चंद्रशेखर माधव
साधारण 1985-86 सालातली गोष्ट असावी. मी पाचवी किंवा सहावीत होतो. आम्ही, (आम्ही म्हणजे मी, आई-वडील आणि भाऊ) आसामच्या सहलीला गेलो होतो. आमचे काका सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर गुवाहाटीमध्येच स्थायिक झाले होते.
आसाममध्ये तसेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे बरीचशी आहेत. एकूणच उत्तर-पूर्व (ईशान्य) भारताला निसर्गाची मोठी देणगी लाभलेली आहे.
पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास करणार असल्यामुळे आम्ही दोघेही भाऊ खूप उत्साहात होतो. त्याकाळी पुण्याहून गुवाहाटीला थेट रेल्वे नव्हती. त्यामुळे इथून मुंबई, मुंबईहून गुवाहाटी आणि त्याच मार्गे परत असा एकूण प्रवास ठरला होता. आसाममध्ये गेल्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क, कामाख्या मंदिर, शिलाँग अशी ठिकाणे बघायचा प्लॅन आधीच ठरला होता.
एकूण मिळून आमची ट्रीप फार छान झाली. सोबत इतरही काही नातेवाईक असल्यामुळे अजून मजा आली. परतीच्या मार्गावर येण्याचा दिवस जवळ आला. आम्ही गुवाहाटी स्थानकातून मुंबईला जाण्याकरिता रेल्वे पकडली. आसाम वगैरे परिसरात एकूणच पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यात आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत गेलो होतो आणि पावसाळा अगदी तोंडावर होता. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तसे ब्रह्मपुत्रा नदीला पूर आल्यामुळे येतानाच्या मार्गावरील बोंगाईगाव नावाच्या स्थानकाच्या थोडेसे पुढे ब्रह्मपुत्रा नदीवरील पूल हा पाण्याखाली गेला होता. साहजिकच त्या स्थानकात रेल्वे थांबली.
हेही वाचा – परतवून लावलेला दरोडा
रेल्वे बराच वेळ थांबून होती. थोड्यावेळाने असे कळले की, नदीपात्राला जोडणाऱ्या रेल्वे पुलाखालील खडी वाहून गेलेली आहे आणि ते काम व्हायला वेळ लागेल. नेमकं काय झालेलं आहे, हे कळल्यानंतर प्रवाशांमधील अस्वस्थता थोडीशी कमी झाली.
मुळातच त्याकाळी एकूण प्रवास तीन दिवस आणि दोन रात्र असा मोठा होता. त्यात ही समस्या उद्भवल्यामुळे आम्ही त्रासल्यासारखे झालो.
बोंगाई गाव हे स्टेशन अगदीच छोटं होतं. छोटं म्हणजे महाराष्ट्रातल्या पुण्याजवळ खडकी स्थानक जरा मोठं असेल, इतकं लहान होतं. तिथे जेमतेम एक किंवा दोनच दुकानं होती, ती मुख्यत्वे करून चहा आणि लहानसहान खाण्यापिण्याच्या पदार्थांची होती. त्यातून सगळा परभाषिक प्रदेश असल्यामुळे पेपर विकत घेऊन वाचता येईल, असंही नाही. गाडी तिथे थांबली ती सकाळची वेळ होती. सुरुवातीला काही तास मजेत गेले, पण जसजशी संध्याकाळ झाली, तसं आम्हा दोघा भावांना कंटाळा येऊ लागला. आमच्याकडे एक ‘चांदोबा’ होता. (आमच्या लहानपणी ‘चांदोबा’ या नावाने एक पाक्षिक, खास करून लहान मुलांकरिता प्रकाशित होत असे.) एक ‘चांदोबा’ होता म्हणजे अक्षरशः एकच चांदोबा होता. दुपारपासून आम्ही दोघे भाऊ एकाआड एक तो चांदोबा पुन्हा पुन्हा वाचत होतो. संध्याकाळ झाली तसे आम्ही खाली उतरलो आणि प्लॅटफॉर्मच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत दोन ते तीन वेळा चक्कर मारून आलो, असं करून कसातरी तो दिवस काढला. ‘काढला’ म्हणजे ‘ढकलला’ म्हणा ना!
हेही वाचा – ब्लेझर आणि 45 दिवस
दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वे पुढच्या प्रवासाला कधी निघेल, याची माहिती घेतली तेव्हा असं कळलं की, पुरामुळे एकूणच खूप नुकसान झाले असल्यामुळे अजून 24 तास तरी नक्की लागतील. मग काय…? उपाय तर काहीच नव्हता, कसंबसं आम्ही तोही दिवस काढला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 ते 4.30च्या सुमारास आमच्या गाडीने प्रस्थान केले. मुळातच गुवाहाटी ते मुंबई या प्रवासाला तीन दिवस / दोन रात्री लागत असत, त्यात आमची गाडी सुमारे 36 तास लेट, म्हणजे साधारण एक आठवडाभर आम्ही रेल्वेतच होतो.
चौथ्या दिवशी सकाळनंतर जशी गाडी महाराष्ट्रात आली तसं आम्हाला जरा हायसं वाटलं. दूरच्या मार्गावरील सर्व गाड्यांना पॅन्टरी कार असे. पण मुळातच प्रवास इतका लांबल्यामुळे गाडीतला शिधा संपत आला होता. शेवटच्या दिवशी तर, रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘दोन-तीन लोकांमध्ये जेवणाचे एक ताट’ अशाप्रकारे रॅशनिंग करावे लागले. नाईलाज असल्यामुळे आम्ही प्रवाशांनीही त्यातच ‘भागवले’. अशाप्रकारे सुमारे एक आठवड्यानंतर आम्ही मुंबईत पोहोचलो. बाकी एकूण आसाम प्रवास छान झाला होता, पण ही संपूर्ण ट्रिप आम्हाला आयुष्यभर या घटनेमुळेच जास्त लक्षात राहिली.