Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकमिशन ॲडमिशन अन् आखलेली चौकट

मिशन ॲडमिशन अन् आखलेली चौकट

आराधना जोशी

डिसेंबर आणि जानेवारी हे महिने शाळांमधील ॲडमिशनचे. आपल्याला हव्या त्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा, यासाठी आईवडिलांची सुरू असलेली धावपळ… एका विशिष्ट शाळेतच प्रवेश मिळावा, यासाठी आग्रही आणि त्यामागे कदाचित असणारी प्रतिष्ठा… आदल्या दिवशी दुपारपासूनच त्या-त्या शाळेच्या ऑफिसबाहेर फॉर्म घेण्यासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा… त्यानंतर तो फॉर्म भरण्यासाठी परत लावलेल्या रांगा… मुलाखतीची पाल्याकडून करून घेतली जाणारी तयारी… प्रत्यक्ष मुलाखतीच्यावेळी पाल्याने गप्प बसणं किंवा मनाला वाटेल ती उत्तरं देणं आणि यामुळे बाबांपेक्षाही आईचं वाढलेलं बीपी…. या गोष्टी आतापर्यंत माहीत होत्या. नशिबाने माझ्या मुलीच्या शाळाप्रवेशाच्या वेळी यातील अनेक गोष्टी कराव्या न लागल्याने शाळाप्रवेश ही माझ्या दृष्टीने सहजसोपी गोष्ट होती. त्यातही दिल्ली बोर्डाच्या शाळेत कोणत्याही डोनेशनशिवाय हा प्रवेश झाला होता. मुळात शाळेचं वातावरण, मुलांना मिळणारी वागणूक, अभ्यासाव्यतिरिक्त असणाऱ्या इतर अ‍ॅक्टिव्हिटीज् हे मुद्दे पालक म्हणून मला जास्त महत्त्वाचे वाटले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी एका आईशी झालेल्या बोलण्यातून आपण जगाच्या किती मागे आहोत, याचा साक्षात्कार झाला. तोच अनुभव शब्दबद्ध केला आहे.

नवऱ्याच्या ऑफिसमधील सहकाऱ्याच्या बायकोने एका रविवारी मला फोन केला. मुलाला पहिलीत घालायचं आहे तर, कोणत्या बोर्डाचा विचार करावा, याबद्दल माझं मत जाणून घ्यायला ती उत्सुक होती. स्टेट बोर्ड की दिल्ली बोर्ड त्यातही ICSE, CBSE की IB याबाबत तिच्या मनात गोंधळ उडाला होता. माझी मुलगी ICSEला असल्याने माझा अनुभव तिला जाणून घ्यायचा होता –

ती : शाळेची ॲडमिशन कशी झाली? काय त्रास झाला?

मी : काहीच त्रास झाला नाही. उलट सहज झाली तिची ॲडमिशन.

ती : डोनेशन किती होतं?

मी : एकही पैसा नाही. नुसती फी.

ती : असं कसं? हां, तुम्ही मीडियात काम करत असल्याने तुमच्याकडून डोनेशन घेतलं नसेल

मी : अहो, तसं नाही. कोणत्याच पालकांकडून नाही घेतलं डोनेशन.

ती : मग छुप्या पद्धतीने घेतलं असेल. म्हणजे बिल्डिंग फंड, चॅरिटी वर्क वगैरे.

मी : नाही. तसंही काही नाही. उलट शाळेत भरलेल्या प्रत्येक पैशाची योग्य ती पावती मिळालेली आहे. अगदी फी भरायला उशीर झाला तर, जो दंड भरावा लागतो त्या पाच रुपयांचीही पावती शाळेने दिलेली आहे.
(समोर काही क्षण शांतता. ही गोष्ट पचनी पाडून घेण्यासाठी लागलेला तो कालावधी होता, हे सहज लक्षात आलं.)

ती : पण शाळेने वह्या, पुस्तकं, युनिफॉर्म शाळेतूनच घेण्याची सक्ती केली असेल.

मी : कधीच नाही. पण शाळेने ती सोय उपलब्ध करून दिली असल्याने एकाच वेळी या सगळ्या गोष्टी मिळत होत्या. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत झाली. शिवाय, यातून मिळालेला पैसा परत शाळा आणि विद्यार्थी यांच्याचसाठी खर्च केला जातो.

ती : पण या मुलांना प्रोजेक्ट खूप असतात. त्यांचा सगळा वेळ त्यातच जातो आणि शेवटी अनेकदा आपल्यालाच तो पूर्ण करावा लागतो.

मी : अहो, दर आठवड्याला नसतो असा प्रोजेक्ट. महिन्यातून एक असतो. बाकी वेळेला क्लास-टेस्ट असतात.

ती : नाही, पण प्रोजेक्ट असतोच नं. कामावरून परत आल्यावर घरातली कामं सोडून याची प्रोजेक्ट करून द्यायला लागतात.

मी : माझ्या मुलीच्या शाळेत प्रत्येक टर्मच्या पहिल्या दिवशी संपूर्ण सहा महिन्यांचं टाइमटेबल मिळायचं. त्यात कोणत्या महिन्यात कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीज् होणार, क्लास-टेस्ट होणार किंवा प्रोजेक्ट कोणत्या विषयावर होणार आणि ते कधी शिक्षकांकडे द्यायचं, याची माहिती असायची. त्यामुळे आम्हालाही ते खूप सोपं व्हायचं. प्रोजेक्टची आज माहिती द्यायची आणि लगेच ते उद्या घेऊन या, असे प्रकार कधी झाले नाहीत.

ती : पण आठवड्यातले दोन तास तरी यासाठी बाजूला ठेवून द्यावे लागतील, असं मला वाटतं. बरं आतापर्यंत या अशा प्रोजेक्टसाठी तुम्हाला किती खर्च आला?

मी : (बापरे. याचा हिशोब आपण कधी केलाच नाही.) नाही हो, असा कधी हिशोब केला. माझ्या नणंदेने तिच्या मुलाच्या प्रोजेक्टसाठी आणलेलं मटेरियल जपून ठेवून माझ्या मुलीसाठी पाठवून दिलं. त्यामुळे त्याची खूप मदत झाली.

ती : अच्छा… मग ट्यूशन क्लास?

मी : आठवीपर्यंत मुलीने घरीच केला अभ्यास. नववीत आल्यावर ट्यूशनला जायला लागली.

ती : कोणत्या? अमुक क्लासला (दोन-तीन मोठ्या क्लासेसची नावं घेतली) जाते का?

मी : नाही हो. इथे जवळ आहे तिचा क्लास. पण प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. जाण्या-येण्याची दगदगही वाचते.

ती : फी किती आहे क्लासची?

मी : (फीची रक्कम सांगितली)

ती : अरे, म्हणजे फारच स्वस्तात झालं तुमच्या मुलीचं एकूण शिक्षण.

मी : (यावर कोणती प्रतिक्रिया द्यायची या संभ्रमात) बरोबर म्हणालात. फारच स्वस्तात झालं मुलीचं शिक्षण. पण तुमच्या मुलासाठी नीट विचार करूनच प्रवेश घ्या हं.

फोन बंद.

toyashara@gmail.com

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप छान. सर्व गोष्टी कथन न करता वाचकांना विचार करायला लावला.भाषा तर खूपच छान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!