Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeअवांतरअशा प्रकारे कोर्टात जायची ‘घडी’ आली!

अशा प्रकारे कोर्टात जायची ‘घडी’ आली!

मनोज जोशी

कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये, असे म्हटले जाते. पण मला दोनदा पायरी चढावी लागली. सर्व मामला चोरीचाच होता, पण हे दोन्ही अनुभव कायम लक्षात राहतील, असेच होते. एकदा वांद्रे कोर्ट तर, दुसऱ्यांदा वसई कोर्ट… एकदा घड्याळाची चोरी तर, दुसऱ्या वेळेस मोबाइल लंपास… लोकमतला असताना 2012-13 मध्ये माझा मोबाइल चोरीला गेला होता. त्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केल्यावर काही दिवसांत मला कोर्टाचे बोलावणे आले… केस उभी राहिली… एका दिवसांत निकाल लागला आणि फोन परत मिळाला. अर्थात, तो माझा नव्हता. पोलिसांकडे त्याच कंपनीचे मॉडेल उपलब्ध होते, तो मला दिला.

भाग – 2


वसई कोर्टात माझ्या केसचा पुकारा होईपर्यंत कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत असताना मला आधीच्या वांद्रे कोर्टातील घटना आठवली. 1996-97 साल असेल. सर्व घटनाक्रम डोळ्यासमोरून सरकला. कोर्टातील तो माझा पहिलाच अनुभव होता.

त्यावेळी मी ‘नवशक्ति’ दैनिकात होतो. दुपारची ड्युटी संपवून रात्री अंधेरीला घरी परतत होतो. नऊ वाजून गेले होते. एवढ्या उशिरा गाडीला एवढी गर्दी नसेल, असा विचार करून विरार लोकलमध्ये चढलो. पण नंतर गाडी भरत गेली आणि अंधेरीला मी कसा-बसा त्या गर्दीतून बाहेर पडलो. खिसा चाचपून पाहिला, पाकीट होते, हुश्श! (त्यावेळी मोबाइल अस्तित्वात नव्हता आणि त्याची कल्पनासुद्धा!) पण हाताचे घड्याळ गायब झाले होते. गर्दीतून वाट काढताना ते तुटून पडले की, चोरीला गेले, हे माहीत नाही. पण घड्याळ गेले, एवढे नक्की.

थेट घरी आलो. घड्याळ चोरीला गेल्याचे घरातल्या सर्वांना सांगितले. काय करायचे, समजत नव्हते. पाच-सहा दिवसांनी मोठा भाऊ अतुल याने बोरिवली रेल्वे स्थानकातील एका इन्स्पेक्टरची ओळख काढली होती आणि मी जाऊन त्या इन्स्पेक्टरची भेट घेतली. त्याने तिथल्या एका कॉन्स्टेबलला माझी तक्रार लिहून घ्यायला सांगितली. मी तक्रार नोंदवली. त्याला घड्याळाचे वर्णन सांगताना नाकीनऊ आले. असो.

हेही वाचा – माझा मोबाइल चोरीला गेला अन्…

साधारणपणे, तीन-एक दिवसांनी मला वांद्रे रेल्वे पोलिसांकडून फोन आला. बोरिवलीला नोंदवलेली तक्रार वांद्रे रेल्वे पोलिसांकडे वर्ग झाली होती. कारण घटना अंधेरीला घडली होती. त्यांनी मला बोलावून घेतले. मी जाऊन संबंधित पोलिसाला भेटलो. त्याला घड्याळाचे वर्णन समजले नव्हते. म्हणून त्याने मला बोलावून घेतले होते. त्याचेही तेच झाले. त्याने स्वत:ला समजेल असे वर्णन लिहिले आणि मला जायला सांगितले. लगेच तीन-चार दिवसांनी पुन्हा फोन आला आणि ‘वांद्रे कोर्टात यावे लागेल,’ असे सांगितले.

