नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
आज 26 जानेवारी. आपला 77 वा प्रजासत्ताक दिन. आमच्या कॉम्प्लेक्समधील रहिवाशी मोठ्या प्रमाणावर आणि बहुसंख्येने उपस्थित राहून साजरा केला. प्रथम झेंडावंदन… तालासुरात जन गण मन… देशाचा जयघोष… वंदे मातरम्… अगदी दणाणून सोडला कॉम्प्लेक्स… मग देशभक्तीपर गाणी झाली… लहानग्यांचे कार्यक्रम… नाच, गाणी, भाषणं झाली. साधारण अडीच वर्षांच्या एका मुलीने पुन्हा एकदा जन गण मन म्हणायला सुरुवात केली. वयाच्या मानाने आत्मविश्वास खूप छान होता… भाषा, शब्द स्वच्छ आणि खणखणीत होते. न चुकता, न लाजता, न घाबरता छान गायली चिमुरडी जन गण मन… आणि मला या आठवड्याचा विषय सापडला!
खरंतर भाषेतली, शब्दांची चूक काढणे हा माझा अधिकार नव्हे, पण एखादी गोष्ट कानाला खटकली की, डोक्यात वळवळ होतेच. ‘उच्छल जलधि तरंग…’ ही ओळ आली की, माझा मेंदू वाकडा तिकडा होतो. कारण मी माझ्या लहानपणी जे शिकलेय ते असे आहे की, आपला देश महान आहे, वंद्य आहे. जोपर्यंत नद्यांमध्ये पाण्याचे तरंग उठत राहतील… आपला देश भाग्यविधाता असेल. पण अलीकडे बरेचदा जन गण मन ऐकताना एक गोष्ट कानाला खटकते, ती म्हणजे हल्ली गाताना लोक ‘उच्छल जलधि ‘तिरंगा’’ म्हणतात! मला ते ऐकताना खूप वाईट वाटतं. एकदा एक बाई म्हणाली सुद्धा मला की, ‘तरंग काय, तिरंगा म्हटलं की, कसं भारी वाटतं.’ म्हणजे हे लोक मूळ शब्द बाजूला ठेवून त्याचा अर्थ ही विचारात न घेता ऐकायला भारी वाटतं म्हणून बोलतात. काय कप्पाळ समजावणार मी अशा लोकांना?
हेही वाचा – पडद्यावर न झळकलेली ‘त्या’ हीरोची आई…
आज झेंडावंदन नंतर जन गण मन म्हणताना, मी नेहमीप्रमाणे तारस्वरात ‘तरंग’ म्हणाले. बाकी बरेच लोक ‘तिरंगा’ म्हणाले आणि गंमत म्हणजे, मी चुकीचं बोलतेय, अशा नजरेने ते माझ्याकडे पाहात होते! पण ती चिमुरडी मात्र अगदी बरोब्बर गायली. तिरंगा न म्हणता जलधि तरंग म्हणाली…
हा अर्थ मला माझ्या लहानपणी माझ्या घरासमोर राहणाऱ्या प्रो. देऊळकर यांनी सांगितला होता. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत या तीन भाषांचे ते प्राध्यापक होते. मी त्यांना आजोबा म्हणायचे. दहावीला असताना मला अभ्यासात त्यांची खूप मदत झाली होती. मला वाटतं त्यांना जाऊन 30 वर्षं तरी झाली असतील, पण त्यांनी शिकवलेला अभ्यास, शब्दार्थ आजही लक्षात आहेत!
माझं काही चुकलं असेल तर, मोठ्या मनाने माफ करा.
हेही वाचा – बाजूने बर्फाच्या लाद्या गेल्यासारखा थंडावा जाणवला!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


