मयुरेश गोखले
आपल्या नवऱ्याचं किंवा प्रियकाराचं आपल्याकडे लक्षच नसतं, असं म्हणणाऱ्या सर्व महिलांना आणि लक्ष नसलेल्या पुरुषांना समर्पित…
ती नेहमी म्हणते, तुझं माझ्याकडे लक्षच नसतं… आणि ते बरोबरच आहे. माझं खरंच लक्ष नसतं तिच्याकडे! अगदी सुरुवातीपासून म्हणजे ती मला जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हापासून कधीच लक्ष नव्हतं माझं तिच्याकडे… पहिल्या भेटीत खूप बोलली, पण माझं लक्षच नव्हतं! कारण, ती बोलत असताना तिच्या हलणाऱ्या कानातल्याकडे बघत बसलो मी…
एकदा एका तलावाच्या काठी मावळतीचा सूर्य आमच्याकडे पाहात होता आणि ती पण सूर्याकडे बघत काहीतरी बोलत होती… माझं लक्षच नव्हतं तिच्या बोलण्याकडे! कारण, तिच्या डोळ्यांत दिसणाऱ्या सूर्याचं प्रतिबिंब इतकं बोलकं होतं की, त्या डोळ्यांत बघत बसलो मी…
एकदा हॉटेलमध्ये बसलो असताना नवीन घातलेल्या अंगठीकडे माझं लक्ष जावं म्हणून ती बोलताना सारखा हात हलवत होती, पण माझं लक्षच नव्हतं! कारण तिच्या बोटांची नाजूक हालचाल बघत बसलो मी…
‘कालच्या पार्टीत कुठल्या रंगाचा ड्रेस घातला होता?’ या तिच्या प्रश्नाचं उत्तर कधी देताच येत नाही मला… माझं लक्षच नसतं तिच्या सुंदर ड्रेसकडे! कारण, सुंदर ड्रेसपेक्षा ती त्या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसते, एवढंच बघत बसतो मी…
हेही वाचा – Love story : उलटून रात्र गेली…
कुठल्या कारणावरून तिला राग आला, याकडे माझं लक्षच नसतं कधी! कारण, रागात तिच्या फुगलेल्या नाकाकडे बघून मनात हसत असतो मी…
घरच्या कामात माझं अजिबात लक्ष नसतं, अस ती नेहमी म्हणते… खरंय, माझं लक्षच नसतं कधी! पूर्ण कुटुंबाचं भविष्य सुंदर होण्यासाठी माझ्या ऑफिसच्या कामाकडे जास्त लक्ष देतो मी…
कुठल्या कारणावरून ती बेचैन आहे, याकडे लक्षच नसतं माझं कधी! कारण, तिला मिठीत घेऊन सुरक्षित वाटावं याचाच विचार त्यावेळी करत असतो मी…
हेही वाचा – श्वास तुझा मालकंस…
अशा अनेक गोष्टींकडे माझं लक्षच नसतं कधी आणि ती म्हातारी झाली तरी, असंच माझं कधीच लक्ष नसणार आहे तिच्याकडे… कारण, तिच्यावर प्रचंड प्रेम करतो मी!
मोबाइल – 9423100151
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


