Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पुल : व्यक्ती की आनंदयात्री?
    अवांतर

    पुल : व्यक्ती की आनंदयात्री?

    Team AvaantarBy Team AvaantarJune 12, 2025No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीसाहित्य, मराठीलेख, मराठीस्टोरी, PL, Deshpande, personality, पुल, पुल_देशपांडे
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    पुल स्पर्श होताच दुःखे पळाली,
    नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
    निराशेतून माणसे मुक्त झाली,
    जगू लागली, हास्यगंगेत न्हाली

    असं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे, त्या पु. लं.ना जाऊन आज 25 वर्षे झाली. 8 नोव्हेंबर 1919 साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य तर होतंच, पण त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज तसेच माणुसकी कायमच दिसून आली. अशा या पुलंना दोन मिनिटांसाठी प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता तो रत्नागिरीच्या समुद्रकिनारी. कोळंब्याहून रत्नागिरीला होडीने प्रवास करून आम्ही किनाऱ्याला लागत होतो आणि समोर साक्षात सुनीताबाई आणि पुलं. त्यांनीही आमची आपुलकीने चौकशी केली. कुठून आलात, आता पुढचा मुक्काम कुठे वगैरे अशा गप्पा मारण्यासाठीही त्यांना कोणत्याही ओळखीची गरज आहे, असं कदाचित वाटलं नसावं.

    ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’ असं लांबलचक बिरुद पुलंना अनेक वर्षांपासून चिकटलेलं होतं. मराठी भाषिकांनीच उत्स्फूर्तपणे त्यांना ही पदवी दिलेली होती, असं म्हणणं जास्त सयुक्तिक होईल. अर्थात, जनतेने दिलेल्या या अनौपचारिक पदवीचं मोल सरकारी सन्मानांपेक्षा जास्त मोठं होतं. म्हणूनच तर ना. सी. फडके यांनीही पुलंना लिहिलेल्या पत्रात “सर्वांत अधिक लोकप्रिय साहित्यिक या किताबावर गेली कित्येक वर्ष तुम्ही अविवाद्य हक्क गाजवीत आला आहात…” असं लिहून एकप्रकारे त्यांचा गौरवच केला होता.

    निरनिराळ्या वयोगटातील, व्यवसायातील, ग्रामीण, शहरी, देश, विदेश अशा सगळ्या ठिकाणी पुलंची लोकप्रियता व्यापून राहिली होती. म्हणूनच तर पुलंना दररोज येणाऱ्या सरासरी 25 पत्रांमध्ये नुकतीच शाळेत अक्षर ओळख झालेल्या छोट्या मुलांपासून ते बालगंधर्वांचा काळ बघितलेल्या वृद्धांपर्यंत, प्लंबर किंवा पोस्टमनपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांच्या पत्रांचा समावेश होता. यातल्याच एका पत्रात एका छोट्याने ‘पुल आजोबा, हत्तीला शेपूट लावण्यात माझा पहिला नंबर आला!’ असं सांगून पुलंबरोबर आजोबा नातवाचं नातं देखील जोडलं होतं.

    सतीश सोहनी हा मराठी युवक चिनी युद्धाच्या वेळी संरक्षण खात्यात वायरलेस ऑपरेटर-कम-मेकॅनिक म्हणून काम करत होता. त्यावेळी एक महत्त्वाची बातमी पोहोचवण्याच्या विशेष कामगिरीवर तो होता. मात्र, कामगिरी आटोपून परत येताना तो शत्रूच्या गिळंकृत प्रदेशात अडकला. त्यावेळी 17 ते 24 नोव्हेंबर 1962 या काळात त्याचं पोषण झालं ते पु. ल. देशपांडे यांच्या ‘दीपावली’ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘माझे खाद्यजीवन’ या लेखावर. कोल्हापूरच्या कर्नल जाधवांनाही हिमालयातील एकाकी वास्तव्यात पु. लं.च्याच वाङ्मयाने साथ दिल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. तर, ‘व्हायरल इन्फेक्शस पॉलिन्युरॉसिस’ या आजारामुळे मज्जायंत्रणा कोलमडून पडलेल्या उदय फाटक यांना पु. लं.च्या कथाकथनांनी नवसंजीवनी दिली आणि चार महिन्यांत तो खडखडीत बरा झाल्याचं पत्र त्यांच्या आईने पु. लं.ना पाठवलं होतं. पुलंचं निधन झाल्यानंतर पार्ल्यात त्यांच्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाला भेट देणारे असंख्य पुलप्रेमी ओक्साबोक्शी रडतानाही मी बघितले. आपल्याच घरातलं जवळचं माणूस गेल्यासारखं दु:ख या वाचकांना झालं होतं.