कोर्टात जावे लागणार, याचे मला टेन्शन आले. ठरलेल्या दिवशी सकाळी 10 वाजता मी कोर्टात गेलो. मला तिथे कोणाला भेटायचे, ते आधीच सांगण्यात आले होते. प्रत्येक कोर्टात संबंधित पोलीस ठाण्याचे एक-दोन पोलीस कायम असतात; त्यांची तिथेच ड्युटी लागलेली असते, हे मला तेव्हा समजले. वांद्रे कोर्टात दोन पोलीस होते. त्यातील एकाने मला खटल्याची कागदपत्रे वाचायला दिली आणि सांगितले, ‘तुम्हाला याप्रमाणे न्यायाधीशांसमोर सांगायला लागेल.’ ती कागदपत्रे वाचल्यावर माझ्या लक्षात आले की, त्यांनी एक आरोपी उभा केला आहे. त्याच्याकडे माझे घड्याळ सापडले आणि दोन पंचांच्या साक्षीने ते घड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अर्थात, ते घड्याळ देखील माझे नव्हते. विशेष म्हणजे, माझ्या हरवलेल्या घड्याळाच्या आसपास देखील नव्हते. एवढेच की, घड्याळासारखे घड्याळ होते!

कागदपत्रे वाचल्यावर आणखी टेन्शनमध्ये आलो. माझ्यामुळे एक गरीब तरुण या खटल्यात अडकत होता. तसे मी त्या पोलिसांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, ‘अहो, हा भुरटा चोर आहे. तळमजल्याची खिडकी उघडी दिसली की, त्यातून हा वस्तू लांबवतो. काहीनाही तर, खुंटीला अडवलेला शर्ट देखील चोरतो. तो तडीपार होता. पण लोकल ट्रेनमध्ये फिरताना सापडला. आता त्याला शिक्षा तर होणारच आहे, त्यात तुमची केस. तुम्ही अजिबात काळजी करू नका.’

‘पण, तरी…’ मी बोलत होतो. माझे म्हणणे तोडत एका पोलिसाने सांगितले, ‘तुमच्यासारख्या एकूण नऊ केस त्याच्यावर टाकल्या आहेत.’ मी गारच झालो.

हेही वाचा – संवेदनशील साहित्यिक… पी.व्ही. नरसिंह राव

मनात एक शंका होती. तो तर, तडीपारीची शिक्षा तोडून शहरात फिरत होता. उद्या माझ्या घरपर्यंत आला तर काय? मी एका पोलिसाला ही शंका सांगितली. गंमत म्हणजे, आतापर्यंत एक शब्दही न बोलणारा, दोघांपैकी एक पोलीस म्हणाला, ‘त्याची काय हिम्मत. तुमचे घरच काय, तुमच्या आसपासही तो येणार नाही.’ चेहऱ्यावरून हा पोलीस रागीटच वाटत होता. त्याने ज्या पद्धतीने मला सांगितले, त्यावरून माझा अंदाज खरा ठरला.

खटल्याला कधी सुरुवात होते, याची वाट पाहू लागलो. वेगवेगळ्या प्रकरणांवरील सुनावणी सुरू होती. त्यावरून लक्षात आले की, अडाणी कोर्ट म्हणतात, ते हेच होते. मधेच, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडून न्यायाधीशांसमोर एकेक करून उभे करण्यात आले. न्यायाधीशांच्या बाजूला बसलेला करड्या आवाजात विचारत होता, ‘गुन्हा कबूल आहे का?’ जे लगेच ‘हो’ म्हणत होते, त्यांना 50 रुपयांचा दंड. जे ‘नाही’ म्हणायचे, त्यांचा दंड पटीने वाढत होता. मग बाजूचा पोलीसच कानात सांगायचा ‘हो म्हण.’ त्यानंतर त्याची सुटका व्हायची. मी हे सर्व एन्जॉय करत होतो. त्या दिवशी माझी केस आलीच नाही. पुढची तारीख मिळाली.

