मंदार अनंत पाटील
परळ येथील प्राण्यांच्या इस्पितळात रीगलला गेल्यावर कळले की, जेनेटिक दोषामुळे त्याला जलोदराचा कॅन्सर झाला आहे आणि काहीही खाल्लेले रक्ताऐवजी पाण्यात रुपांतरित होते. एकदा ऑपरेशन करून पाणी काढले गेले, पण परत काही दिवसांत तीच स्थिती उद्भवली. त्याला शरीर साथ देत नव्हते. रीगलचे हाल बघवत नव्हते. शेवटी मनावर दगड ठेवून वडील आणि वेटच्या मतानुसार रीगलला दयामरण दिले गेले. 21 फेब्रुवारी 1991ला जन्मलेला माझा अतिशय जीवलग मित्र फक्त दीड वर्ष जगला; पण जाताना मला अतिशय गोड आणि शेवटपर्यंत पुरतील अशा खूप आठवणींची शिदोरी देऊन गेला.
आज देखील जवळ-जवळ 33 वर्षांनी त्याची ह्रदयस्पर्शी आठवण लिहिताना डोळे अजूनही डबडबले आहेत आणि हुंदका दाबून ठेवायचा प्रयत्न करतो आहे. मी अगदी आजतागायत त्याचे काढलेले फोटो, पंचा जपून ठेवला आहे. त्याचा एक अतिशय देखणा फोटो तर, अजूनही माझ्या घरात फ्रेम करून ठेवला आहे. मी पल्लवीला नेहेमी सांगतो की, जगात कुत्र्याच्या 339 जाती आहेत, पण डॉबरमनसारखा कुत्रा होणे नाही. परत कधीही योग आला तर, याच जातीचा आणि तपकिरी रंगाचाच श्वान आणेन. रीगलनंतर खूप सवंगडी आले आयुष्यात. आवड जोपासायला का होईना, पण एक-दोनदा काही लोकांना त्यांच्या सांभाळलेल्या श्वानांना वेटकडे (वेटरिनॅरिअन – Veterinarian) ने किंवा ट्रेनिंग दे, असे उद्योग नक्कीच केले. आयुष्यातील पहिले बचाव कार्य केले, ते म्हणजे एका चाळवजा घरातून पामेरियन कुत्री आणि तिच्या दोन पिल्लांना भयंकर परिस्थितीमधून सोडावून अतिशय प्राणीप्रेमी घरांमधे दिले आणि अशा अनेक सुंदर आठवणी रीगलला समर्पित…!
नंतरची काही वर्षं कॉलेज जीवन, खडतर काळ आणि आर्थिक अडचणी यामुळे कुठलाच प्राणी नाही पाळता आला. पण नाही म्हणायला, मासे पाळायचा शौक सुरूच ठेवला होता आणि या काळात ऑस्कर तसेच रेड बेली पिरान्हा जातीचे अतिशय दणकट मासे पाळले होते. माझ्या या अनुभवाचा फायदा करून माझा मावसभाऊ संदीप आणि माझी भाची मधुरा यांनाही मी प्राण्यांचा छंद लावला. त्यांनीदेखील मासे, पक्षी तसेच कासव असे विविध प्राणी सांभाळले. माझा भाऊ संदीप तर, आता मासे तज्ज्ञ झाला आहे.
साधारण 2006च्या सुमारास उच्च शिक्षणाकरित यूकेला जायचा योग आला आणि साधारण 2007पर्यंत शिक्षण, नोकरी आणि यूकेमधील जीवन यामुळे फारसा वेळ मिळाला नाही, परत प्राणी सांभाळायला. पण 2008च्या सुमारास लंडनमध्ये बॅटरसी डॉग होम नावाची सेवाभावी संस्थेबाबत माहिती समजली. ही संस्था अनाथ आणि दुर्लक्षित प्राणी-पक्षी यांना आश्रय देते आणि पुनर्वसन करते. ही संकल्पना मला फार आवडली. त्यांच्या वेबसाइटला भेट दिल्यावर असे कळले की, ते प्राणी दत्तकही देतात आणि त्यांची फी अगदी माफक होती. पण दत्तक घ्यायची प्रक्रिया थोडी लांबलचक आणि क्लिष्ट होती. पण सर्व अडचणींवर मात करून एकदा त्या संस्थेस भेट द्यायचा योग आला. तिथली उत्तम व्यवस्था, प्रत्येक प्राणी-पक्षीकरिता नेमलेले स्वयंसेवक, अतिशय कमालीची स्वच्छता आणि कामाचे नियोजन पाहता, आपणही काही हातभार लावावा, असे वाटले. पहिल्यांदा मासिक £5.00चे डोनेशन भरून सुरुवात केली. मनाला एका मुक्या जिवाला मदत केल्याचे समाधान. तिथले नियम आणि दत्तक प्रक्रिया यामुळे कुठलाच श्वान मिळाला नाही.
नंतर यथावकाश 2019मध्ये प्रथमच पक्षी आणले गेले आणि हे माझे परदेशातले पहिले सखेसोबती झाले.
क्रमश: