दिप्ती चौधरी
मी (पिदू) आणि दनू मुंबईतल्या एका सोसायटीमध्ये राहत होतो. आमच्या बिल्डिंगमध्ये एक नवीन कुटुंब राहायला आले. त्यांच्या पाळलेल्या भुभू बरोबर त्यांनी माऊंनाही थोडे खायला द्यायला सुरुवत केली. तेव्हाच आमची दिदी पण तिच्या आजी आणि आजोबा म्हणजे बाबांकडे शाळेसाठी दोन वर्षं राहायला आली. दिदीबरोबर असलेल्या मैत्रीमुळे आजी आणि बाबाही आम्हाला खायला देत. बाबा आणि आजी आम्हाला खास मासे आणून द्यायचे. आतापर्यंत बेवारस असलेली सोसायटीतील मांजरांची जबाबदरी कोणीतरी घेतली… हे नजरेत आल्यावर अचानक इतकी वर्षं सोसायटीत सुखेनैव वास्तव्य करणाऱ्या मांजराचा त्रास सुरू झाला…
सुरुवातीला हा विरोध इतका तीव्र नव्हता, थोडी धुसफूस, आडून आडून टोमणे वगैरे. तेव्हा सोसायटीत एकच भू भू होता डिंपल आण्टीचा स्कूबी. तो तर डंपरचा जानी दोस्त! आणि डिंपल आंटी आमची तारणहार. त्यामुळे ती अगदी काटेकोरपणे स्वच्छता पाळायची. त्यामुळेच छोट्या कुरबुरी सोडल्या तर मोठ्या काही तक्रारी नव्हत्या. पण त्याच सुमारास काही इतर कुटुंबांनीही भू भू पाळायला आणले. पण त्यासाठी पूर्ण मेहनत घ्यायची तयारी नव्हती. वेळच्या वेळी जर त्यांच्या नैसर्गिक विधींसाठी बाहेर नेलं नाही आणि नंतर जर घाण उचलली नाही तर, परिसर अस्वच्छ होणारच.
प्रश्न खरोखरच रास्त होता, पण त्याचं कारण मात्र या लोकांनी भलत्यावरच ढकलले. आम्ही मुके आणि बेवारस, निशाणा साधायला सर्वात सोप्पे! ही भटकी मांजरे घाण करत आहेत, असे आरोप सुरू झाले आणि यात अग्रेसर ज्यांची भू भू हे उद्योग करत होती तेच होते!
खरेतर मांजर हा अतिशय स्वच्छ प्राणी आहे. त्याला आंघोळही घालायची गरज नाही. नैसर्गिक विधीसाठी पण त्यांचे कडक नियम आहेत. खड्डा खणून त्यात विधी करून नंतर तो खड्डा व्यवस्थित बुजवून टाकतात. माजावर आलेला बोका आपली सीमा आखण्यासाठी शू करतो, किंवा घरात राहणारे, माती न मिळणारे माऊ जमिनीवर शी करत असतील. पण आयुष्य मोकळ्यावर गेलेले, इतकं मोठं मैदान असताना खास जिन्यावर जाऊन का शी करू?
पण आता डिंपल आंटीच्या जोडीला दिदीच्या दहावीसाठी आई पण मुंबईला आली होती. दोघींनी मिळून जोरदार प्रतिकार केला. लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आमचे व्हिडीओ घेऊन दाखवले की, मांजरांच्या सवयी काय आहेत. काहींनी मानले; पण बहुतेकांनी सोयीस्करित्या नाकारले, कारण आपल्या आजूबाजूला प्राणी असणेच बहुतेकांना मान्य नव्हते.
त्याचवेळी माझा जन्म झाला. गच्चीवरील पाण्याच्या टाकी खाली रोडरोलरने चार पिल्ले दिली. गच्चीवर आई फिरायला आली होती. तिच्या मागे लगबगीने रोडरोलर धावत वर आली. ओरडून ओरडून टाकीजवळ चल असा आग्रह करत होती. ही काय सांगते बघायला आई तिच्यामागे आली. तिने साद घालून आम्हाला बाहेर बोलावलं. खास आईला दाखवायला! आम्ही सर्व धावतच बाहेर आलो. आम्हाला अनिमिष नेत्रांनी आई बघतच राहिली.
सारी पिल्ले मागे फिरली मी मात्र एकटक आईकडे पहात बसलो. जणू तिला सांगत होतो… तेरा मुझसे है पहलेका नाता कोई… तिलाही ते जाणवत होते. तिला वाटून गेलं या पिल्लूशी माझा काही ऋणानुबंध आहे का? हे काय सांगतंय मला? भविष्काळात आपल्या वाटा एकत्र होतील असे सांगतोय का?
पण कसे शक्य आहे? आईच इथे फक्त वर्षभरासाठी होती. नंतर दिदीला घेऊन ती बंगलोरला निघून जाणार होती.
(क्रमशः)
(पिदू या मांजराची आत्मकथा)
diptichaudhari12@gmail.com