनिक सेक्रेटरी, छान रुबाब होता राजचा पण तरीही अगदी ग्राउंड टू अर्थ! अगदी कमी वयात प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर राज जनरल मॅनेजर झाला होता. सगळ्यांशी अतिशय प्रेमाने, आदराने आणि मिळून मिसळून वागत राजने कंपनीत एक आदराचे स्थान निर्माण केले होते.
राजने नेहाला प्रथम काही टेक्निकल प्रश्न विचारले. सर्व प्रश्नांना नेहाने आत्मविश्वासाने अगदी अचूक उत्तरे दिली. त्यानंतर राजने विचारलेल्या करिअर आणि गोल-ओरिएंटेड प्रश्नांच्या उत्तरांतून नेहाची परिपक्वता जाणवत होती. शेवटचा आणि निर्वाणीचा प्रश्न तोच तो, जो अनेकांनी विचारला होता. ‘तुमच्या हातात दुसरी नोकरी नसताना तुम्ही असलेली नोकरी का सोडली? की तुम्हाला नोकरीवरून काढण्यात आलं?’
सांगावं की न सांगावं? नेहाच्या मनात द्वंद्व सुरू झालं. आजपावेतो नेहाने सत्य कुणालाही सांगितले नव्हते. नेहाच्या मनोदेवतेने नेहाला सांगितलं, ‘पोरी, सत्य काय ते सांगून टाक, कुठलाही आडपडदा न ठेवता.’
पुढील पाच मिनिटे नेहा बोलत होती, राज शांतपणे ऐकत होता.
‘तुमच्या त्या कंपनीतील सीईओंचे नाव काय होते?’ राजने विचारले. नेहाचे उत्तर ऐकून राज म्हणाला, ‘अरे, मी तर याला ओळखतो. आयआयटीत बी-टेक आणि एम-टेकला आम्ही बरोबर होतो.’
नेहाला मनोमनी प्रकर्षाने जाणवले की, तिने सत्य सांगून खूप मोठी चूक केली होती. स्वतःच्याच हाताने तिने तिच्या पायावर दगड मारून घेतला होता. जवळपास निश्चित झालेली नोकरी नेहा घालवणार होती. नेहाला मनोमनी पश्चाताप झाला. इंटरव्ह्यूला आल्याबद्दल नेहाला ‘थँक्स’ म्हणून, ‘तुम्ही आता एचआर ऑफिसर वरदला भेटा,’ राजने सांगितले.
“नेहाची नष्ट झालेली आशा पुन्हा पल्लवीत होऊन नेहा वरदच्या केबिनमध्ये दाखल झाली. ‘थॅंक्स, राजने झालेल्या अपमानाचा राग धरला नाही,’ असे मनातल्या मनात म्हणताना नेहा शरमली.
‘वरद सर, राज सरांनी मला तुम्हाला भेटायला सांगितले.’
‘नेहा, तुम्ही बसा, मी विचारतो,’ म्हणत वरदने राज सरांना फोन लावला. फोन बराच वेळ चालू होता. नेहा मोठ्या अपेक्षेने वरदकडे पाहत होती. सरांशी बोलून वरदने फोन ठेवला आणि नेहाला सांगितले, ‘तुम्ही आता जाऊ शकता. आम्ही तुम्हाला नंतर कळवू.’ त्या “नंतर कळवू”चा अर्थ नेहाला माहीत होता. खिन्न मनाने नेहा घरी परतली.
0000
आजच्या दिवसाची सुरुवातच वाईट झाली. तरीही योग्य अनुभव आणि हुशारीमुळे पारडे तिच्या बाजूने झुकले असताना तिने एक अक्षम्य चूक करून स्वतःचे नुकसान करून घेतले होते.
घरात शिरताच आईने विचारले, “नेहा, मिळाली ना ऑफर?”
“नाही आई, नाही मिळाली ऑफर,” म्हणताना नेहाचा आवाज रडवेला झाला होता.
“नेहा, अगं तूच तर सांगितलंस ना की, फायनल इंटरव्ह्यूला फक्त तू एकटीच होतीस म्हणून.”
“आई, सकाळी इंटरव्ह्यूला जाताना बसमध्ये मी ज्यांचा अपमान केला, त्यांनीच माझा फायनल इंटरव्ह्यू घेतला आणि इंटरव्यूमध्ये मी त्यांना माझ्या पूर्वीच्या सीईओंबद्दल सर्व काही सांगितले. ते सीईओ त्यांचे वर्गमित्र निघालेत. कशी मिळणार ऑफर मला?”
“नेहा, मी तुला नेहमी सांगते की, इतका राग आणि पटकन चिडणे मुलीच्या जातीला योग्य नाही.”
“आई, पुरे कर तुझे लेक्चर,” नेहा वैतागून म्हणाली.
नेहाने सांगितलेले ऐकून आई-बाबा देखील उदास झाले; परंतु त्यांनी नेहाला कसाबसा धीर दिला. आई-बाबांची नजर चुकविण्याची युक्ती नेहाला सापडली. “मी आपल्यासाठी चहा करून आणते,” म्हणत नेहा किचनमध्ये गेली.
