यश:श्री
थोर विदुषी दुर्गा भागवत यांचे वडील, नारायण भागवत तसेच त्यांचे सहकारी कपिलराम वकील यांच्या ‘डालडा’वरील संशोधनाबद्दलची एक कथा अतिशय रोचक आहे.
नारायण भागवत 1920च्या सुमारास टाटांच्या ऑइल कंपनीत मॅनेजर होते. तर, कपिलराम वकील हे डायरेक्टर होते. (कपिलराम वकिलांनी पुढे ‘ओखा सॉल्ट वर्क’ सुरू केले आणि नंतर टाटांनी ते विकत घेतले. त्याला आता मिठापूर असे नाव पडले आहे.) या ऑइल कंपनीचे मालक सर दोराबजी टाटा होते. त्यावेळेला या दोघांनी मिळून एक नवा प्रयोग चालविला होता; जगात तोपर्यंत तो सिद्ध झालेला नव्हता. तो प्रयोग म्हणजे म्हणजे ‘डालडा’ तुपाचा. नारायण भागवत आणि कपिलराम शर्मा यांच्या खालोखाल जपानला यात थोडंफार यश मिळालं होतं. अमेरिका वगैरे इतर प्रगत राष्ट्रांना ते जमलं नव्हतं.
टाटांच्या सर्व कंपन्या त्यावेळी कर्जबाजारी होत्या. तर, ऑइल कंपनी ‘ना नफा ना तोटा’ अशी असल्यानं तगून होती. नारायण भागवत आणि कपिलराम वकील यांनी तयार केलेलं तूप हे हिरव्या रंगाचं होतं. कणीदार नव्हतं. तसंच, त्याला एक प्रकारचा चमत्कारिक वास यायचा. जशा स्थितीत असेल, तसं तूप घरी आणून नारायण भागवत आपल्या कुटुंबीयांच्या पानात वाढत असत. त्यावेळी दुर्गाबाईंच्या आईचे नुकतेच निधन झाले होते. दुर्गाबाईंचा लहान भाऊ अडीच वर्षांचा होता. त्यामुळे घरी आणलेले तूप पाहून आसपासच्या घरांमध्ये कुजबूज व्हायची. लोक म्हणायची – ‘असं भयंकर तूप खायला घालून, हे आपल्या मुलांना मारणार आहेत.’ यावर भागवत म्हणायचे – ‘दुसऱ्यांना देण्याआधी हे तूप मी माझ्या मुलांना खायला देत आहे.’
त्यावेळी पीटरसन नावाचे एक इंग्रज गृहस्थ होते; ते टाटांचे सर्वेसर्वा होते. कारण टाटांच्या कंपन्यांना त्यांनी कर्ज दिलं होतं. अमेरिकेच्या तज्ज्ञांनी पीटरसन यांना सांगितलं की, ‘आम्ही सर्व पैसे देतो, पण हे सिक्रेट आम्हाला द्या.’ त्यानुसार पीटरसनने कपिलराम आणि भागवत यांच्याकडे तूप बनविण्याच्या सिक्रेटची मागणी केली. मात्र, त्याला त्या दोघांनी नकार दिला. भागवत यांनी सांगितलं – ‘जेव्हा आमचे लोक परदेशात जातात, तेव्हा तेथील लोक आम्हाला त्यांची गुपिते सांगतात का? मग आम्ही पण तुम्हाला नाही सांगणार!’
हे ऐकून पीटरसन भडकले. ते म्हणाले – ‘‘टाटा कंपन्यांना वर काढण्यासाठी तुम्ही मला सिक्रेट सांगा. नाहीतर, मला ही ऑइल कंपनी बंद करावी लागेल आणि तुमच्यासकट पाचशे कामगार बेकार होतील.’ तरीही कपिलराम आणि भागवत हे दोघेही आपल्या निर्णयावर ठाम राहिले. म्हणून दुर्गाबाईंचे वडील नारायण भागवत यांना सात वर्षे बेकारी सोसावी लागली.
यादरम्यान, नारायण भागवत यांनी साबण बनविण्याचा स्वत:चा कारखाना सुरू केला. त्यावेळी त्यांचे भाऊ एम. एस्सी. गोल्ड मेडलिस्ट होते. त्याला नारायण भागवत यांनी सांगितलं – ‘तू टाटांकडे नोकरीला जा.’ त्याप्रमाणे त्यानं तिथे नोकरी केली. या नोकरीदरम्यान टाटा त्यांना परदेशात पाठवायचे. एकदा ते इंग्लंडला गेले होते. तिथं त्यांची पीटरसनशी ओळख झाली. पीटरसन म्हणाले – ‘तुझा भाऊ खरोखरच ‘नोबेल’ पुरस्कार मिळविण्याच्या लायकीचा माणूस आहे. जेव्हापासून मी त्याला बेकार बनवलं, तेव्हापासून मला निद्रानाश जडला आहे. तेव्हा त्याला सांग की मला क्षमा कर.’