Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeललित...मग आईने एक अत्यंत अनोखा उपाय शोधून काढला

…मग आईने एक अत्यंत अनोखा उपाय शोधून काढला

दिप्ती चौधरी

तीन महिने झाले तरी आमचे भांडण सुटायचे नाव घेत नाही, असे बघून आईने शेवटी आमचे गॉडफादर, डॉ. इरफान अहमद यांना फोन लावला. त्यांनी आमचे अनेक व्हिडीओ बघितले, व्हिडीओ कॉल करून निरीक्षण केले आणि आईला धीर दिला. बहुतेक वेळा मी गरीब चेहऱ्याने लोळून दाखवले, त्यामुळे त्यांना पटले की, मी काही भानगड करत नाही. त्यांनी सांगितले की, भांडण संपले आहे आणि पिदूला खेळायचे आहे; पण दनू अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याने तो चिडून मारामारी करतो. थोडा वेळ लागेल, पण दोघांना एकत्र राहू द्यायचे म्हणजे दनूला सवय होईल आणि मला प्रतिबंधित वाटले नाही तर, मी त्याचा नाद सोडून देईन.

मला दनूबरोबर एकटे ठेवले तर, मी परिस्थितीचा पुरेपूर गैरफायदा उठवतो, हे लक्षात आल्यावर मला कोणाच्यातरी देखरेखीखाली दनूजवळ जाऊ दिले. त्यामुळे नाईलाजाने मला शिस्तीत रहावे लागायचे. पण सतत कोणीतरी आमच्याबरोबर कसे राहणार म्हणून आईने एक अत्यंत अनोखा उपाय शोधून काढला… मला शर्ट घालायचा! एरवी सुपर हीरोसारखा कोणाच्याही हातात न लागणारा मी, शर्ट घातला की सरळ चालू शकत नाही आणि उडी मारू शकत नाही. माझ्या सगळ्या सुपर पॉवर फुस्स होतात… मला अजिबात आवडत नाही… पण दिदी मला सांगते की, तू टॉम क्रुझसारखा दिसतोस शर्ट घालून… त्यामुळे मी दनूबरोबर असलो तरी भानगडी करू शकत नव्हतो आणि दनूचा माझ्यासोबतच आत्मविश्वास वाढला.

त्याचबरोबर रात्री टीव्ही बघायला आम्हाला एकत्र मांडीवर घेऊन आई बसायची. शर्ट घालून मला दनूच्या खोलीत झोपायची पण परवानगी होती. तसेच, दोन नवीन कॅट ट्री आणून आम्हाला छान झोपता-बसता येईल आणि दनूला थोडे लपता येईल अशी सोयही केली होती.

हेही वाचा – अचानक माझं वागणंच बदललं…

आता आमचे आई आणि पप्पा जरा कामात व्यग्र झाले, कारण आम्ही आता आमच्या नवीन घरी जाणार होतो. ते आमचे घर दुसऱ्या गावात होते आणि आमच्या दादाची शाळा संपली की, आम्ही तिथे राहायला जाणार होतो. त्यामुळे त्या नवीन घरी राहायला जाण्याआधीची सर्व कामे दर शनिवार, रविवारी जाऊन ते पूर्ण करत होते. त्यामुळे ते दोन दिवस आमचा पूर्ण ताबा आमच्या दिदीकडे असे. आठवडाभर ती तिच्या विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत असली तरी, आमचा ताबा घेण्यासाठी ती आठवडा अखेर येथे असायची. खरी सुधारणा तेव्हाच व्हायची, कारण ती आईसारखी उगीच घाबरत नाही आणि आम्हा दोघांना बरोब्बर सरळ ठेवते. आईला उगीच वाटते की, दनू बिच्चारा आहे आणि मीच खोडी काढतो.

या सर्वांचा योग्य परिणाम दिसू लागला आणि आमचे भांडण थोडे निवळू लागले. पण डॉ. अहमद यांनी सांगितले होते की, नवीन घरी परिस्थिती पूर्णपणे पहिल्यासारखी होईल काळजी नसावी. आणि तसेच झाले.

आवश्यक ते सामान सोबत घेऊन दोन गाड्यांतून आम्ही निघालो. आई आणि दिदी बरोबर आजी आणि आम्ही दोघे होतो. आजी आम्हाला आमच्या दोन पिंजऱ्यात घेऊन मागे बसली होती. पूर्ण रस्ता बोंबलायची जबाबदारी मी दनूवर सोपवली होती. तो थांबला की, मी लगेच ओरडून त्याला सुरू करायला सांगायचो. बाकी मी एकदम शांत होतो… फक्त पिंजऱ्यात घाण करून त्या वासाने सर्वांचे डोके उठवले होते!

हेही वाचा – भौतिकशास्त्राचे नियम एकाच उडीत लोळवले

तीन तास प्रवास करून आम्ही आमच्या नवीन घरी पोहोचलो. नेहमीप्रमाणे आमचे पिंजरे एका छोट्या खोलीत उघडले. थोडे लपून बसलो पण रात्री थोडी शांतता झाल्यावर आम्ही हळूच घराचा अंदाज घ्यायला निघालो. अनोळख्या ठिकाणी एकटा कसा जाणार त्यामुळे भांडण मिटवून मी दनूला सोबत घेतले.

खिडकीत एकत्र बसून आम्ही बाहेर दिसणार पाण्याचा तलाव मोठ्ठे डोळे करून बघत होतो आणि पाणावलेल्या डोळ्यांनी आमच्याकडे आई बघत होती…

क्रमशः

(पिदू या बोक्याची आत्मकथा)

diptichaudhari12@gmail.com

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!