मानसी देशपांडे
ख्यातनाम लेखक व.पु. काळे यांनी म्हटलंच आहे, “ज्याला लेखणीतून संवाद साधता येतो त्याला मी लेखक समजतो…” लेखकांना वाचकांची नस बरोबर माहीत असते. जे आपल्या व.पुं.ना देखील माहीत होती. हे झालं लेखांचं. पण कवितेचं विश्व हे खूप वेगळे आणि अजब असते. कारण, काव्य हे पद्यात्मक पद्धतीने सादर करून तिथे तुम्हाला श्रोतावर्ग मिळतो. नुसती यमक जुळवून कविता होत नाही तर, त्या कवितेत इतकी ताकद असावी लागते की, त्यातील मर्म प्रेक्षकांना म्हणा किंवा श्रोत्यांना समजले पाहिजे. अशीच एक कविता कवी ग्रेस यांची आहे. अतिशय प्रसिद्ध आणि आयुष्याचं सार समजावणारी आहे. ती म्हणजे “भय इथले संपत नाही…” खूप अर्थपूर्ण कविता आणि त्याला चाल लावल्यामुळे याचं रुपांतर गाण्यात झाले.
या गीतातली कातरवेळ ही एक प्रकारे मनात भय निर्माण करणारी आहे. मुळात, भीती ही प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या गोष्टींची ही असतेच. पण, संध्याकाळच्या वेळी आपल्या प्रिय व्यक्तीचे आपल्यासोबत नसणं, ही जाणीव कवीला भयप्रद वाटत आहे. भीती ही कोणालाही चुकलेली नाही हे सत्यच आहे. पण आयुष्य जगताना तुमच्या जवळच्या माणसांची असलेली सोबत खूप आधार देणारी असते. व. पु. म्हणतात, “काळ फक्त माणसाचं आयुष्य वाढवतो. पण आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो…” इथे कवी नेमके हेच सांगू पाहत आहेत. जगरहाटी ही अशी आहे की, तिथे अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते, पण इथे सामोरे जाताना ती आठवण मात्र पाठ सोडत नाही…
“भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते..”
विरहाची भावनाच खूप वाईट असते. तुम्ही घालवलेले क्षण हे अशा वेळी डोळ्यांसमोर येतात आणि त्यामुळे येणारे अश्रू हे कितीही ओघळले तरी, तो वियोग संपत नाही. इथे परत व.पु. म्हणतात ते पटतं, “आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला ते कळतच नाही, पण त्याच आवडत्या व्यक्तीच्या प्रतिक्षेत काळ नकोसा होतो…”
ही कविता मुळातच गूढतेकडे झुकणारी आहे. चंद्र हा जरी ग्रह असला तरी प्रेमाच्या विश्वात याचं महत्त्व विसरून चालणार नाही. चंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे तो पौर्णिमेपर्यंत कलाकलाने वाढतो तर अमावस्येला त्याचा क्षय होतो. तसंच, झरे हे कायमच वाहत नाही तर, ते देखील आटतातच. ही काव्य प्रतिभा आहे, जी कवीलाच सुचू शकते. म्हणून तर ही ओळ तशीच आहे,
“हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया…”
भगवा रंग म्हणजे कोणतीही आसक्ती नसलेला, निरपेक्ष रंग. म्हणून या धरित्रीचा अनासक्त स्वभाव कवी ग्रेस दाखवू पाहत असावेत. पुढची ओळ मात्र खरं आयुष्याचं सार सांगणारी आहे. आपण आयुष्य जगतो, पण जन्माला येताना आपण सोबत काहीही घेऊन येत नाही. छोट्याशा कळीचे जेव्हा फुलांत रुपांतर होते, तेव्हा ते देखील पाणी, सावली, ऊन यांच्या आधाराने होते. मग यावरून कवी सुचवू इच्छितात की, आपण कितीही मोठे झालो तरी, ज्या सावलीत वाढलो आहोत, जिथून आलो आहोत ते कायम लक्षात ठेवले पाहिजे. कारण, जन्म-मृत्यू हे कालचक्र कोणालाच चुकले नाही.
“झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया…”
तुम्हाला सांगते, आपली मानसिक अवस्था जेव्हा खूप वाईट असते, तेव्हा गरज असते ती जवळच्या व्यक्तीच्या सहवासाची. आपण जो जीव लावतो त्यामुळे प्रेम निर्माण होते आणि त्या व्यक्तीची ओढ मनाला स्वस्थ बसू देत नाही. इथे व. पु. देखील तेच म्हणतात, “ओढ काय असते ते जीव लावल्याशिवाय कळत नाही…” या कडव्यात कवीने सीतेच्या विरहाचे एक हळवे उदाहरण दिले आहे. वनवासात असताना हनुमंताने तिला जी रामाची अंगठी खूण म्हणून दिली, त्या अंगठीने सीतामाई खूप सुखावली. कारण, त्या विरहात तिला ती अंगठी म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम तिच्यासोबत आहेत, असेच वाटते.
“तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शून गेला,
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला…”
मला कधीकधी परमेश्वराच्या रचनेचे आश्चर्य वाटते. त्याद्वारे प्रेमभावना प्रकट करणे तसेच अनुभवणे अनोखे आहे. जसं की, प्रेमाची कबुली देताना डोळे खूप काही बोलतात, हातांचा स्पर्श शरीरात एक प्रकारची कंपनं निर्माण करतो. पण, हे जरी असलं तरी जी प्रिय व्यक्ती सोबत नाही, तिची आठवण स्वस्थ बसू देत नाही आणि मग परमेश्वराजवळ ते दुःख आपण सांगत असतो. त्याच्याशी बोललं की, मनाला चांदण्यांसारखी शीतलता मिळते. पण हे कधी होतं तर, त्या प्रेमाच्या रथाला ओढ आणि विश्वास, असे दोन वारू असतात… तरचं ती प्रार्थना फळते. हा कवीने सांगितलेला मतितार्थ असावा. तर, गद्य रुपात व. पु. सांगतात, “नुसती मखमल टिकत नाही. मागे अस्तर लागतच…”
एक गोष्ट मात्र नक्की, मनाला कितीही शांतता मिळाली तरी आठवणी या येतातच. त्यांना अंत नसतो. कवीच्या प्रतिभेचं खरंच कौतुक वाटतं, आठवणींना चांदण्यांची उपमा दिली आहे. बघा ना, आकाशात जेव्हा चांदणं पडतं तेव्हा त्यात मनसोक्त विहार करण्यासाठी मन तयार असतं. तसंच, आठवणी या देखील नेहमी मन टवटवीत करतात.
“स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे,
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे…”
खरंच, कवी ग्रेस यांनी या गीताच्या माध्यमातून आयुष्याचा अर्थ समजावला आहे. भीती ही अनामिक असली तरी तिला आपण टाळू शकत नाही. जीवाभावाची व्यक्ती सोबत नसणं म्हणजे देखील मनाला त्या व्यक्तीच्या सहवासाची लागलेली हूरहूर असते. शेवटी काय तर, एक वेळ अशी येते की स्वतःला विसरून ज्या मातीत जन्म घेतला तिथेच समरस होऊन जाणे, यालाच जगरहाटी म्हणतात. कवी ग्रेस यांचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आणि लतादिदींचा स्वरसाज यामुळे हे गाणे नटले. आज दुर्दैवाने लतादिदी आणि कवी ग्रेस आपल्यात नाहीत, पण ज्या मातीत ते जन्मले तिनेच त्यांना आपल्या कुशीत घेतले. हे नक्की..
“संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने,
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने..”