Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeललितसुटका सावकारी पाशातून...

सुटका सावकारी पाशातून…

ॲड. कृष्णा पाटील

असाच एक रविवार होता. सुट्टीच्या दिवशी कधी मिटींग असते. कधी गेट-टुगेदर असते. कधी व्याख्यान असते.. अशाच एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो. कार्यक्रमाची वेळ दुपारी एकची होती. मी साडेबारा वाजता वेळेआधीच कार्यक्रम स्थळावर पोहोचलो. भक्क ऊन पडलं होतं. उन्हात कापडी रंगीत मंडप तळपत होता. स्टेजवर शुभ्र काचेचा पुरुषभर उंचीचा डायस ठेवला होता. स्टेजवरचा टेबल नक्षीदार कपड्याने सजवला होता. स्टेजच्या पुढे मंडपभर शुभ्र कापड लावलेल्या खुर्च्या सरळ रांगेत ठेवल्या होत्या. कार्यकर्त्यांची नियोजनासाठी धावपळ सुरू होती.

स्टेजच्या पाठीमागे थोड्या अंतरावर ब्रिटिशकालीन भक्कम दगडी, पण रंगहीन झालेले रेस्ट हाऊस होते. बाहेर इतकी उष्णता पण रेस्ट हाऊस मात्र आतून थंडगार होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पाहुण्यांना तेथे बसण्याची वेगळी व्यवस्था केली होती. मी त्या दालनाकडे गेलो. पाहुण्यांना थंड पाणी, लिंबूसरबत झाले.

त्यानंतर लगेचच पाहुण्यांना स्टेजवर पाचारण करण्यात आले. सर्व पाहुण्यांसोबत मीही स्टेजवर गेलो. झेंडूच्या फूलांचे हार आणि गुलाब पुष्प, तुरे देऊन पाहुण्यांचे सत्कार झाले. सर्व पाहुणे आसनस्थ झाले… मुख्य कार्यक्रम सुरू झाला. मी व्याख्यानाला उभा राहिलो… पंधरा-वीस मिनिटे झाली असतील, कुणाचातरी अनोळखी कॉल आला. अनोळखी होता म्हणून मी कट केला. पुन्हा तो कॉल आला. मी पुन्हा कट केला. तो कॉल परत परत येऊ लागला. व्याख्यानात अडथळा नको म्हणून मी मोबाइल स्वीच ऑफ करून डायसवर तसाच ठेवून दिला.

बऱ्याच वेळेला असं होतं. एखाद्या अडाणी, निरीक्षर पक्षकाराचा फोन येतो. कट केला तरी पुन्हा येत राहतो. आपणच समजून घ्यावं लागतं.

दोन-अडीच तासांनी कार्यक्रम संपला. नंतर मी मोबाइल स्विच ऑन केला. बऱ्याच जणांचे कॉल येऊन गेले होते. मेसेजेसवरून ते  समजत होते. कार्यक्रम चालू असताना दोन-तीन वेळा येऊन गेलेला एक कॉल पाहून मी कॉल बॅक केला. पलीकडून महिलेचा आवाज आला. मी म्हणालो, “कोण बोलतय?” त्या म्हणाल्या, “सुनीता खाडे.”

“कोठून?”

“लातूरहून… मी आपणास भेटावयास आले आहे!”

“आता आपण कोठे आहात?”

“तुमच्या ऑफिस समोर… परंतु ऑफिस बंद आहे…” महिला म्हणाली.

“अरेरे, मी आता कोल्हापुरात आहे. यायला खूप उशीर होईल…” मी कल्पना दिली.

“ठीक आहे. मी उद्या येते…”

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसमध्ये येऊन बसलो अन् त्या महिला आल्या. काळपट चेहरा… कसल्यातरी तणावाने सुकून गेलेला! जुनेरी मळकी, फाटकी साडी… कपाळावर मोठं, गोल लालभडक कुंकू… हातात हिरव्या-सोनेरी रंगाच्या बांगड्यांचा भला मोठा चुडा… उन्हातल्या कामाने कांती काळीसावळी झाली होती… मी म्हटलं, “बसा. काय काम होतं?”

हेही वाचा – दादू… घराचेच वासे फिरले!

