अध्याय आठवा
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥25॥
तरि प्रयाणाचेनि अवसरें । वातुश्लेष्मु सुभरे। तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदलें ठाके ॥226॥ सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥227॥ अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची ॥228॥ जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होये ॥229॥ कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ॥230॥ ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी । जेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥231॥ हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे । म्हणऊनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥232॥ आणि देहाआंतु ऐसी स्थिति । बाहेरी कृष्णपक्षु वरि राति । आणि सामासही ते वोडवती । दक्षिणायन ॥233॥ इये पुनरावृतीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेनि आइके ॥234॥ ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥235॥ आम्हीं अकाळु जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्गु गांवा । पुनरावृत्तीचिया ॥236॥ येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु । साविया स्वस्त चांगु । निवृत्तीवरी ॥237॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसा वरिपडिलां प्रयाणकाळीं, बुद्धीतें भ्रमु न गिळीं…
अर्थ
(आत) धूर (धूमयुक्त अग्नि), त्याचप्रमाणे (बाहेर) रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने, या स्थितीत (ज्याचे देहावसान होते तो) योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो. ॥25॥
तरी मरणाचे वेळी वात आणि कफ (शरीरामधे फार दाटतो, त्यामुळे अंत:करणात अंधार गच्च भरून राहतो. ॥226॥ सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेडे होते आणि प्राण कोंडतो. ॥227॥ अग्नीची उष्णता जाते, मग सर्व धूरच होतो, त्या धुराने चेतना शरीरात कोंडून राहते. ॥228॥ ज्याप्रमाणे पाण्याने गच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत, मग त्यावेळी गडद अंधकारही नाही आणि स्वच्छ उजेडही नाही, असा झुंजूमुंजू उजेड असतो. ॥229॥ याप्रमाणे तो धड मेलेला नसतो आणि शुद्धीवरही नसतो, अशी जीवितास स्तब्धता येते. आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहात राहते. ॥230॥ याप्रमाणे मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्या सभोवती अशी ही धुराच्या समुदायाची वाटणी होते, तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूपअभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. ॥231॥ बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो, त्यावेळी आणखी प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणायला पाहिजे? म्हणून मरणकाळी तर अशी अवस्था होते. ॥232॥ अशी ही देहाच्या आत स्थिती होऊन, बाहेर वद्य पंधरवडा, शिवाय रात्र आणि दक्षिणायनातील सहा महिनेही येतात. ॥233॥ ही वारंवार फेर्यात आणणारी ठिकाणे, ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वच एकत्र जुळून येतात, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल? ॥234॥ अशा रीतीने ज्याचा देह पडतो, तो योगी असल्याकारणाने त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते. नंतर तेथून तो माघारा फिरून पुन: मृत्यूलोकात जन्मास येतो. ॥235॥ अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला, तो हाच, असे समज आणि हाच पुनर्जन्मरूप गावास येण्याचा धूम्रमार्ग आहे. ॥236॥ दुसरा जो अर्चिरादि मार्ग, तो वाहता आणि सुगम आहे तसेच, तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे. ॥237॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : आंत अग्निज्योतींचा प्रकाशु, बाहेरी शुक्लपक्षु परी दिवसु…