नेहाने तीन कप चहा केला आणि चहा कपात ओतणार तोच नेहाला दार वाजल्याचे जाणवले. नेहाने दरवाजा उघडला. बाहेर एक तेजस्वी साधू महाराज उभे होते. नेहा पटकन घरात आली, पर्समधून दहा रुपये काढून तिने साधू महाराजांना दिले.
“बेटी, मला पैसे नकोत, मला चहा दे,” साधू महाराजांनी सांगितले.
पांढऱ्या शुभ्र थर्माकोलच्या कपात नेहाने साधू महाराजांना चहा दिला. नेहाच्या डोक्यावर हात ठेवत महाराज म्हणाले, “देव तुझे भले करेल.”
“नेहा आश्चर्यचकित झाली. आई-बाबांचे कप भरल्यानंतरही भांड्यात चहा शिल्लक होता आणि नेहाचा कपदेखील पूर्णपणे भरला. चहा पिताना कोणीही काहीही बोलले नाही. नेहाने चहाचे रिकामे कप किचनमध्ये नेले, तेवढ्यात नेहाचा फोन वाजला.
फोन एचआर ऑफिसर वरदचा होता.
‘सॉरी नेहा, तुमचे प्लॅनिंग ऑफिसरच्या जागेसाठी सिलेक्शन झाले नाही.’
‘सर, पण माझा इंटरव्ह्यू तर खूप चांगला झाला होता…’ काहीतरी बोलायचे म्हणून नेहा म्हणाली.
‘अगदी खरं. परंतु प्लॅनिंग ऑफिसरच्या जागेसाठी असलेल्या आमच्या पगाराच्या बजेटपेक्षा तुमची पगाराची अपेक्षा जास्त आहे, त्यामुळे राज सर म्हणालेत की तुम्हाला या जागेसाठी घेता येणार नाही.’
‘वरद सर, तुम्ही राज सरांशी बोलून बघाल का प्लीज? मला नोकरीची खूप गरज आहे आणि तुम्ही जो पगार द्याल तो घ्यायला मी आनंदाने तयार आहे,’ नेहा म्हणाली.
‘नेहा, मी त्यांच्याशी बोललो; परंतु तसे करायला त्यांनी स्पष्ट नकार दिला.’
आज जे काही झाले त्याला पूर्णपणे मीच जबाबदार आहे. मी एक नाही तर अनेक चुका केल्यात, नेहा मनातल्या मनात म्हणाली.
‘नेहा, तुम्हाला एक गोष्ट चालणार असेल तर…’
‘बोला सर, बोला. मला काय कॉम्प्रमाइज करायला लागेल? तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे; परंतु मला कृपा करून ही नोकरी द्या,’ नेहा कळवळून म्हणाली.
‘नेहा, कॉम्प्रमाइज तुम्हाला नाही तर आम्हाला करावे लागेल,’ वरद म्हणाला. ‘तुमची पगाराची अपेक्षा मॅच करण्यासाठी आम्ही तुम्हाला “प्लॅनिंग ऑफिसर” म्हणून घेत नाही, तर “प्लॅनिंग मॅनेजर” म्हणून घेत आहोत,’ वरदने गौप्यस्फोट केला…
हेही वाचा – बायकोची साडी खरेदी अन् मी
‘नेहा, पण एक गोष्ट मात्र तुम्हाला करावीच लागेल.’
‘साहेब, प्लीज संकोच करू नका. काय हवे ते स्पष्टपणे सांगा.’
‘मला तुमच्या घराचे लोकेशन पाठवा,’ वरद म्हणाला.
‘वरद सर, मी आई-बाबांबरोबर राहते. तुम्ही घरी येण्यापेक्षा मलाच सांगा मी कुठे यायचे ते.’
‘नेहा, तुम्हाला उद्यापासूनच ऑफिस जॉइन करावे लागेल. उद्या सकाळी बरोबर आठ वाजता कंपनीची गाडी तुम्हाला घ्यायला येईल. ड्रायव्हरला देण्यासाठी मला लोकेशन हवे आहे. देणार ना?’
‘का नाही देणार? लगेच पाठविते सर,’ नेहा अत्यानंदाने म्हणाली.
वरदकडून जे ऐकलं त्यावर नेहाचा विश्वास बसत नव्हता. जे होत होतं ते स्वप्नवत होतं. वरद आणि राज सरांचे मनापासून आभार मानत नेहाने फोन ठेवला आणि ही आनंदाची बातमी आई-बाबांना सांगायला ती आत जाणार तोच दरवाजा वाजला.
नेहाने दरवाजा उघडला. बाहेर कोणीही नव्हते; परंतु तिला स्पष्ट ऐकू आले, ‘बेटी, देव तुझे भले करेल.’
नेहाचे डोळे पाणावले. त्या अदृश्य शक्तीला तिने मनापासून नमस्कार केला आणि ही अनपेक्षित गोड बातमी आई-बाबांना सांगण्यासाठी ती घरात पळाली.
समाप्त