त्या अवघडून बसल्या. थोडा वेळ ऑफिस न्याहाळलं… एकदम अनोळखी ठिकाणी आल्यामुळे त्या बावरल्या होत्या… नंतर त्या सावरल्या. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली,

“माझ्या नवऱ्याला एका सावकाराने डांबून ठेवलंय. त्यांना सोडवायचं आहे. गेले एक महिना…”

मी आश्चर्याने मधेच म्हणालो, “का डांबलय?”

त्या म्हणाल्या, “आम्ही ऊसतोडणी कामगार. घरी मी, माझा नवरा आणि तीन मुलं. गेल्या वर्षी ऊसतोडणीचा सीझन संपला. मग लातुरात एका सावकारांच्याकडे सालगडी म्हणून राहिलो. सहा महिन्यांसाठी काम घेतलं. पगार खूपच कमी होता. त्याल मीठ पण भागत नव्हतं. कशीबशी पोरांची आतडी खरकटी होत होती. पण ऊसतोडणी सुरू होईपर्यंत करणार तरी काय? घरात खातीपिती तीन पोरं. तोकड्या पगारावर राबत होतो. ऊसतोडणी सुरू झाली की, सावकाराचं काम सोडणार असं ठरलं होतं… यावर्षी ऊसतोडणी सुरू झाली. आम्ही सावकाराचं काम सोडलं. पण अंगावर उचल असल्यामुळे सावकार आम्हाला सोडायला तयार नव्हता. म्हणून सावकारानं माझ्या पतीला डांबून ठेवलंय…” त्या थोडा वेळ थांबल्या.

आवंढा गिळला आणि पुन्हा सांगू लागल्या… “मी सावकाराला म्हटलं, ‘आम्ही गरीब आहोत, पण चोर नव्हं. आम्ही खऱ्यानं वागणारी माणसं आहोत. आम्ही नक्की तुमचं पैसे फेडू. आमच्यावर विश्वास ठेवा. ईश्वास नसेल तर, आमची जनावरं येथेच सोडून जातो. चार-पाच जनावरं आहेत. दोन दुभत्या म्हशी, एक गाय, दोन वासरं. त्यांची किंमत लाखभर रुपये आहेत. तुमचे पैसे देऊन मगच जनावरं घेऊन जातो… पण अकरा हजारांसाठी अडवू नका. वर्षभर पुरेल इतकं ऊसतोडणीतून आम्हाला पैसे मिळतात. पदरात दोन-तीन लेकरं हायती. कृपा करून आम्हाला सोडा.”

“खूप इनवण्या केल्या. हातापाया पडले. पण सावकार ऐकत नाही. बळजबरीने त्यांनी माझ्या नवर्‍याला ठेवून घेतलंय. “पळून गेलास तर जिथे जाशील तिथे येऊन तुकडे करीन,” अशी धमकी दिलीय. सावकाराच्या भीतीने मी आणि पोरांनी आठ दिवस झाले जेवणाला हात लावला नाही. पोटाला फडकं बांधून आम्ही उपाशी झोपतोय. तिकडं नवऱ्याला डांबलंय, तोंडात अन्न तरी कसं जाईल? माझ्या नवऱ्याला सोडवायचं आहे. त्यासाठी मी आलेय. आम्ही गरीब लोकं. जवळ पैसा नाही. वकील द्यायचे तर पैसे कुठून आणू? तुमचं नाव ऐकलं होतं. थेट तासगावला आले…”

मी त्यांना ‘The Bonded Labour System (aboilation) Act 1976’ प्रमाणे अर्ज तयार करून दिला. एक प्रत लातूर पोलीस स्टेशनसाठी दिली. दुसरी प्रत लातूर डीवायएसपीकरिता दिली. तिसरी प्रत लातूर जिल्हा पोलीस प्रमुखांसाठी दिली.

मी त्यांना सांगितलं,  “हा अर्ज घेऊन जा. लातूरच्या पोलीस स्टेशनला द्या. घेत नसतील तर ही पाकिटं घ्या. त्याला तिकीटं सुद्धा लावली आहेत. पोस्टात टाका. इथून गेल्यानंतर काय होतंय बघून फोन करा…”

तिकीट लावलेल्या अर्जाच्या प्रति आणि खाकी लिफाफे घेऊन त्या उठल्या अन् थोड्या घुटमळल्या. वर पांढऱ्या छताकडे बघत राहिल्या. त्यांना काहीतरी अजून सांगायचं होतं. पण त्या संकोचल्या होत्या… मग मीच म्हणालो, “आणखी काही अडचण आहे का?” ओशाळल्या चेहऱ्याने त्या म्हणाल्या, “पुढच्या महिन्यात ऊसतोड सुरू होईल. त्यावेळी याची असेल ती फी देते.”

