Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकआशिष.... एक उत्तम विद्यार्थी

आशिष…. एक उत्तम विद्यार्थी

अर्चना कुलकर्णी

मेकॅनिकल टेक्नॉलॉजी हा विषय मी अकरावी आणि बारावीला शिकवायचे. हा विषय चांगला असला तरी रटाळ आहे. तो विद्यार्थ्यांना समजायला हवा, आवडायला हवा म्हणून मी तो हसत खेळत, “टीचिंग -लर्निंग” पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करायची. हा महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांना समजला पाहिजे, याबाबत माझा कटाक्ष असायचा. माझा विद्यार्थीवर्ग प्रॅक्टिकल्समध्ये कुशल, परंतु थिअरीमध्ये एक पाऊल मागे असायचा. त्यातून इंग्रजी माध्यमाचा मोठा अडसर होता, ‌त्यामुळे प्रत्येक तत्व मी प्रथम मराठीतून समर्पक उदाहरण देऊन समजावायचे, नंतर तेच इंग्रजीतून शिकवायचे‌; शिवाय  “टीचिंग लर्निंग” पद्धतीनुसार प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय समजून सांगायचे. सांगण्याचा हेतू हा की, या पद्धतीने शिकवल्यावर विद्यार्थीवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळायचा. त्यांना रटाळ आणि कठीण भाग चांगला वाटायचा तसेच समजायचा देखील.

एक छोटेसे उदाहरण म्हणजे, मुळात नरम आणि कमकुवत असलेले स्टील (Mild steel) या धातूचे रूपांतर मजबूत स्टीलमध्ये करण्यासाठी त्या धातूला उष्णोपचारसारख्या (Heat treatment) कठीण प्रक्रियेतून (Hard process) जावे लागते. विशिष्ट पद्धतीने धातू उच्च तपमानापर्यंत तापविणे आणि विशिष्ट पद्धतीने वातावरणाच्या तापमानापर्यंत थंड करणे म्हणजे उष्णोपचार (Heat treatment). यामुळे मूळ धातूच्या गुणधर्मांमध्ये आवश्यक तो बदल होतो.

हे तत्व समजवताना मी नेहमी चित्रपटातील जुळ्या भावांची गोष्ट रंगवून रंगवून सांगायचे. त्यातील जो आई-वडिलांच्या प्रेमाच्या छायेत ऐषारामात राहतो, तो कठीण प्रसंगाला तोंड द्यायला, दुष्टांशी दोन हात करायला कमी पडतो. या उलट जो कुटुंबापासून लांब, कठीण परिस्थितीशी (Hard treatment) झगडत मोठा होतो, तो दुष्टांशी सहज दोन हात करतो आणि कठीण परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरा जातो, यशस्वी होतो.

आपल्याला आयुष्यात खूप चांगले यश हवे असेल तर कष्ट करून, प्रयत्न करून, अडचणींना तोंड देऊन सतत शिकले पाहिजे, म्हणजे मोठ्या Heat treatment मधून गेलं पाहिजे. या वाक्याने नेहमी त्या विषयाच्या प्रास्ताविकाचा समारोप होत असे.

2004च्या सप्टेंबरपासून मी प्राचार्य झाले. 2006मध्ये आशिष चिखले नावाचा माजी विद्यार्थी मला भेटायला आला. 1992मध्ये  बारावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेला आशिष इतक्या वर्षांनी अचानक माझ्यासमोर आला होता. त्याचे राहणीमान आणि सुधारलेली देहयष्टी यामुळे क्षणभर मी त्याला ओळखलेच नाही, मात्र त्याची ओळख पटल्यावर मी आनंदाने थोडेसे ओरडूनच म्हटले,

“आशिष…! किती वर्षांनी भेटलास रे…!”

मी त्याला नावानिशी ओळखले, याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. मी म्हटलं,

“अरे बैस.”

“नको मॅडम.”

“अरे बाबा, आता तू फक्त माझा विद्यार्थी नाहीस, मित्रदेखील आहेस. बैस, प्लीज.”

मग मात्र आशिष माझ्यासमोरच्या खुर्चीत बसला.

“तुम्ही प्राचार्य झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन…”

” थँक्स…! तू कसा आहेस? आज कशी आठवण आली?”

“मॅडम…, आमच्या कंपनीत दहा ट्रेनी हवे आहेत CNC मशीन विभागात,” असे म्हणत त्याने त्याचे कार्ड माझ्यापुढे सरकवले. मी ते कार्ड काळजीपूर्वक वाचून त्याला विचारले, “बिलेट्स इंडिया लिमिटेड… अरे वा, वर्क्स मॅनेजर…”

क्षणभर थांबून त्याच्याकडे कौतुकाने पहात मी पुन्हा विचारले,

“आशिष कसा पोहोचलास इथपर्यंत?”

त्याने सांगायला सुरुवात केली…

“मॅडम, सुरुवातीला मी गोदरेज अँड बॉईज कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून लागलो होतो. दोन वर्षानंतर तिथेच ऑपरेटर म्हणून लागलो. एक वर्षानंतर सुपरवायझर झालो. गोदरेज अँड बॉईज कंपनीमध्ये पाच वर्षं होतो. त्यादरम्यान मी मेकॅनिकल इंजिनियरींगचा डिप्लोमा पूर्ण केला. खरंतर, मी तिथे सुरक्षित होतो, पगार बरा होता; पण मला खूप मोठे व्हायचे होते… मग विचार केला, “आत्ताच इथून बाहेर पडलं पाहिजे.”

“मग मी राजीनामा देऊन सरळ बाहेर पडलो. लहान कंपनीत नोकरी करायची ठरवले, तिथे सर्व डिपार्टमेंटमध्ये काम करता येते ना! दोन वर्षे एका लहान कंपनीत काम केले, तिथे अक्षरशः लोडिंग अनलोडींगपासून मार्केटिंग, सेल्स, अकाउंट्स या आणि अन्य विभागात काम केलं. त्यानंतर आणखीही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं.”

“खूप कष्टाचे दिवस होते ते. गोदरेजमध्ये एकाच विभागात आरामशीर काम होतं. त्या तुलनेत इथे कष्ट फारच जास्त होते. तेही कमी पगारात‌. CNC मशीनवर काम करायला देखील शिकलो. खूप खडतर आयुष्य होतं ते. आज आठवलं की मलाच आश्चर्य वाटतं, कसे करू शकलो मी इतके काम. त्या सर्व अनुभवांचा या कंपनीत मात्र खूप उपयोग झाला आणि त्यामुळेच मी इथपर्यंत येऊन सेटल झालो आहे.”

थोडावेळ थांबून आशिष म्हणाला,

“मॅडम, तुम्हाला आठवतंय हिट ट्रिटमेंटचा पोर्शन शिकवताना तुम्ही जुळ्या भावांची गोष्ट सांगितली होती. लोखंडदेखील ट्रीटमेंट घेतल्याशिवाय मजबूत होत नाही. मजबूत झाल्यावरच त्याची किंमत वाढते. आपल्याही आयुष्यात आपली किंमत, मान वाढवायचा असेल तर, खडतर परिस्थितीतून गेलेच पाहिजे. रिस्क घेतलीच पाहिजे, हे माझ्या मनात ठसलं होतं आणि म्हणून मी गोदरेज अँड बॉईज कंपनीची सुखाची नोकरी सोडू शकलो.”

आशिष खूप भरभरून बोलत होता.

आपल्या टीचिंग लर्निंग प्रोसेसचा एखाद्याच्या मनावर इतका खोलवर परिणाम झाला-होईल आणि आयुष्यावर त्याचा एवढा चांगला परिणाम होईल, याची मलाही कल्पना नव्हती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!