मनोज
गाण्यांचा विषय हा न संपणारा आहे. हे वाक्य मी रीपिट करतोय. आधीच्या लेखात जुन्या गाण्यांबद्दल लिहिले; मग नवीन गाणी इतकी टाकाऊ आहेत का?… असे वाटायला नको. मुळात जुनी गाणी आणि नवी गाणी याच्या दरम्यानची सीमारेषाच पुसट आहे. ‘कयामत से कयामत तक’, ‘डर’, ‘रोजा’, ‘रंगीला’, ‘बाजीगर’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मैंने प्यार किया’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘दामिनी’ हे सर्व माझ्या पिढीतील सिनेमे. यातील गाणी हीट झाली, आजही ऐकली जातात. मग ही गाणी नवी समजायची की जुनी?… नाही ठरवता येत! या बहुतांश सिनेमांतील गाणी श्रवणीयच होती. त्यात दुमत असण्याचे कारणच नाही.
जर 2000 साल ही सीमारेषा ठरवली तरी, 2001-02 सालचे ‘दिल चाहता है’, ‘अशोका’, ‘लगान’ ‘गदर’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘लज्जा’, ‘देवदास’, ’राज’, ‘सूर’, ‘दिल है तुम्हारा’, ‘साथिया’.. या चित्रपटांतील गाणी गाजलीच होती.
आधीच्या लेखाप्रमाणेच, श्रवणीय संगीत, भावपूर्ण शब्द आणि मधुर आवाज, हेच काय ते, आमच्या पसंतीचं निकष. (राग समजत नाही आणि येतही नाही.) सोनू निगम, अंकीत तिवारी, श्रेया घोशाल, अरजित सिंग वगैरेंची गाणी ही श्रवणीय आहेत. काही गाणी अशी आहेत की, गायक खात्रीशीर सांगता येत नाहीत, पण ती गाणी खूप छान आहेत. ‘इन दिनों…’, ‘सूरज हुआ मध्यम…’ ‘वो लम्हें वो बातें…’, ‘सुन रहा है ना तू…’, ‘तुम ही हो…’, ‘लबों को लबों से…’ ‘साथिया…’ (सिंघम), ‘दिल संभल जा जरा…’, ‘तुझे देख देख सोना..’, ‘फिरता रहूँ…’, ‘साँसों को साँसों में ढलने दो जरा…’, ‘नित खैर मंगा सोह्णेया मैं तेरी…’, ‘मेरे रश्के क़मर…’, ‘तय हैं…’, ‘देखा हजारो दफा…’
‘जब वुई मेट’ या सिनेमातील सर्व गाणी खूप छान आहेत. ‘आओगे जब तुम साजना…’पासून ‘ये इश्क हाये…’पर्यंत. ‘ओम शांती ओम’, ‘तेरे नाम’, ‘रंग दे बसंती’, ‘जाने तू या जाने ना’, ‘कल हो ना हो’, ‘मैं हूँ ना’, ‘तारे जमीं पर’, ‘थ्री इडियट्स’… असे अनेक सिनेमे म्युझिकल हिट आहेत. सुफी गीतांवर आधारित गाण्यांचीही सध्या चलती आहे. विशेषत:, कैलाश खेर यांची गाणी सुफीवर आधारित आहेत.
काही गाण्याचे शब्द गीतकाराच्या प्रतिभेच्या दिवाळीखोरीचे दर्शन घडवितात. ‘जुडवा 2’मधलं ‘सुनो गणपती बाप्पा मोरया…’ हे गाणं तसंच आहे. हे गाणं ऐकल्यावर मला धक्काच बसला. याशिवाय ‘बंगले के पीछे है ताला…’ यासारखी गाणी आहेतच! पर्याय नाही, सांगणार कुणाला? खुद्द गीतकार समीर यानेच एका कार्यक्रमात याची कबुली दिली आहे. कधी कधी गाणे सुचलेले नसते. संगीतकाराकडे जाताना कोणत्याही शब्दांचा वापर करतो आणि गाणे तयार होते… याचे उदाहरण देताना ‘बोल राधा बोल’चे उदाहरण दिले. ‘तू तू तू तू तारा…’ हे गाणे!
मधल्या काळात जुन्या हिट गाण्यांचाही वापर चित्रपटांमध्ये करण्यास सुरुवात झाली. ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’मधलं ‘डिस्को दीवाने…’, ‘बद्रीनाथ की दुल्हनीया’मधलं ‘तम्मा तम्मा लोगे…’ तर आता ‘मुबारकन’मधलं ‘हवा हवा…’ या गाण्यांचा उल्लेख करावा लागेल.
यातही सनम पुरी आणि त्याच्या बॅण्डला जास्त क्रेडिट द्यावं लागेल. नव्या पिढीला त्यांनी जुनी सदाबहार गाण्यांची ओळख करून दिली. विशेष म्हणजे, ‘रिमिक्स’च्या नावाखाली जुन्या गाण्यांची मोडतोड करून त्यात अगम्य असे किंवा गाण्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसलेले इंग्रजी शब्द घुसवले जातात, तसला प्रकार या बॅण्डने केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या आवाजात ही जुनी गाणी ऐकताना गोडवा कायम राहतो.
मात्र काही गाणी अशीही आहेत की, नुसतंच ढॅण ढॅण म्युझिक वाजतं, पण शब्द लगेच कळत नाहीत. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर, ‘रा वन’मधल्या ‘छम्मक छल्लो…’ गाण्याचं देता येईल. शपथ घेऊन सांगतो, हे गाणं अजूनही मला नीटसं समजलेलं नाही. त्यातच पंजाबी गाण्यांचा ट्रेण्ड पुन्हा सुरू झाला आहे. ‘तौबा तौबा…’ हे गाणं दोन्ही बाबतीत फिट बसते. अशा गाण्यांबद्दल बोलायचे म्हणजे, तौबा तौबा!
मराठी सिनेइंडस्ट्री देखील याबाबत मागे राहिलेली नाही. मधल्या काळात…. नको त्या कटू आठवणी आणि पुन्हा रक्तदाब वाढवून घेणं! तर, आताही वेगवेगळे विषय, उत्तम अभिनय, छानसे संगीत, सुरेल आवाज हे मराठी चित्रपटांत दिसत आहे. असे वाटते गतवैभव पुन्हा प्राप्त होत आहे. ‘क्षणभर विश्रांती’, ‘नटरंग’, ‘अगं बाई अरेच्चा’ अशा काही चित्रपटांतील गाणी ओठांवर रहाण्याजोगी होती. त्याशिवाय, अलीकडच्या सुपरडुपर हिट ‘सैराट’चेही नाव घ्यायला लागेल. ‘कोंबडी पळाली…’ आणि ‘चिव चिव चिमणी…’ सारखी गाणीही याच काळातली अन् हिट झालेली!!
पण या सर्वांत ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे महत्त्व वेगळेच आहे. सुबोध भावेचे त्याबद्दल कौतुक करावे लागेल. या सिनेमामुळे दोन गोष्टी साधल्या गेल्या – 1. नवी पिढी नाट्यसंगीताच्या जवळ गेली आणि 2. बहुतांश सर्वांनाच राहुल देशपांडे, महेश काळे यासारख्या शास्त्रीय बैठक असलेल्या गायकांची ओळख झाली.