“आजी, कोजागरी पौर्णिमेला रात्री गच्चीवर बसून मसाला दूध प्यायला कसली मज्जा आली…” समीर आजीला म्हणाला.
“अरे समीर, पण तुला माहीत आहे का, आपण असे कोजागरी पौर्णिमेलाच का केलं ते?” आजीने विचारले.
“कारण नाही माहीत… but It’s a ritual ना…” जेन झी असलेल्या समीरने लगेचच उत्तर दिले.
आजीने समीरला समजावले, “समीर, आपली सगळी rituals ही scientific आहेत. पूर्वीचे ऋषिमुनी हे थोर वैज्ञानिक होते. त्यांनी आरोग्याला उपयुक्त अशा अनेक गोष्टी rituals च्या रुपात सांगितल्या आहेत, जेणेकरून त्या सर्वसामान्य नागरिकांना कळणे सोपे जाईल. त्यातीलच एक कोजागरी पौर्णिमेला चांदण्यात दूध ठेवून मग ते पिणेही आहे. हा शरद ऋतुचर्येचाच भाग आहे. कसे ते सांगते तुला मी…”
शरद ऋतुचर्या
महिने – शरद ऋतू हा आयुर्वेदानुसार भाद्रपद ते कार्तिक या महिन्यांत किंवा आधुनिक कॅलेंडरनुसार सप्टेंबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत विसर्ग काळामध्ये (दक्षिणायन) येतो.
आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी म्हणजे दसरा, हा शरद ऋतुच्या प्रारंभीचा काळ.
शरद ऋतूतील वातावरण
पावसाळा जसजसा कमी होत जातो, तसतसे सूर्याची किरणे अधिक तीव्र होतात, ज्यामुळे उष्णता आणि कोरडेपणा वाढतो. हे पर्यावरणीय बदल तीन दोषांचे, विशेषतः पित्ताचे नाजूक संतुलन बिघडवू लागतात. उष्णता, तीक्ष्णता आणि द्रवता यासारख्या गुणांशी संबंधित पित्तदोष पचन, चयापचय आणि त्वचेच्या आरोग्यासाठी जबाबदार असतो. शरद ऋतू दरम्यान, वाढलेली उष्णता आणि कोरडेपणा, पित्त वाढवू शकतो; ज्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
ऋतू आणि दोष विकार
पित्तदोषाचे असंतुलन/वाढ यामुळे आम्लपित्त (Acidity), पोटात/आतड्यांमध्ये जळजळ (Burning sensation), अतिसार (loose motion), अल्सर, त्वचेचे विकार इत्यादी होऊ शकतात. पित्तदोष हा अग्नी आणि जल या दोन महाभूतांचे (elements) मिश्रण असल्याने, पचनक्रियेत बिघाड होण्याव्यतिरिक्त, शरीरात जास्त पाणी साठू शकते ज्यामुळे पोट फुगू शकते.
शरद ऋतूतील योग्य आहार
शरद ऋतूमध्ये भूक चांगली लागल्यावर मधूर (गोड), हलका (लघु), शीत, किंचीत कडू अशा प्रकारचा पित्ताला शमन करणारा आहार योग्य मात्रेत घ्यावा.
- दुग्धजन्य आहार : दूध, तूप, लोणी यासारखे पित्तशामक पदार्थ आहारामध्ये घ्यावेत. तूप पुरेशा प्रमाणात खावे, कारण ते पचनशक्ती सुधारते. त्वचेचा कोरडेपणा दूर करते आणि पित्तदोष संतुलित करण्यास मदत करते.
- धान्य : गहू, ज्वारी, सातू, तांदूळ, जिरेसाळ इत्यादी धान्यांचा वापर आहारात करावा.
- द्विदल धान्य : मूग, उडीद यांचे धणे, जिरे, तूप इत्यादीची फोडणी देऊन यूष / सूप/ वरण करून ते सेवन करावे.
- फळभाज्या : पडवळ, घोसाळे, आवळ्याची चटणी, मोरावळा हे पदार्थ खावेत.
