मनोज जोशी
कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकीजा’ चित्रपट हा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हटले तर, ते गैर ठरणार नाही. हा चित्रपट कमाल अमरोही यांच्यासाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. त्यामुळे त्यांनी जे जे उत्तम (त्या काळी) होते, ते उभे केले होते. या चित्रपटाच्या सेटपासून संगीतापर्यंत सर्वच भव्यदिव्य होते. अनेक अडचणींवर मात करत हा चित्रपट बनला. ‘पाकीजा’ चित्रपट बनायला तब्बल 15 वर्षं लागली. 17 जानेवारी 1957 रोजी या गाणी रेकॉर्ड करून कमाल अमरोही यांनी या चित्रपटाची सुरुवात केली होती. तर, प्रत्यक्षात हा चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित व्हायला 4 फेब्रुवारी 1972 ही तारीख उजाडली. तत्पूर्वी, 3 फेब्रुवारी 1972 रोजी प्रसिद्ध मराठा मंदिरमध्ये याचा भव्य प्रीमियर सुद्धा झाला. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, याची सुरुवात ब्लॅक अँड व्हाइटपासून झाली आणि प्रत्यक्षात चित्रपट पूर्ण झाला तो सिनेमास्कोपमध्ये.
या मधल्या काळात हा चित्रपट चर्चेत होता आणि नंतर झळकल्यावरही तो सर्वत्र चर्चेतच राहिला. सुरुवातीला धर्मेद्रला घेऊन या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली. पण नंतर वैयक्तिक कारणावरून त्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्याच्या जागी राजकुमारला संधी देण्यात आली. त्याचबरोबर कमाल अमरोही आणि मीना कुमारी या दाम्पत्यात झालेला बेबनाव. यामुळे हा चित्रपट रखडला आणि चर्चेतही राहिला. त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा तो चर्चेत आला तो ‘पाकीजा’च्या संगीतावरून!
पाकीजा चित्रपटातील गीते अजरामर ठरली. इन्हीं लोगों ने…, ठाडे रहियो…, चलते चलते…, मौसम हैं आशिकाना…, तीर-ए-नजर देखेंगे…, चलो दिलदार चलो… ही गाणी आजही कानावर पडली की, मन प्रसन्न होते. पण अलीकडच्या काळात संगीतावरून चित्रपटाला वादाची किनारही जोडली गेली होती. या गीतांना संगीत देणारे गुलाम महंमद यांचे पुत्र मुमताज महंमद यांनी प्रसिद्ध संगीतकार नौशाद यांचे संगीतकार म्हणून नाव देण्यास आक्षेप घेतला होता. ‘पाकीजा’मधील गीतांच्या संगीताचे श्रेय नौशाद घेत असून त्यांनी आम्हाला रॉयल्टीही दिली नाही, असा आरोपही त्यांनी केला होता. यातील अजरामर गाण्यांना संगीत गुलाम महंमद यांनी दिले आहे. मात्र चित्रपट पूर्ण होण्यास खूप कालावधी लागला आणि त्यादरम्यान त्यांचे निधन झाल्याने पार्श्वसंगीताची जबाबदारी कमाल अमरोही यांनी नौशाद यांच्याकडे सोपविली होती. नेमका त्यावरूनच वाद निर्माण झाला होता.
नौशाद यांना उस्ताद झंडे खाँ यांच्याकडे पहिली संधी माझे वडील गुलाम महंमद यांनी दिली. त्या वेळी गुरखा त्यांना आतही येऊ देत नव्हता. पण माझे वडील नौशाद यांच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठे होते. त्यांना घेऊन ते उस्ताद झंडे खाँ यांच्याकडे घेऊन गेले आणि आपला भाऊ इब्राहिम यांच्या जागी त्यांना ठेवण्याची विनंती केली, असा दावा मुमताज महंमद यांनी केला होता.
‘मिर्झा गालिब’ चित्रपटाचे संगीत ऐकून कमाल अमरोही यांनी गुलाम महंमद यांच्याशी संपर्क साधला, असे मुमताज महंमद सांगतात. या उलट नौशाद यांचा असा दावा आहे की, अमरोही यांना आपण गुलाम महंमद यांचे नाव सुचविले. गुलाम महंमद यांनी सहाय्यक म्हणून आपल्याकडे 20 वर्षे काम केले.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नौशाद यांनी पाकीजाची लाँग प्ले रेकॉर्ड बनविली. त्यात राजकुमारी यांचे ‘नजरीया की मारी’, वाणी जयराम यांच्या आवाजातील ‘मोरा साजन’ आणि परवीन सुलताना यांचे ‘कौन गली’ ही बॅकग्राऊंड गीते आहेत. पण त्यांनी ‘ये धुवाँ सा कहाँ उठता है…’ ही बॅकग्राऊंडला असलेली गझल का नाही टाकली? असा सवाल मुमताज यांनी उपस्थित केला होता. वस्तुतः ही गझल मेहंदी हसन यांची आहे आणि जशीच्या तशी वापरली आहे. म्हणून ती या लाँग प्लेमध्ये वापरली नाही, असा दावाही त्यांनी केला होता.
तथापि, नौशाद यांनी त्याचवेळी हे सर्व आरोप आणि दावे फेटाळून लावले. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत संगीतकार म्हणून गुलाम महंमद यांचे, तर पार्श्वसंगीत म्हणून माझे आहे. तसेच पार्श्वसंगीताबाबत कमाल अमरोही यांच्यासमवेत करार करताना रॉयल्टीची अट आपण ठेवली होती. त्यानुसार ती आपल्याला मिळाली, असे त्यांनी स्पष्ट करून या वादावर पडदा टाकला होता.