    हेही वाचा – गोष्ट माझ्या शिरा आजीची

    ढवळे प्रकाशन संस्थेतर्फे आयोजित ग्रंथ जत्रेच्यावेळी आलेल्या वाचकांची पाहणी करून त्यांचा ‘सर्वांत आवडता लेखक कोणता?’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पुलंना अव्वल दर्जाचं स्थान मिळालं होतं. इतकंच नाही तर, बालशिक्षण आणि मानसशास्त्र यात रमलेल्या राणी उपाध्ये यांनी बोर्डी, वसई, पार्ले, माटुंगा आणि परळ या भागांतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन प्रक्रियेची पाहणी केली आणि जवळजवळ सर्वच म्हणजे 778 मुलांनी पुलं हे आपले आवडते लेखक असल्याचं नमूद केलं. दिल्ली बोर्डाच्या मराठी विषयाच्या पुस्तकांमध्येही आठवीत ‘बटाट्याची चाळ’मधील ‘उपास’ तर नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘विठ्ठल तो आला आला’ ही एकांकिका अभ्यासाला आहे आणि वैयक्तिक अनुभव असा आहे की, या तिन्ही इयत्तांमधील विद्यार्थी हे दोन धडे शिकताना प्रचंड उत्साही असायचे. त्यातील विनोदांना बरोबर दाद द्यायचे. अगदी अमराठी विद्यार्थ्यांनाही हे दोन धडे समजून घेताना कुठेही कधीही अडचण आली नाही. ही पुलंच्या लेखनाची ताकद होती.

    ‘पुल’ या व्यक्ती इतकंच त्यांच्या वास्तव्याने मुंबईतील विलेपार्ले, टिळक मंदिर, 5 अजमल रोड ही ‘पुलकित’ स्थळं बनली आहेत. आजही पार्ल्यात आलेली व्यक्ती या ठिकाणी दिलेल्या नुसत्या भेटीनेही भारावून जाते. एक राष्ट्रीयीकृत बॅंक पुलंचं आपल्या शाखेत खातं आहे, हे पाहून त्यांना सौजन्याने एक पत्र पाठवायची. “आपलं आमच्या शाखेतलं खातं आम्ही पैशाचं मानीतच नाही. ते आमच्या आनंदाचं खातं आहे. आपण वेळोवेळी शाखेला भेट देऊन त्यात सातत्याने भरच टाकीत असता….” सरकारी बॅंकेकडून इतक्या साहित्यिक भाषेतील पत्र हे फक्त पुलंच्याच बाबतीत घडू शकलं.

    व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णनं, गद्य आणि पद्य विडंबन, ललित निबंध, बालवाङमय, भाषांतरीत साहित्य, वैचारिक वाङमय, नाटकं, एकांकिका, वक्तृत्व, संगीत, अभिवाचन, अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, सांस्कृतिक कार्य यांच्याबरोबरीने सामाजिक जाणीवेतून झालेलं दातृत्वाचं ‘मुक्तांगण’ हे सगळे गुण फक्त एकाच व्यक्तीमध्ये ठासून भरलेले होते ते म्हणजे पु. ल. देशपांडे! पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानने निरनिराळ्या लोकोपयोगी कामांना लक्षावधी रुपयांची मदत दिली. याशिवाय खासगी पातळीवर उत्स्फूर्तपणानं सहजासहजी केलेली आर्थिक मदत प्रतिष्ठानच्या हिशेबात कधीच दिसून आली नाही. यात एखाद्या साहित्यिकाची आर्थिक अडचण, त्याच्या बायकोचं बाळंतपण, आजारपण अशा अनेक वेळी पुल आणि सुनीताबाई यांनी भक्कम आधार दिला.