- पालेभाज्या : तांदूळजा, शेवगा या पालेभाज्या योग्य.
- फलाहार : डाळींब, काळ्या मनुका, कोहळापाक, पेठा, नारळ, आवळा, अंजीर ही फळे खावीत.
- उकळून गार केलेले पाणी, काळ्या मनुकांचे पाणी, वाळ्याचे पाणी, नारळाचे पाणी, साळीच्या लाह्यांचे पाणी तहान लागल्यास प्यावे. लिंबू सरबत, आवळ्याचा रस, कोकम सरबत चालेल.
- या ऋतूत पचनशक्ती जास्त तीव्र नसते, सामान्यतः जेवढी भूक असते त्यापेक्षा कमी प्रमाणात अन्न खावे.
- सर्व भाज्या चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत, याची खात्री करावी.
शरद ऋतूतील योग्य विहार (Lifestyle during Sharad Ritu)
- भूक लागल्यावरच खावे, जास्त खाणे टाळावे. मूळ प्रमाणाच्या 3/4 प्रमाणात उकळलेले पाणी प्यावे. उकळत्या पाण्यात आवळा, लोध्रा, पुनर्नवा यासारख्या पित्त शांत करणाऱ्या औषधी वनस्पती घालाव्यात.
- चंदन (चंदन लाकडाच्या) पेस्टने शरीराचे मालिश करणे फायदेशीर ठरू शकते, कारण चंदनामध्ये थंड गुणधर्म असल्याने ते पित्तदोष संतुलित करण्यास मदत करते.
- दिवसा झोपणे टाळावे, कारण त्यामुळे पचनास अडथळा येऊ शकतो.
- सतत आणि थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने पित्त वाढू शकते, म्हणून कडक उन्हात जास्त बाहेर जाणे टाळावे.
- प्राणायाम, नियमित योगासने आणि नियमित व्यायाम वेळापत्रक ठेवून सक्रिय राहणे हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
- शरद ऋतूमध्ये चंदन, वाळा, कापूर, शरदातील सुगंधी फुले धारण करून संध्याकाळी शुभ्र चांदण्यात बसणे आरोग्यदायक असते.
अपथ्यकर आहार
- तिखट, आंबट, खारट पदार्थांचे सेवन टाळावे.
- चमचमीत मसालेदार पदार्थ किंवा खारवलेले, मीठ टाकलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत. दही खाऊ नये.
- आंबवलेले पदार्थ सेवन करू नये.
- अतिमात्रेत जेवण करू नये.
- Cold-drink स्पर्शाला थंड असले तरीही शरीराला गरम (उष्ण) असल्याने त्याचे सेवन करू नये.
- फुलकोबी, कोबी, ब्रोकोली यासारख्या गॅस असलेल्या भाज्या खाणे टाळावे. तसेच, बटाट्याचे सेवन कमी करावे.
अपथ्यकर विहार
- दुपारी जेवल्यानंतर झोपू नये. रात्री जागरण करू नये.
- दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणे टाळावे, उन्हात जावे लागल्यास डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ घालून बाहेर पडावे.
शरद ऋतूतील पंचकर्म
वाढवलेल्या पित्ताच्या शमनार्थ कडू औषधांनी सिद्ध केलेले तूप, जुलाब (विरेचन) आणि रक्त काढणे (रक्तमोक्षण) यांची योजना वैद्यांच्या सल्ल्याने करावी.
हेही वाचा – Ayurveda : वसंत ऋतुचर्या
शरद ऋतू आणि सण
दसरा, कोजागरी पौर्णिमा आणि दिवाळी हे तीन महत्त्वाचे सण या ऋतूत येतात.
- दसऱ्याच्या वेळी आपट्याची पाने लुटली जातात. आपटा हा कडू आणि तुरट रसाचा असल्यामुळे शरीराला हलकेपणा आणून पित्ताला कमी करणारा आहे.
