हर्षा महाबळ देशपांडे
लहानपणी आजीने बक्षीस म्हणून दिलेली रावळगावची गोळी… एखादं चांगलं काम केलं म्हणून आईने लाडाने केलेला शिरा… बाबांची पाठीवर मिळालेली शाबासकी… बहिणीला प्रोजेक्टमध्ये मदत केल्यावर तिच्या डोळ्यात दिसलेली चमक… आपल्यावर टाकलेली एखादी जबाबदारी नीट पार पाडल्यावर शाळेतल्या शिक्षकांकडून मिळणारी कौतुकाची थाप… मैत्रिणीने आपल्यासाठी ओंजळीत आणलेली बकुळीची फुले… आपल्याला आवडतं म्हणून सुट्टीत हॉस्टेलमधून घरी गेल्यावर शेजारच्या काकूंनी करून आणलेली त्यांच्या हातची भाजी… आपल्या लाडक्या ताईसाठी शोधून शोधून आणलेलं पुस्तक तिला देताना तिच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव…
लहानपणी किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असायचा नाही! खूप महागाची वस्तू बक्षीस मिळण्याचे दिवस नक्कीच नव्हते. न तेव्हा कोणाकडे इतके पैसे खर्चायला असायचे… पण तरीही बालमन त्यातही खूश व्हायचे. खूप अपेक्षा कोणी वाढवून पण ठेवल्या नव्हत्या. आपल्या लहान बहिणीने तिच्या लहानग्या मुठीत दाबून आठवणीने आपल्यासाठी आणलेला प्रसादाचा पेढा त्याच्या चवीहून कितीतरी पटीने गोड लागायचा.
वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट द्यायचे दिवस तेव्हा यायचे होते. लग्नात आहेर म्हणून पाकीट किंवा फारतर एखादा डिनर सेट दिला जायचा. आईने माहेरची आठवण म्हणून दिलेली वर्ष घडीची साधी हिरवी साडी सुद्धा कुठल्याही पैठणीपेक्षा मोलाची वाटायची, एखाद्या नववधूसाठी! मोठ्या बहिणीसाठी आणलेली शाळेची पुस्तकं पुढच्या वर्षी लहान भाऊ कोणतीही तक्रार न करता वापरायचा. किंबहुना, त्यात काही गैर आहे हे मनातही यायचे नाही कोणाच्या!
हेही वाचा – मुलांच्या मनात ठसवा, ‘आम्ही आहोत’
पण मग असं काय झालं की, या सगळ्या गोष्टींची आपल्याला आता किंमत वाटेनाशी झालीय. मला वाटतं याचं एक कारण म्हणजे हातात आलेला पैसा आणि त्यामुळे बदललेली मानसिकता, वस्तूंची सहज availability… मला माझ्या लहानपणी मिळालं नाही म्हणून मी माझ्या मुलाला किंवा मुलीला गरज नसताना आणून दिलेल्या वस्तू. यामुळे होतंय काय की, कोणालाच आता वस्तूंची म्हणा, भावनांची म्हणा कदर राहिली नाहीये. प्रत्येक गोष्टीला आपण त्याच्या लेबलवर तोलू लागलोय. मला अमुक एकाने एवढ्याचं गिफ्ट दिलं म्हणून मी त्याला त्याहून मोठं गिफ्ट देणार, याची जणू स्पर्धाच लागली आहे. मुलांना तर एवढ्या वस्तू सहज मिळाल्या आहेत की, प्रत्येक घरात स्टेशनरी दुकान चालू होऊ शकतं. माझ्या मित्राने या ब्रँडचा phone घेतला म्हणून मी पण घेणार; मग त्याची मला गरज असो वा नसो… अशा प्रकारची वृत्ती वाढीला लागली आहे.
सगळीकडे असं चित्र दिसत असताना आपण काय करू शकतो बरं? त्यासाठी खास प्रयत्न करायची तयारी ठेवायला लागेल. आपल्या आई-बाबांसाठी surprise म्हणून फक्त त्यांच्यासाठी वेळ काढून घरी छान गप्पा मारून बघा. आपल्या जोडीदाराला anniversary gift म्हणून स्वतःच्या हाताने एखादं ग्रीटिंगकार्ड देऊन बघा. आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला पत्र पाठवून बघा. कोणत्याही whatsapp forward messageला याची सर येणार नाही. मुलांना महागड्या मॉलमध्ये नेऊन तिथल्या प्ले-एरियामध्ये खेळायला लावण्यापेक्षा त्यांच्याबरोबर ग्राऊंडवर खेळून बघा. या सगळ्यात मिळणारा आनंद आणि आई-बाबांनी माझ्यासाठी वेळ काढला ही भावना मुलांना खूप काही देऊन जाईल.
चला तर मग… छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद टिपायला आणि वाटायला सुरुवात करूया!
हेही वाचा – शिक्षा नको, सुसंवाद हवा