Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeअवांतरघासबाजारचे ‘काली टोपी सामंत’

घासबाजारचे ‘काली टोपी सामंत’

 

शशी सामंत

मुंबईचा माणूस कधी स्वस्थ बसत नाही. मी सुद्धा तसाच! कामाशिवाय इतर गोष्टी करायला वेळच पुरत नसतो. क्रिकेट, सिनेमाची आवड हळूहळू कमी होत गेली आणि दोनेक वर्षांपूर्वी मोकळा वेळ मिळत गेला, तो फक्त मी गंभीर आजारी झाल्यावरच! सोबतीला कोरोनाची साथ पिच्छा सोडत नव्हती. औषधे, गोळ्या घेणे आणि घरातच जखडून बसणे, याशिवाय वेगळा कार्यक्रमच नव्हता. टीव्हीवरच्या पाणीदार कार्यक्रमाची आवड मुळातच नव्हती. शरीराला हालचाल नव्हती, निदान डोक्याला तरी काम मिळावं म्हणून लिहायला सुरुवात केली. आठवेल ते पण क्रमवार लिहित गेलो. आयुष्यभर कधी टायपिंग केलं नव्हतं, पण तेही प्रयत्नाने आत्मसात केले.

वाचनाची आवड जुनीच. मराठी-इंग्लिशमधली पुष्कळशी आत्मचरित्रे वाचून झाली होती. पण त्यातली ती सर्व माणसे कुठे ना कुठे यशस्वी होती. ते लोक कसे घडले वा घडवले गेले ते वर्णन होते. पण आयुष्यभर मेहनत करून फारसे यशस्वी नसलेल्यांचे काय? त्यांचीही एक Story असतेच ना! त्यांचाही एक प्रखर संघर्ष होताच. त्यात एक माझे वडीलही होते, नाना… त्यांचा मुलगाच असल्याने, त्यांची जगण्याची धडपड, अथांग मेहनतीचा मी साक्षीदार होतो.

नानांना घासबाजारात याच नावाने ओळखत, ‘काली टोपी’! त्या काळात कोकणातील बामण काळी टोपीच घालत. बामणांचे ते खास चिन्ह असावे. साधारणत:, आमचे मोठे काका, बापूकाका तर टोपीच बनवून विकायचे. एका सामंताने टोपीचा खूप मोठा व्यापार केला, कपडा बाजारात दोन माळ्याचे दुकान होते. तर, दुसऱ्याचे नावच अनंत शिवाजी टोपीवाले होते. आमच्या कुडाळदेशकरात सर्वात श्रीमंत!

आमचे वडील नाना म्हणजे डोक्यावर टोपी, अंगात शर्ट, त्याच्या आत खिशाखिशांची बंडी, धोतर आणि पायाखाली सायकल… वरच्या खिशात शिवाजी विडी बंडल आणि तोंडात पान… घासबाजारातील कोटकर चाळ सोळा खोल्यांची, त्यात एक आमची खोली आणि खाली पानसुपारीचे दुकान… विडीची गादी. भायखळ्याला आणखी एक गादी होती. तिथला स्टोन बिल्डिंगमधला शेट नानांचा मित्र म्हणून अशीच धंदा करायला दिलेली. दोन रुपये दिवसाला भाडे, पण लिखापढी काही नाही! मात्र खटाव मिलच्या शेजारी असल्याने चांगली चालायची. तिथे नाना दुपारपर्यंत बैठक करीत. दुपारी जेवणाला घरी येत. वामकुक्षी करून पुन्हा दुकानावर जात ते रात्री येत. रोजच्या रोजच, सुट्टी नाही…

मधेच केव्हातरी सर्वांना सिनेमाला न्यायचे, सहकुटुंब. व्ही. शांताराम आवडता, मग शकुंतला, दो आँखे बारह हाथ, नवरंग, स्त्री (remake of Shakuntala), शिवाय मराठी शेवग्याच्या शेंगा, जशास तसे, वहिनीच्या बांगड्या, लाखाची गोष्ट वगैरे सिनेमे सहकुटुंब पहायचे… व्हिक्टोरियातून जायचे आणि यायचे. पण शांतारामाचा सिनेमा तीन वेळा तरी पाहायचो! याच सुमारास आणखी दोन दुकाने झाली. भायखळा आणि आग्रीपाड्याला… ती भाडेतत्वावर चालवायला दिली होती. नाना दोन दुकाने सांभाळत, तरी नानांचा टच सर्व दुकानावर असायचा.

घासबाजारात मी चौथीपासून बैठक करायचो. दुकानदार शिकवायचे. सुपारी तंबाखुची फुगीर पुडी बांधणे, सिगरेटचे ब्रँड ओळखणे, नागवेलीच्या पानांचे देठ कापणे, शिवाय ग्राहकांचे माल घेतल्यावर उरलेले पैसे कसे उलटे मोजून द्यायचे… वगैरे, वगैरे.

तेवढ्यात वेळ काढून नाना शिर्डीला जायचे, परूळ्याला आदिनारायणाला जायचे. बहिणीला बिबवण्याला भेटायचे, तेव्हाच सासरी पिंगुळीला धावती भेट… मळगावात एकादशणी करायचे, उरलेल्या पैशात भावाच्या दुकानात माल भरायचे. त्यांचे रडीमेड कपड्यांचे दुकान सदा खालीच!

हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…

मुंबईला आल्यावर एवढी धडपड, एवढी कामे असताना, विडी दुकानातील बारा टक्का फायद्यात काय मजा नाही म्हणून भायखळ्याच्या शेटकडून दोन ट्रक भाड्याने घेतले! तेव्हा दोस्तीखाते जोरात चालायचे. नुसत्या शब्दालाही फार किंमत होती. ‘तू मागितले, मी दिले,’ असे चालायचे. ट्रकच्या व्यापारात घुसले… खरंतर, त्यांना यातली फारशी माहिती पण नव्हती; पण आजूबाजूच्या कंपन्यांतील माल ट्रकने बाहेरगावी जातो आणि येतोही… तिथे ओळखी काढून माहिती काढली आणि ऑर्डर्स मिळवल्या. ट्रकचा प्रवास सुरू झाला. पन्नासच्या दशकाच्या अखेरीस, संपूर्ण भारतभर ट्रक वाहतूक व्हायची. रेल्वेचा पसारा फार मोठा नव्हता. रेल्वे जात नसेल तिथे ट्रक जात असत. लहान लहान, आडबाजूच्या गावात ट्रकनेच वाहतूक सोईस्कर व्हायची.

ट्रकचा व्यापार हळूहळू सुरू झाला. मालाची ने-आण सुरू झाली. वेगवेगळ्या दिशेने, वेगवेगळ्या शहरात माल पोहोचत होता आणि आणलाही जात होता. ड्रायव्हरवर सर्व विसंबून असायचे. तो हिशेब देईल तेच खरे मानायचे. खास करून रिपेअरींग आणि इंधनात नेहमी घोळ असे. तिथे मालक काही करू शकत नसत…

काही दिवसांनी त्याना ट्रकबरोबर जायची हुक्की आली… एक नवीन अनुभव घेण्यासाठी आणि धंदा आणखी समजून घेण्यासाठी! खास करून, येताना ट्रक रिकामा येऊ नये, यासाठी काही प्रयत्न करण्याच्या उद्देशाने ट्रकबरोबर जायचे ठरवले. वास्तविक, मालक कधी ट्रकबरोबर जात नसायचा. ड्रायव्हरवर अविश्वास दाखवण्यासारखे होते. म्हणून मालक जात नसतो, हा संकेत आहे, पण ते गेले!

हेही वाचा – एका लाडवाची गोष्ट!

नाशिकच्या आसपास कुठेतरी गेले होते. एक भाडे संपवून येताना बांबूचे भाडे घेतले. बांबू ने-आण करायला खूप कठीण आणि त्यावेळचे रस्तेही खडीचे, वळणा-वळणाचे होते, त्यामुळे गाडीचा वेग मंद असे. लांबलचक बांबू… ट्रकच्या पुढे आणि मागेही लटकत असताना ड्रायव्हिंग करणे सोपे नसायचे. पण मोबदला, भाडे जास्त मिळायचे. येताना वाटेत शिर्डी लागत होती, साईबाबांची शिर्डी… नाना तर भक्त होते. पण बांबूचे कठीण भाडे नाशिकला संपवून, नाशिकहून येताना बाबांचे दर्शन घेऊ म्हणत पुढे गेले. ड्रायव्हरनेच तसे सुचवले होते. रात्रीची वेळ. त्या सत्तावनच्या वर्षांत रस्तेही फारसे चांगले नसायचे. पण येतानाची वेळ आलीच नाही. पहाटेला कधीतरी तरी ट्रक गोदावरीचा पूल तोडून नदीत कोसळला. अंधारात काही कळेपर्यंत लांब बांबूमुळे ट्रक उभाच्या उभा कमी पाण्याच्या नदीच्या पात्रात घुसला. भयंकर जखमी होऊन दोघेही बेशुद्ध झाले. शुद्धीत आल्यावर देवाचा धावा केला, वाचव आता… देवही पावला म्हणायचा! अन्य एका ट्रकवाल्याने त्यांना मुख्य रस्त्यावर आणून सोडले, कुणीतरी भल्या माणसांनी नंतर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला नेले.

ते दिवस खूप त्रासाचे गेले. डॉक्टर हजर नसायचे, नर्सेस लक्ष देत नव्हत्या. वॉर्डबॉय तर पैसे घेतल्याशिवाय पाणीपण आणत नव्हते. सगळाच सरकारी अनागोंदीचा कारभार. सरकारी हॉस्पिटल त्या काळात अशीच बेशिस्त असायची!

क्रमश:


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!