रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. बीटचा मठ्ठा, मेथीची कोफ्ताकरी, स्वादिष्ट पन्हे बनविण्याच्या या टिप्स वापरून पाहा.
- पानकोबी आणि फुलकोबी या भाज्यांची काही वेळा चव जाते. अशा वेळी भाजीला फोडणी देताना तेलात मोहोरी फुटल्यावर पाच-सहा मेथ्या आणि चिमूटभर ओवा टाकल्यास भाजी चवदार होते.
- संक्रांतीनंतर हलवा आणि तिळगूळ वड्याचा भुगा उरतो. तो सर्व बारीक कुटून वांग्यांच्या भाजीत किंवा रसदार भाजीत घातल्यास दाटपणा येतोच आणि खमंगपणाही येतो.
- साखरांबा किंवा गुळांबा उरल्यास त्यात पाणी आणि मीठ घालून, मिक्सरमध्ये घुसळून घेतल्यास स्वादिष्ट पन्हे होते.
हेही वाचा – Kitchen Tips : कारल्याची भाजी, मसालेदार भाज्या, मिरचीचा ठेचा बनविताना…
- भाजीला पीठ लावताना पाण्यात भिजवून लावावे; कमी पुरते, फार लागत नाही. त्यासाठी चणाडाळ अर्धा किलो, तांदूळ पाव किलो, तूरडाळ आणि उडीदडाळ मिळून अर्धा किलो दळून आणावे. पौष्टिकता आणि रुची वाढते.
- नारळ खवून त्याचे दूध काढून ते अनेक पदार्थांत घातले जाते आणि त्याचा चव फेकून दिला जातो. पण हा जर फ्रीजमध्ये ठेवून, परतून केलेल्या पालेभाजीत घातला तर भाजीला फारच छान चव येते.
- कोणत्याही पातळ भाजीमध्ये खलबत्त्यात कुटलेले शेंगदाणा कूट न घालता मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटून घेतलेले कूट घातल्यास नेहमीपेक्षा निम्मेच कूट लागते आणि रस्सा घट्ट होतो.
- बीट उकडल्यावर त्याचे पाणी टाकून न देता त्यात ताक घालावे. ताकाला आले, मिरची वाटून लावून जिऱ्याची फोडणी द्यावी. मीठ आणि साखर घालून केलेला बीटचा मठ्ठा पिण्यास फारच छान लागतो.
- अळूची भाजी प्रथम शिजल्यानंतर सर्व साहित्य घालून (मीठ, तिखट, चिंच, गूळ) सारखी करतो, तेव्हा अर्धा वाटी ताडी कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा मेथी कुटून त्यात घालावी. छान चव येते.
- रात्रीची मेथीची भाजी उरली असल्यास, त्यात डाळीचे पीठ, मीठ, तिखट आणि चिमूटभर सोडा टाकून चांगले मळावे आणि गोल गोळे करून गुलाबी रंगावर तळावे. त्याची रसगोळ्यांची भाजी (कोफ्ताकरी) करावी. छान लागते.
हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स
- पावभाजीसाठी फ्लॉवर आणि मटार उकडताना त्याच्याबरोबर एक चांगले लालबुंद बीट किसून घालावे. त्यामुळे पावभाजीस तिखट कमी घालूनसुद्धा छान लाल रंग येतो आणि पावभाजीच्या चवीतही काही फरक पडत नाही.
- टोमॅटो कापताना सुरीला किंवा विळीला तेल लावल्यावर भराभर कापला जातो. बारीक फोडी हव्या असतील तर (दोन भाग केल्यावर) आतील बाजूने कापावा.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