    खरंतर, आयुष्याच्या प्रदीर्घ वाटचालीत आपल्याला सर्वांत जास्त आनंद दिला तो संगीताने असं पुलंचं मत होतं. वाचकांना मात्र पुलंच्या व्यक्तिचित्रांनी सर्वांत जास्त आनंद दिला. इतकंचं नाही, पुलंचं सर्वात दीर्घायुषी साहित्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. अंतू बर्वा, सखाराम गटणे, नंदा प्रधान, नारायण, चितळे मास्तर या व्यक्तिरेखा मराठी वाचक विसरणं शक्यच नाही. यातील अनेक व्यक्तिचित्रे पूर्णतः काल्पनिक. त्यात रंजकता आणण्यासाठी कुठेही ओढूनताणून विनोदाचा वापर नाही. तरीही, या व्यक्तिरेखा प्रयोगरूपाने रसिकांसमोर आल्या. आधी मराठी रंगभूमीवर आणि काही काळापूर्वी हिंदी मालिकेच्या रूपात. हीच त्या व्यक्तिरेखांची जादू आहे. “मला या ‘जीवन’ वगैरे शब्दाची भयंकर धास्ती वाटते. जगण्याला ‘जीवन’ म्हणावं अशी माणसं हजार वर्षांतून एकदा जन्माला येतात…” ‘व्यक्ती आणि वल्ली’ या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकातल्या सखाराम गटणेच्या प्रकरणातील हे वाक्यं.

    हेही वाचा – संवेदनशील साहित्यिक… पी.व्ही. नरसिंह राव

    व्यक्तिचित्रांबरोबरच मराठी वाचकांना पुलंच्या प्रवासवर्णनांनी भुरळ घातलेली दिसून येते. एक नवीन जग पुलंनी वाचकांसमोर उलगडलं. खरंतर, ते जग जुनं होतं, पण पुलंच्या नजरेनं आणि शैलीने त्यांना नवत्व बहाल केलं. पुलंच्या या प्रवासवर्णनांची ‘अपूर्वाई’ म्हणूनच अजूनही कमी झाली नाही, ती कदाचित याच कारणामुळे.

    “जगभरच्या अनेक देशांत देशस्थ होऊन फिरले पण मनातील मराठीपणा कधीच मावळला नाही – दुनियेच्या बाजारपेठेत मनमुराद वावरले पण काळजातील बुद्ध कधी काजळला नाही” पुलंच असं वर्णन केलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी. पुलंचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जरी आज आपल्यात नसलं तरी, त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या साहित्यातून ते अजरामर झाले आहेत. आज समाज माध्यमांवर पुलप्रेमींनी एकत्र येऊन त्यांच्याच नावाने अनेक ग्रुप तयार केले आहेत. फक्त पुलंच्याच साहित्यावर आधारित हे ग्रुप आहेत. अनेकदा एखाद्या घटनेवर भाष्य करताना, ‘जर पुलं असते तर त्यांनी काय म्हटलं असतं’ हेसुद्धा अनेकदा समाज माध्यमांमध्ये फिरताना दिसून येतं. याचाच अर्थ, आजच्या पिढीलाही पुलं तितकेच आवडतात, जितके ते आधीच्या पिढ्यांना आवडत होते.

    ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ सारख्या चित्रपटामुळे नवीन पिढीलाही पुलंबद्दल जाणून घेता आलं, त्यातून त्यांच्याबद्दल अधिक समजून घेता आलं. या चित्रपटामुळे पुलंचं साहित्य वाचायला सुरुवात केलेले अनेक विद्यार्थी मला जवळून पाहता आले. महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून गेलेल्या पुलंना मराठी अभ्यासक्रमात ज्ञानेश्वर दोन गुणांसाठी असताना आपलं साहित्य किती गुणांसाठी आहे, हे विचारण्याची हिंमत झाली नव्हती. पण काळाच्या ओघात पुलंचं साहित्य आणि पुलं आजही प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या मनात तितकेच जिवंत आहेत.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026 अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    By सुधीर करंदीकरMarch 23, 2026

    जागतिक आनंद दिन (International Day of Happiness) दरवर्षी 20 मार्चला जगभर साजरा केला जातो. लोकांना…

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न…

    March 24, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 246
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn