Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeअवांतरमी पिदू आणि हा दनू…

मी पिदू आणि हा दनू…

दिप्ती चौधरी

मांजरीविषयी अनेकांच्या मनात समज-गैरसमज, काही प्रश्न असतात. म्हणूनच त्यांच्याबाबत काहीतरी माहिती मिळावी यासाठी मी माझी कहाणी सांगतो. कारण बहुदा आम्ही दोघं सर्वात जास्त प्रवास केलेले माऊ असू. मुंबईहून बंगलोर आणि तिथून आता आम्ही अमेरिकेत आलो आहोत. केल्याने देशाटन…. या उक्तीप्रमाणे आम्ही आता हुशार वगैरे झालो आहोत आणि आमच्या आई, पप्पा आणि दिदी यांनाही हुशार करून सोडले आहे!

तर मी आणि दनू मुंबईतल्या एका सोसायटीमध्ये राहत होतो. आमच्या पिढ्या न पिढ्या इथेच मिळेल ते शोधून जगत होत्या. कोणी कधी उरलंसुरलं फेकले तर, तोच आमचा उदरनिर्वाह होता. आमची आजी ही महा खट मांजर होती. तिने दुधाच्या पिशव्या फोडण्याचे कसब आत्मसात केले होते. सर्वांवर दादागिरी करणारी म्हणून तिला सोसायटीतील मुलांनी बुलडोझर नाव ठेवले! तिची मुलगी काळी असल्याने दिदीने तिचे नाव रोड रोलर ठेवले! उपासमारीमुळे असेल पण या दोघींची पिल्ले काही जास्त जगत नसत. पण तेव्हाच आमच्या बिल्डिंगमध्ये एक नवीन कुटुंब राहायला आले. त्यांच्या पाळलेल्या भुभू बरोबर त्यांनी या माऊंनाही थोडे खायला द्यायला सुरुवत केली.

तेव्हाच आमची दिदी पण तिच्या आजी आणि आजोबा म्हणजे बाबांकडे शाळेसाठी दोन वर्षं राहायला आली. तेव्हा बुलडोझरचा मुलगा डिग्गर थोडा मोठा झाला होता. बुलडोझरचा दुसरा मुलगा डंपर म्हणजे दनू. तो जन्मल्यानंतर त्याला वाढवले मात्र रोडरोलरने. लहानपणी डंपर खूप खेळकर होता, सतत उचापत्या करायचा म्हणून दिदीचा खूप लाडकाही होता. ती येता-जाता आमचे खूप लाड करायची, त्यामुळे ती शाळेत जायच्या वेळी आम्ही दरवाजाजवळ बसून राहायचो. ती निघाली की, तिला सोसायटीच्या गेटपर्यंत सोडून शाळेच्या बसमध्ये बसवून द्यायचो. येतानाही तिला गेटवरून घरी सोडण्याची जबाबदारी आमचीच!

दिदीबरोबर असलेल्या मैत्रीमुळे आजी आणि बाबाही आम्हाला खायला देत. बाबा आणि आजी आम्हाला खास मासे आणून द्यायचे. तसे त्यांनाही प्राणी खूप आवडतात. टायगर नावाची त्याचीं माऊ भली अठरा वर्षं जगली होती. पण नंतर पाळलेल्या राजाचा अंत खूप लवकर आणि वेदनादायक होता. तो नेहमी आजारी पडायचा. बाबांनी त्याला अनेकदा मरता-मरता वाचवलं; पण बाबा आणि आजी हे मामाकडे अमेरिकेला गेले असताना तो खूप आजारी पडला. डॉक्टर, औषध प्रयत्न करूनही तो काही प्रतिसाद देईना. शेवटी त्याच्या वेदना आणि फरफट बघवत न्हवती. त्या अनुभवातून त्यांनी पुन्हा म्हणून प्राणी पाळायचा नाही, असा कानाला खडा लावला होता. त्यामुळे आमच्या बाबतीतही सुरुवातीला कठोरच होते. तेव्हा आई आणि पप्पा जम्मूला राहायचे. दिदीचे लाडके म्हणून त्यांनी आमच्यासाठी कॅटफूड पाठवायला सुरुवात केली. आता आम्हाला व्यवस्थित आणि वेळेवर खाणे मिळत होते. आम्ही सर्व मजेत होतो पण तिथेच काही जणांच्या पोटात दुखु लागले!

आतापर्यंत बेवारस असलेली सोसायटीतील मांजरांची जबाबदरी कोणीतरी घेतली… हे नजरेत आल्यावर अचानक इतकी वर्षं सोसायटीत सुखेनैव वास्तव्य करणाऱ्या मांजराचा त्रास सुरू झाला…

(क्रमशः)

(पिदू या मांजराची आत्मकथा)

diptichaudhari12@gmail.com

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सुंदर .., आमच्या कडे पण मांजर असल्यामुळे आम्ही अनुभव घेत आहोत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!