- त्यानंतर आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे कोजागरी पौर्णिमा, हा उत्सव येतो यावेळी चंद्रप्रकाशात आटीव दूध किंवा मसाला दूध उत्साहाने सेवन केले जाते. दूध (गाईचे दूध) हे गोड, थंड, सर्व शरीराचे पोषण करणारे, शक्तीदायक, वात आणि पित्ताचे शमन करणारे असते.
- दिवाळी हा शरद ऋतूच्या शेवटच्या दिवसात येणारा सण.
दिवाळीचे विधी आयुर्वेदातील ऋतुचर्येच्या (ऋतू पथ्ये) तत्वाशी निगडीत आहेत.
थंड ऋतूच्या (हेमंत) प्रारंभाभोवती साजरा केला जाणारा हा सण शरीराची स्वच्छता, पचनशक्ती मजबूत करणे आणि येणाऱ्या हवामानासाठी शरीर तयार करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देतो.
हेही वाचा – Ayurveda : ग्रीष्म ऋतुचर्या
दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे, ज्यामध्ये बदलत्या ऋतूशी सुसंगत राहण्यासाठी विशिष्ट विधी आखले आहेत.
धनत्रयोदशी महत्त्व : पहिला दिवस शुद्धीकरण आणि समृद्धीसाठी आहे. सोने, चांदी किंवा भांडी यासारख्या नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा एक शुभ दिवस मानला जातो.
ऋतुचर्या संबंध : स्वच्छतेमुळे घर स्वच्छ आणि हिवाळ्याच्या महिन्यांसाठी तयार राहते.
नरक चतुर्दशी महत्त्व : या दिवशी भगवान श्री कृष्णाने राक्षस नरकासुराचा पराभव केला.
ऋतुचर्या संबंध : या दिवशी सूर्योदयापूर्वी केले जाणारे अभ्यंग स्नान (उटणे आणि तेल स्नान) हा एक मध्यवर्ती विधी आहे. थंड, कोरड्या हवामानामुळे त्वचेला कोरडेपणा येण्यापासून वाचवण्यासाठी, पोषण देण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी ही एक महत्त्वाची आयुर्वेदिक पद्धत आहे. वापरले जाणारे तेल, उटणे औषधी वनस्पतींनी सिद्ध केलेले असते आणि ऋतू बदलादरम्यान वाढू शकणारे दोष शांत करते.
लक्ष्मीपूजन महत्त्व : उत्सवाचा मुख्य दिवस धन आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित आहे.
ऋतुचर्या संबंध : पारंपरिकरीत्या पाच वेगवेगळ्या तेलांनी (पंच-तैलम) दिव्यांच्या रांगा (दिवे) लावण्याची परंपरा, व्यावहारिक आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहे. ऋतू बदलल्याने कीटकांची संख्या वाढू शकते आणि रोगांचा प्रसार होऊ शकतो. कडुनिंब, एरंडेल आणि महुआ यासारख्या तेलांचा धूर नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतो.
गोवर्धन पूजा महत्त्व : भगवान श्रीकृष्ण यांनी गोवर्धन टेकडी उचलली म्हणून हा दिवस साजरा करतात. देवतांना ‘अन्नाचा पर्वत’ (अन्नकूट) अर्पण केला जातो.
ऋतुचर्या संबंध : हा सण कापणीचा हंगाम आणि अन्नाच्या विपुलतेचे प्रतीक आहे.
भाऊबीज महत्त्व : दीर्घायुष्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करून भाऊ आणि बहिणींमधील बंध साजरा केला जातो.
ऋतुचर्या संबंध: भेटवस्तू आणि मिठाईची देवाणघेवाण सामाजिक बंधांना आणखी मजबूत करते, जे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
आयुर्वेदिक पद्धती : दिवाळीत तयार केलेले तूपयुक्त पदार्थ, पचनशक्ती किंवा अग्निला प्रज्वलित करण्यास मदत करतात.
अशाप्रकारे शरदातील उत्सव / सण हे देखील पित्ताला कमी करणाऱ्या गोष्टींनी युक्त असतात. आरोग्यदायक असतात.
सर्व वाचकांना आरोग्यदायक आणि मंगलमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
Mobile : 9819340378