हेही वाचा – दादू… लेकीच्या उदारपणाने गाव गहिवरला

मी म्हटलं, “फीबद्दल मी काय विचारलं का? तुम्ही एवढ्या लांबून आलात. पहिलं पतीला सोडवा. काम झाले की, फोन करा. फीचं नंतर बघू…”

नमस्कार करून त्या संकोचल्या भावनेने निघून गेल्या.

आठवडा गेला… दोन आठवडे गेले. त्या महिलेचा नंतर काही फोन आला नाही. कामाच्या व्यापात मीही केला नाही. काम झाल्यावर काही पक्षकार फोनही करीत नाहीत. त्यापैकीच हेही… असे समजून मी तो विषय तिथेच सोडून दिला.

दोन महिने असेच गेले. एके दिवशी ती महिला पुन्हा ऑफिसला आली. जुनंच पण स्वच्छ धुतलेलं हिरवं लुगडं. कपाळावर गोल मोठं ठसठशीत कुंकू… पण यावेळी चेहऱ्यावर मात्र समाधान होतं. बरोबर कोणीतरी होतं. त्यांच्यापेक्षा थोडा बुटका… रंगाने काळासावळा… पण पिळदार शरीरयष्टी असणारा! कोपरापर्यंत दुमडलेला, चुरगळलेला शर्ट… मळकी विजार… डोक्यावर फाटकी, जुनी इटकी टोपी… तेलकट चेहरा… खोबणीत गेलेले खोल डोळे… एका हातात वायरची बंध तुटलेली पिशवी. पिशवीत टावेलात बांधलेली भाकरी. आणखी काहीतरी असावं. नजर बावरलेली…

त्या महिलेला मी म्हटलं, “झालं का काम?”

त्या म्हणाल्या, “हो. हेच माझे पती.” त्यांच्या राकट पण नम्र पतीकडे त्यांनी बोट दाखवलं. ते दोघे आल्यापासून उभेच होते. त्यांना ‘बसा’ म्ह्टलं. दोघेही समोरच्या बाकावर बसले. मी विचारलं,  “काय काय झालं तुम्ही गेल्यावर? बरेच दिवस तुम्ही फोनही केला नाही.”

त्या म्हणाल्या, “माझा फोनच कुठंतरी पडला. अजून नवीन घेतला नाही… त्यामुळं तुम्हाला फोनच करता आला नाही.” त्या पुढं सांगू लागल्या –

मी येथून लातुरात गेले. थेट पोलीस स्टेशन गाठलं. तिथं, तुम्ही तयार करून दिलेला अर्ज द्यायला लागले. अर्ज पाहून तिथला पोलीस म्हटला, “मुख्य साहेब येऊ द्या. तोपर्यंत बाहेर बसा.” मी दिवसभर पोलीस ठाण्याबाहेर लिंबाच्या झाडाखाली बसले. मुख्य साहेब बुलेटवरुन चार वाजता आले. मला आत बोलवलं. तुम्ही दिलेल्या अर्जावर नजर फिरवली. म्हणाले, “तुम्ही काय असेल ते तोंडी सांगा. आमचा स्टाफ लिहून घेईल. असा लेखी अर्ज घेता येणार नाही.” त्यांनी समोरच्या खोलीकडे बोट करून तिकडं जायला सांगितलं.

तिथं एक जाडजूड, मोठ्या मिशा असणारे पोलीस बसले होते. कोपऱ्यात कसल्या तरी कागदांचा ढीग पडला होता. दोन मोडक्या लाकडी खुर्च्या होत्या. दोन-तीन पुरुष आणि दोन बाया उभ्या होत्या. त्यांचीही काहीतरी तक्रार होती. ते पोलीस प्रत्येकावर खेकसत होते. कर्कश आवाजात ओरडत होते.

