Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » कुत्रा पाळण्याचा पहिला संस्मरणीय अनुभव
    अवांतर

    कुत्रा पाळण्याचा पहिला संस्मरणीय अनुभव

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 9, 2025No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    #अवांतर, #मराठीकथा, #मराठीलेखन, #मराठीआवृत्ती, #मराठीसाहित्य, #मराठीलेखक, #मराठीमनोरंजन #मराठीवेबसाइट, #मराठीआर्टिकल, #मराठीस्टोरी, #श्वान, #कुत्रापालन, #प्राणीमित्र
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मंदार अनंत पाटील

    एकेदिवशी सोसायटीमध्ये खेळत असताना अचानक एक पोपट खाली बसलेला दिसला. पहिल्यांदा वाटले की, दाणे टिपायला खाली आला असावा; पण हळूच जवळ जाऊन बघितले तर तो जखमी असल्याचे लक्षात आले. त्याला अलगद उचलून घरी आणले. काही दिवस काळजी घेऊन तसेच ओषध-पाणी करून खडखडीत बरा केला. पहाडी जातीचा हिरवागार आणि लाल चोचीचा असा राजबिंडा नर पोपट होता. यथावकाश त्याचे नामकरण विठू असे झाले. एक दिवस आम्ही सर्व कामानिमित बाहेर गेलेलो असताना विठूने कधी उड्डाण केले ते कळलेच नाही… पाठी राहिला तो विठूचा रिकामा पिंजरा अन् अनेक आठवणी.

    असेच काही महिने लोटले आणि हळूहळू मी विठूच्या जाण्याचे दुःख विसरलो. एकदा सहजच मराठे काकांच्या घरी गेलो असताना तिथे पामेरियन जातीचे साधारण महिनाभराचे अतिशय गोंडस पिल्लू बघितले. मी हरखूनच गेलो. चौकशी केल्यावर कळले की ते विकायला आणले होते आणि कुत्रा-मांजर विक्रीकरिता देणे-घेणे अयोग्य आहे, हा विचारच त्या बालवयात कधी मनात आला नव्हता. म्हणून काहीच गैर वाटले नाही. पुढचे दोन-तीन दिवस शाळा सुटल्यावर न चुकता त्या पिल्लाला भेटायला जात असे. तीन दिवसांत खूपच लळा लागला. जेव्हा त्याला न्यायला त्याचा मालक आला तेव्हा तर, फारच गलबलून गेलो होतो. आता ते पिल्लू कधीच भेटणार नाही, हा विचारच फार अस्वस्थ करत होता.

    विठूच्या जाण्याने मनावर जी जखम झाली होती, ती काही प्रमाणात या नवीन सोबत्यांने भरून काढली होती. माझ्या जिवाची घालमेल आणि अस्वस्थता आई-बाबांच्या लक्षात आली होती. हळूच चौकशी करून कारणही शोधून काढले. पण माझी शाळा, आई-बाबांचे ॲाफिस आणि मोठा भाऊ मनोजचे कॉलेज या सगळ्यांमध्ये कुत्रा पाळायला काही शक्य होणार नाही, असे मला निक्षून सांगण्यात आले. माझ्या प्राणीप्रेमावर काहीसे बंधनच आले. पण मराठे काकांकडे कुत्रा मिळू शकतो, हे मनावर कोरले गेले होते.

    पहिला भाग – माझे सखे सोयरे

    मग कधीतरी हळूच चौकशी केली की. कुत्र्याच्या पिलाची साधारणपणे काय किंमत असते ते. पण 300 रुपये किंमत ऐकून विचारच सोडून दिला; कारण त्या काळात 300 रुपये हे आजच्या 30 हजार रुपयांइतके होते. विद्यार्थीदशेत असल्याने इतके पैसे एकत्र कधीच बघितले नव्हते. पण मनामध्ये विचार घोळतच होते. एकदा सहजच लडिवाळपणे माझ्या माणिकताईच्या कानांवर ही गोष्ट घातली. तिने पण हसून माझी समजूत घालायचा प्रयत्न केला, पण मी काही बधलो नाही. नंतर बरेच दिवस मी आई-बाबांच्या मागे सतत भुणभुण करीत राहिलो आणि त्याला कंटाळून का होईना, पण आई-बाबा तयार झाले. माझा आनंद तर गगनात मावेना.

    मी तातडीने मराठे काकांच्या घरी धावलो आणि लगेचच ‘मलापण कुत्रा हवा आहे’ म्हणून सांगितले. त्यांनी लगेच आगाऊ रक्कम मागितली, पण ती माझ्याकडे नसल्याने, ‘वडिलांना घेऊन ये, मग सगळा व्यवहार करू’, असे त्यांनी सुचविले. आई-बाबांना घेऊन आणि मनोजचा विरोध पत्करुन आम्ही मराठे काकांकडे गेलो. तिथे मला बाहेरच मासे बघ म्हणून सांगून आत आई-बाबा आणि मराठे काका यांच्यात व्यवहाराची बोलणी झाली. मी तर स्वप्नांच्या जगात वावरत घरी आलो. मला सांगितले गेले की, कुत्रा बंगलोरवरून येणार आहे, त्यासाठी काही आठवडे लागतील. माझ्याकरिता ती वेळही युगासारखी वाटत होती; पण रोज मी शक्य तितकी कुत्रा संगोपनाची माहिती जमवू लागलो होतो.

