मनोज
गाण्यांचा विषय हा न संपणारा आहे. त्यातही हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ अन् त्यावेळचे रथीमहारथी गायक-गायिका… शब्दांची अतिशय उत्तम जाण असलेले गीतकार आणि प्रत्येक वाद्याचा यथायोग्य वापर करणारे संगीतकार यांची तर साथ होतीच. त्यामुळे ती गाणी श्रवणीय ठरली. भले व्हॉट्सअॅपवर त्यावेळचं अमुक गाणं, अमुक एका पाश्चात्य गाण्याची कॉपी आहे, असं जरी व्हायरल होत असलं, तरी ‘आवाज’ ही बाजू भक्कम आहे ना!
लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मन्ना डे, गीता दत्त, सुरैया, तलत मेहमूद, शमशाद बेगम… शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, नौशाद, सलील चौधरी, वसंत देसाई, सी. रामचंद्र, रोशन, आर. डी. बर्मन, कल्याणजी आनंदजी… कवी प्रदीप, शकील बदायुनी, कैफी आझमी, साहीर लुधियानवी, शैलेंद्र, मजरूह सुल्तानपुरी, आनंद बक्षी, गुलझार, जावेद अख्तर… कुणाकुणाची नावं घ्यायची. सर्वांचंच योगदान अमूल्य आहे.
त्यातही प्रत्येकाची खासियत वेगळी, शैली वेगळी. त्यामुळेच काही गाणी अशी आहेत, की ती ऐकल्यावर ‘हे गाणं या गायकासाठीच होतं,’ असंच म्हणावं लागतं. अगदी सांगायचंच झालं तर, ‘आनंदमठ’मधलं ‘वंदे मातरम्’ गाणं. लता मंगेशकर यांनी ते एवढं अप्रतिम गायलंय! ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ हे गाणंही ऐकायचं ते लताबाईंच्या आवाजतलंच.
तसंच आशा भोसलेंचं ‘आईये मेहरबान…’ गाणं… ‘हावडा ब्रीज’ या चित्रपटातील हे गाणं मधुबालावर चित्रीत आहे. आता आशाताईंनी मधुबालाला डोळ्यासमोर ठेवून हे गाणं म्हटलंय की, आशाताईंच्या लाडीक आवाजाला मधुबालानं अभिनयातून न्याय दिलाय, हे सांगणं कठीणच आहे. तसंच ‘मेरे सनम’ चित्रपटातलं ‘ये है रेशमी जुल्फों का अंधेरा…’ हे गाणं आशाताईंच्या उत्कृष्ट गाण्यापैकी एक म्हणावं लागेल.
‘इना मिना डिका…’, ‘चला जाता हूँ…’, ‘नखरेवाली…’, ‘सी ए टी कॅट…’ अशा अनेक गाण्यांसाठी किशोर कुमारच हवा. अशी किती गाणी सांगायची? त्यांच्या यॉडलिंगमुळं अनेक गाणी सुपरहीट ठरली. ‘झुमरू’ हा सिनेमा त्याचं उत्तम उदाहरण आहे. संवादही सुरात बोलण्याचे कसब किशोरदाकडेच होते. मेरी प्यारी बिंदू… याला काय म्हणाल? हीरो म्हणून स्क्रीनवर त्याला गाताना पाहणे म्हणजे डबल मेजवानीच म्हणावी लागेल. ‘हाफ तिकीट’ चित्रपटातील ‘आँखों में तुम..’ हे गाणं अशावेळी आठवणारच!
किशोर कुमार यांच्याप्रमाणेच शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या मोहम्मद रफी यांची अनेक गाणी लोकप्रिय ठरली. ‘बैजू बावरा’ चित्रपटातील ‘ओ दुनिया के रखवाले…’ हे गाणं दुस-या कुणी गायकानं गायलंय, असा विचार करून पहा! (गायकही त्यावेळचाच, आताचा नाही) ‘पुकारता चला हूँ मैं…’, ‘मैं एक राजा हूँ, तू एक रानी है…’ ही गाणी देखील त्यांची खासियत, शैलीतलं वेगळेपण दर्शवणारीच आहेत. ‘मि. एक्स’मधलं ‘लाल लाल गाल…’ आणि ‘जब जब फुले खिले’ या चित्रपटातलं ‘तुमको हमपे प्यार आया…’ या गाण्यांचा वेग रफी यांनी खूपच मस्त सांभाळलाय. ‘तुमको हमपे प्यार आया…’ गाण्याचं शेवटचं कडवं ‘ब्रेथलेस’च आहे. बहुधा तशा प्रकारचं हिंदीतलं ते पहिलं गाणं असावं. पण ‘गुमनाम’मधलं ‘जान पेहचान हो…’ या गाण्याला मात्र थोडंस अडखळायला होतंच.
त्याचप्रमाणं हेमंतदांची ‘तुम पुकारलो…’, ‘या दिल की सुनो…’, ‘ये रात ये चांदनी फिर कहाँ…’ ही गाणी, मन्नादांची ‘कौन आया मेरे मन के द्वारे…’, ‘हम से आया न गया…’ ‘कस्मे वादे प्यार वफा…’, ‘ऐ मेरे प्यारे वतन…’ ही गाणी, तर तलत यांची ’जलते है जिसके लिए…’, ‘जायें तो जायें कहाँ…’, ‘फिर वही शाम…’, ‘शाम-ए-गम की कसम’ अशी किती गाणी मोजायची?
या सर्वांमध्ये महेंद्र कपूर यांचंही नाव घ्यावं लागेल. पण मोहम्मद रफी यांना ‘उस्ताद’ मानणारा हा गायक त्यांच्या छायेतून पूर्णपणे बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे त्यांनी गायलेली ‘भारत’ म्हणजेच मनोज कुमार यांची देशभक्तीपर गीते लोकांच्या जास्त स्मरणात आहेत. ‘हमराज’ आणि ‘गुमराह’ चित्रपटातील त्यांची गाणीही सुपरहिट आहेतच.
असे रथीमहाराथी असतानाही जगजीत सिंग, भूपिंदर सिंग, सैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर या गायकांनीही आपलं वेगळेपण जपलं.
विषय होता की, ‘या गाण्याला ‘हाच’ गायक न्याय देऊ शकला’, हा! हिंदी सिनेइंडस्ट्रीत तर ही सर्व जंत्री आहेच. पण मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, बस् एकही काफी है – सुधीर फडके आणि ‘गीतरामायण’! पुढे काही सांगायची गरज आहे?
‘नवशक्ति’मध्ये असताना एका संगीताच्या अभ्यासकानं सांगितलं होतं, की हा सुवर्णकाळ केवळ हिंदी चित्रपटसंगीतासाठीच नव्हता, तर जगभरातील संगीताचा तो सुवर्णकाळ होता. त्यामुळेच तर, त्यावेळी ‘ब्राऊन गर्ल इन द रिंग’ अन् ‘डॅडी कूल’फेम ‘बोनिएम’, ‘फंकी टाऊन’फेम ‘लिप्स इंक’ असे बॅण्ड देखील खूपच लोकप्रिय ठरले. असो, काहीही असो. पण तो काळ संगीताचा सुवर्णकाळ होता, एवढंच पुरेसं आहे!
avaantar3103@gmail.com