माझा नंबर आल्यावर मी पोलिसाला माहिती सांगायला लागले. तो म्हणाला, “अंगावर उचल असेल तर ते सावकार तुम्हाला कसे सोडतील? तुम्ही त्यांचे पैसे उचलणार आणि त्यांच्यावरच केस करणार हा कुठला कायदा? अगोदर त्यांचे त्यांना पैसे द्या… जावा.” त्यांनी मलाच झापायला सुरुवात केली. अगोदरच ते दिसायला दांडगट होते. त्यात त्यांचा भेसूर चिरका आवाज… मी घाबरूनच गेले.

त्यांनी लिहून घेतलं नाही. हाकलून काढल्यासारखं मी बाहेर आले. मग मी घरी गेले. रातभर काय झोप लागली नाही. या कुशीवरून त्या कुशीवर तळमळतच रात काढली. दुसऱ्या दिवशी एसपीकडे गेले. तिथं अर्ज देण्यासाठी एक खिडकी होती. खिडकीच्या आत बसलेली व्यक्ती अर्ज स्वीकारत होती. बरेच जण तिथं अर्ज देण्यासाठी आले होते. मी रांगेत उभी राहिले. तिथं अर्ज दिला. त्यांनी एका ‘प्रति’वर जांभळा गोल शिक्का मारून मला पोच दिली.

नंतर मी घरी आले. नवऱ्याविना घर भकास झालं होतं. खायला उठलं होतं. पोरं माझ्याकडं केविलवाणं बघायची. मी पोरांच्याकडे कसनुसं होऊन बघायची. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. नवरा तिकडं सावकाराच्या तावडीत आणि आम्ही इकडं घरी बेवारसपणे हताश होऊन बसलो होतो. हातावर हात बांधून बसण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.

आठ दिवसांनी लाल दिव्याची पोलीस गाडी भोंगा वाजवतच आली. हातात काठी असलेले चार-पाच पोलीस गाडीतून उतरले. सावकाराच्या बंगल्यात पळतच घुसले. घरी सावकार लुंगी आणि बंडीवरच बसले होते. त्यांना तसंच पोलीस गाडीत घातलं. सावकाराला आणि त्याच्या मुलाला अटक झाली. माझ्या नवऱ्याला खोलीतून बाहेर काढलं. आमच्या स्वाधीन केलं.

त्यातल्याच एका पोलिसाने आम्हालाही पोलीस स्टेशनला बोलवलं. मी, माझा नवरा आणि थोरला पोरगा पोलीस स्टेशनला गेलो. सावकारांनी हात जोडून माफी मागितली. बिनशर्त माझ्या नवऱ्याला सोडलं. पोलिसांनी त्यांना विचारलं, “तुमचे यांच्याकडून किती रुपये येणे आहेत?” तर, सावकार म्हणाले, “माझे काहीही येणे नाही. मला यांच्याकडून एक रुपया नको. पण मला तुरुंगात टाकू नका…”

आम्ही तिथून सुखरूप बाहेर पडलो. ऊसतोडणी सुरू झाली होती. मुकादमाकडे जाऊन एका ऊसतोडीच्या टोळीत सामील झालो. हातात धारधार कोयता घेऊन रोज उसाच्या फडात जाऊ लागलो. मी, माझा पोरगा, माझा नवरा सगळेच ऊस तोडत होतो. तीन-तीन पाळ्यांमध्ये काम करीत होतो. सकाळी उभा दिसणारा पाच एकराचा हिरवागार उसाचा फड संध्याकाळपर्यंत सप्पय आडवा होत होता. दोन आठवड्यांनी पगार झाला. मी नव्या कोऱ्या अकरा हजारांच्या नोटा घेऊन सावकाराच्या घरी गेले. पण ते घरी नव्हते. त्यांची जाडजूड मालकीण बाहेर आली. मालकिणीच्या हातावर पैसे ठेवले. त्या ‘चहा घ्या’ म्हणत होत्या, मी पाणीसुद्धा न घेता परत फिरले…

मी त्यांना बोलताना मधेच तोडत म्हटलं, “बरं झालं. तुमचं काम झालं. पण मला सांगा, नवऱ्यासाठी तुम्ही इतक्या लांब माझ्याकडे कसे आलात?”