    शाळेतील तसेच सोसायटीमधील मित्रांना माझ्याकडे कुत्रा येणार आहे, याची दवंडी पिटून झाली होती. आईला रोज कुत्रा आला की, आपण काय करुया, याचीच यादी दिली जात होती. त्याचे नाव काय ठेवायचे, यापासून त्याला कुठे-कुठे न्यायचे येथपर्यंत याचीच चर्चा होत होती. बघता-बघता काही दिवस असेच निघून गेले, पण मराठे काकांकडून काही प्रतिसाद आला नाही. म्हणून चौकशीकरिता गेलो असता मला सांगितले की, कुत्रा कधी येणार हे तार आल्यावर कळेल. कारण त्या काळी मोबाइल फोन, ई-मेल आणि एसएमएस अशी सुविधा नव्हती.

    मग नित्यनेमाने रोज शाळा सुटल्यावर एक फेरी मराठे काकांकडे व्हायची… तार आली का, हे विचारायला! बधता बघता काही आठवडे उलटले आणि मग धीर सुटायला लागला. एकदा असाच विचारायला गेलो असता त्यांनी मला ती नको असलेली बातमी वाचून दाखविली… कुत्र्याचे पिल्लू अजून काही महिने उपलब्ध होणार नाही आणि माझी सगळी स्वप्नं उद्ध्वस्त झाली. मग पडल्या चेहऱ्याने मी घरी परतलो. आईने समजूत काढायचा बराच प्रयत्न केला; पण माझे बालमन काही मानायला तयारच होईना.

    दुसरा भाग – घरातला नवीन सदस्य… विठू

    माझी ही घालमेल बघून आई-बाबांनासुद्धा राहवेना, पण घरची परिस्थिती आणि इतर आर्थिक अडचणी बघता त्यांनी माझे मन रमावे या हेतूने बॅटरीवर चालणारा एक कुत्रा आणून दिला. पण दुधावरची तहान ताकावर कशी भागणार? काही दिवस त्या खेळण्याबरोबर खेळून झाल्यावर परत माझी ओढ जिवंत कुत्र्याकडे झुकायला लागली. दरम्यानच्या काळात मराठे काकांच्या घरवजा दुकानात जाणे जवळ-जवळ बंदच झाले होते… कारण कळत-नकळतपणे माझे बालमन दुखावले गेले होते.

    एकेदिवशी रात्री बाबांनी कामावरून येताना अचानक माझ्याकरिता एक पांढरे आणि तपकिरी ठीपके असलेले अतिशय सुंदर आणि गुटगुटीत गावठी पिल्लू आणले. माझा आनंद गगनात मावेना… माझ्यासाठी फार अनपेक्षितच होते. एक-दोन महिन्यांचे गोंडस असे ते पिल्लू होते. मी लगेचच माझ्याकडे जमविलेले सामान वापरून त्या पिल्लाकरिता गादी आणि इतर गोष्टी नीट मांडून ठेवल्या. ते पिल्लू आई आणि भावंडापासून वेगळे झाल्यामुळे तसेच, नवीन वातावरण असल्याने भांबावून गेले होते. पण मायेने जवळ केल्यावर ते थोड्याच वेळात छान रुळले. खाऊ-पिऊ झाल्यानंतर मात्र त्याला आई आणि भावंडाची आठवण येऊ लागली… ते जे रडायला लागले ते निस्तरताना आमच्या नाकीनऊ आले. ही पहिलीच वेळ असल्यामुळे काय करावे ते सुचेना. मी तर अगदीच हवालदिल झालो होतो. आई-बाबांना देखील अनुभव नसल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली.

    कशीबशी एक रात्र काढली आणि पिल्लूपण दमून झोपून गेले. सकाळी सहा वाजता त्याच्या अंगात नवीनच उत्साह संचारला आणि जे दिसेल ते चावायला सरुवात केली. कदाचित दात शिवशिवत असावेत; पण आम्हाला काहीच कल्पना नसल्यामुळे परत एकदा आमची तारांबळ उडाली. ते पिल्लू लहान असल्यामुळे त्याला थांबविताही येईना. थांबवायला गेल्यावर ते आणखीनच दात लावू लागले. कसाबसा एक दिवस गेल्यावर परत एकदा रात्री त्याने पुन्हा रडायला सुरुवात केली आणि रात्र जागवली. असे अजून एक-दोन दिवस गेल्यावर मग सगळ्यांनी विचार करून निर्णय घेतला की, पिल्लाची हेळसांड होण्यापेक्षा त्याला आई आणि भावंडांकडे परत द्यायचे… आणि अशा रीतिने कुत्रा पाळायचा पहिला अनुभव स्मरणीय ठरला.

    (क्रमश:)

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026 अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    By सुधीर करंदीकरMarch 23, 2026

    जागतिक आनंद दिन (International Day of Happiness) दरवर्षी 20 मार्चला जगभर साजरा केला जातो. लोकांना…

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn