वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते । सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥4॥
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥62॥ जयाचें सुखदुःखाचेनि आंगें । झगटलें मानस चेवो नेघे । विषय पासींही आलिया से न रिघे । हें काय म्हणऊनि ॥63॥ इंद्रियें कर्माचां ठायीं । वाढीनलीं परि कहीं । फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं ॥64॥ असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वोळखें तूं ॥65॥ तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां । सांगें तया ऐसी हे योग्यता । कवणें दीजे ॥66॥
उद्धरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत् । आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥5॥
तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें । कवणासि काय दीजेल कवणें । येथ अद्वैतीं इये ॥67॥ पै व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रित होइजे । ते वेळीं दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥68॥ पाठी अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो । ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपांचि ॥69॥ म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलीया । देहाभिमाना ॥70॥
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः । अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥6॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आइकें सकळ संमते जगीं, अर्जुना गा तोचि योगी…
अर्थ
विषयांच्या ठिकाणी आणि कर्मांच्या ठिकाणी जेव्हा आसक्त होत नाही आणि जेव्हा (त्याचे) सर्व संकल्प सुटलेले असतात, तेव्हा त्या योग्याला योगारूढ असे म्हणतात. ॥4॥
तरी ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे येणे-जाणे होत नाही आणि जो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ निजलेला असतो, ॥62॥ ज्याच्या मनाला सुखदु:खांनी स्वत: धक्के दिले असताना, ते जागे होत नाही, विषय अगदी जवळ आले तरी, हे काय आहे म्हणून ज्याला स्मरणही होत नाही ॥63॥ ज्याची इंद्रिये कर्मे करीत असली, परंतु ज्याच्या अंत:करणात फलाची इच्छा कधीही उत्पन्न झाली नाही, ॥64॥ जो देहधारी असून वरीलप्रमाणे असतो आणि जो जागृत पुरुषाप्रमाणे सर्व व्यवहार करीत असूनही निद्रिस्ताप्रमाणे क्रियाशून्य दिसतो, तोच उत्तम प्रतीचा योगनिष्णात आहे, असे तू समज. ॥65॥ त्यावेळी अर्जुन म्हणाला, अनंता, तुझे बोलणे ऐकून मला फार आश्चर्य वाटते. त्याला अशी ही योग्यता कोण देतो? ॥66॥
आपण आपला उद्धार करावा, आपला घात करू नये. आपण स्वत:च स्वत:चे मित्र आहोत, स्वत:च स्वत:चे शत्रू आहोत. ॥5॥
तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, तुझे बोलणे आश्चर्यकारक नव्हे काय? या अद्वैतामध्ये येथे कोणाला कोणी काय द्यावयाचे आहे? ॥67॥ अविवेकरूपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने (ज्यावेळेला जीव) निजतो, त्यावेळेला हे जन्ममरणरूपी वाईट स्वप्न तो अनुभवतो. ॥68॥ नंतर ज्यावेळेला अकस्मात् जागृती येते त्यावेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो, तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो. ॥69॥ म्हणून अर्जुना, मिथ्या जो देहाभिमान, त्याकडे चित्त देऊन आपणच आपला घात करतो. ॥70॥
ज्याने स्वत: स्वत: जिंकले तो स्वत: स्वत:चा मित्र होय; पण ज्याचा स्वत:वर ताबा नाही, तो स्वत:च्याच ठिकाणी शत्रूप्रमाणे शत्रुत्वाने वर्तन करतो. ॥6॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐकें संन्यासी तोचि योगी, ऐसी एक्यवाक्यतेची जे जगीं…