“थोरल्यानं अकरावीतून शाळा सोडलीय. पोरगं मोबाइलवर तुमचं लिहिलेलं कायम वाचतं. त्यानं, तुमचं ‘वाटणी’ हे पुस्तक पण विकत घेतलंय. त्यानेच तुमच्याकडे जायला सांगितलं…” असं सांगत महिलेने पतीजवळच्या वायरच्या जुन्या पिशवीतून पुस्तक काढून दाखवलं.

पुढे त्या सांगू लागल्या, “मग मी एसटीने थेट तासगावला आले. स्टॅण्डवर उतरले. घर माहीत नव्हतं. रिक्षावाल्याकडे गेले. त्याला विचारलं, “लातूरहून आले आहे. इथे अमुक अमुक वकील आहेत. त्यांना भेटायचे आहे. तुम्हाला माहीत आहेत का?”  ते म्हणाले, “हो, ते वकील मला माहीत आहेत. पण इथं नंबरप्रमाणे रिक्षा सोडतात. तुम्ही पुढे जाऊन पहिल्या नंबरची रिक्षा धरा…”  मी पुढे गेले. त्या रिक्षावाल्याला तुमचं नाव सांगितलं. त्याच्या रिक्षाने ऑफिसला आले, तर ऑफिस बंद. मग पुस्तकावरचा तुमचा फोन नंबर शोधून काढला आणि तुम्हाला फोन केला…”

“मग त्या दिवशी कोठे थांबला? जेवण तरी मिळालं का?”

“तुम्हाला कोल्हापूरहून यायला उशीर लागेल म्हटल्यावर मी एसटी स्टॅण्डवरच थांबले. येताना पिशवीतून भाकरी आणली होती. ती खाऊन स्टॅण्डवरच झोपले.”

मी गप्प बसलो. मनाला चटकाच बसला… खूप वाईट वाटले. पण वाईट वाटूनही आता उपयोग नव्हता.

थोड्यावेळाने चहा आला. त्यांनी चहा घेतला. नंतर त्यांनी जुन्या वायरच्या पिशवीतून कसली तरी मळकट प्लास्टिकची पिशवी काढली. काही चुरगळलेल्या नोटा ठेवलेली ती पिशवी होती. मी ओळखलं, त्या फी देणार होत्या. मी त्यांना थांबा अशी खूण केली. हात जोडून नम्रपणे पैसे घेण्यास नकार दिला. पण त्या ऐकत नव्हत्या. ‘थोडीतरी फी घ्या,’ असा त्यांचा आग्रह होता…

‘गरज सरो वैद्य मरो’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे… वकिलीच्या व्यवसायामध्ये तर असे खूप अनुभव येतात. मी तर नेहमी म्हणतो, ‘संकट आले की, वकील देव वाटतो. संकट संपलं की, फी मागताना वकील राक्षस वाटतो.’ पण सर्वच माणसे तशी नसतात. सुनीता खाडे यांचं काम झालं… विषय संपला. इतक्या लांबून पुन्हा येण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. परंतु तरी त्या आल्या… वकीलांची फी देण्यासाठी आल्या! त्यांच्या प्रामाणिकपणाला कोणत्या शब्दात दाद द्यावी? मी तर नि:शब्द झालो.

मी फी घेतली नाही. थोड्या नाराजीनेच ते जोडपे उठले. कसातरी त्यांनी नमस्कार केला. आभार मानून ते गरीब पण प्रामाणिक जोडपे जड पावलांनी निघून गेले. त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाने मी गलबलून गेलो…!

परिस्थितीमुळे शाळा सुटलेला एक ऊसतोड्याचा मुलगा ‘वाटणी’ पुस्तक वाचतो… आईला त्याबद्दल सांगतो… ती बिचारी माऊली माझ्यासारख्या अनोळखी वकिलावर विश्वास ठेवून इतक्या अंतरावरून येते… बस् आणखी काय हवं असतं माझ्यासारख्याला? त्या परमुलखातल्या अनोळखी जोडप्याने जो माझ्यावर विश्वास दाखवला, यापेक्षा मोठा कोणता पुरस्कार असू शकतो?  मला आत्तापर्यंतच्या पुरस्कारात सर्वात मोठा पुरस्कार मिळाला होता…!


(‘मोलाची ठेव’मधून)

मोबाइल – 9372241368

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!