पुन्हा ठरलेल्या तारखेला सकाळी 10 वाजता मी पुन्हा कोर्टात हजर झालो. यावेळी दडपण नव्हते. त्या दोन्ही पोलिसांची मैत्री झाली होती. तो रागीट पोलीस साधे बोलताना देखील दमात घेऊनच बोलायचा. चहा प्यायला गेल्यावर, मी बिल दिल्यावर त्याने मलाही दम दिला, ‘कशाला बिल भरलं. हे शेवटचं, पुन्हा भरायचं नाही.’ मी हसून मान डोलावली.

हेही वाचा – 1993चा तणाव!

त्या दोन दिवसांत एक गोष्ट जाणवली की, कोर्टात एकापाठोपाठ एक अशा एवढ्या खटल्यांची सुनावणी झाली; पण प्रत्येक वेळी उभे राहणारे दोन साक्षीदार तेच होते! एका खटल्यात तर, न्यायाधीशांनीच विचारले की, तुम्हीच पुन्हा साक्षीदार का? त्यांनी ‘हो’ म्हटल्यावर न्यायाधीश आणि त्यांच्या बाजूला बसलेली व्यक्ती एकमेकांकडे पाहून जोरात हसले. त्या दिवशी सुद्धा माझ्या केसची सुनावणी झाली नाही.

तिसऱ्या वेळी मी पुन्हा सकाळी 10 वाजता कोर्टात पोहोचलो. कोर्टाचे कामकाज सुरू झाले. थोड्याच वेळात त्या दोन साक्षीदारांपैकी एक जण माझ्या शेजारी येऊन बसला. त्याने विचारले, ‘तुम्ही मनोज जोशी ना?’ मी ‘हो’ म्हणालो.

‘तुमच्या खटल्यातही मीच साक्षीदार आहे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी चहापाणी द्यावे लागेल,’ असे त्याने सांगितले. मी म्हणालो, ‘देईन ना.’

माझा तर कोर्टाचा तो पहिलाच अनुभव होता. त्यामुळे न चिडणाऱ्या पोलिसाला गाठले आणि विचारले, ‘त्या साक्षीदारांना किती पैसे द्यायचे?’ तेवढ्यात मागून आवाज आला, ‘कोण सांगते?’ मी मागे वळून पाहिले, तर तो रागीट पोलीस. त्याने दरडावूनच मला विचारले. मी त्याला सर्व सांगितले. त्याने त्या साक्षीदाराला बोलावले आणि पोलिसांच्या खास शैलीत ‘सभ्य’ भाषेचा प्रयोग करत त्याला ‘समजावले’, ‘तू यांच्या बाजूला जरी दिसलास तर, याद राख. आतमध्ये घेऊन तुडवीन.’ ते ऐकल्यावर तो साक्षीदार जो गायब झाला तो दिसलाच नाही.

माझ्या केसचा पुकारा झाला. जे वाचले होते, तेच न्यायाधीशांना सांगितले. ते अर्थपूर्ण हसले. दोनपैकी एकाची साक्ष झाली. (माझ्याकडे पैसे मागणाऱ्याला बोलावलेच नाही.) सुनावणी संपली. एक बॉण्ड तयार करण्यात आला. माझ्या ताब्यात घड्याळ देण्यात आले. त्यावेळी हा बॉण्ड कशासाठी याची मी चौकशी केली. तेव्हा पोलिसाने सांगितले की, ‘उद्या कदाचित कोर्टाने तुम्हाला पुन्हा हे घड्याळ घेऊन बोलावले आणि तुम्ही ते नाही आणले तर, तुम्हाला तेवढी रक्कम भरावी लागते. पण असे कधी होत नाही…. चिंता करू नका’

मी ‘ठीक आहे,’ म्हणालो. बॉण्ड तयार करून घड्याळ ताब्यात घेतले आणि त्यांचा निरोप घेऊन कोर्टाच्या बाहेर पडलो.

हेही वाचा – मन ‘वडा’य ‘वडा’य…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!