Sunday, September 21, 2025

banner 468x60

HomeललितWITHOUT U...

WITHOUT U…

सतीश बर्वे

ईमेलवर त्याने फायनल केलेलं त्याच्या नवीन व्यवसायाचे सचित्र ब्रोशर मला पाठवलं होतं वाचायला… त्यासोबत एक ओळ लिहिली होती त्याने ‘Without U  it was Impossible.’ ती ओळ वाचून मला हसायला आलं, कारण त्या दिवसापर्यंत आमच्यातील मैत्री तशीच होती, म्हणजे फक्त नावापुरती. त्यात संवाद नव्हता… विचार नव्हते… स्वतःहून भेटणं नव्हतं… बोलणं नव्हतं… मजा, मस्ती, भंकस असं काहीच नव्हतं… काही कारणाने झालेली ओळख मैत्रीचा मुखवटा धारण करून पुढे चालली होती इतकंच! बाकी काही नाही.

त्याच्यात आणि माझ्यात खरंतर काहीच मिळतं-जुळतं नाही. ना स्वभाव, ना आवडीनिवडी, ना मतं! तरी सुद्धा आम्ही मित्र आहोत. ‘आपलंच म्हणणं खरं’ असणाऱ्या स्वभावाच्या माणसांपैकी हा एक अवलिया… मी चुकूनमाकून काही सुचवलं तरी, त्याचं स्वागत त्याच्याकडून ‘बकवास’ आणि ‘नॉनसेंन्स’ अशाच शब्दात किंवा ‘ओव्हर ॲक्टिंग का पचास रुपया काट दे’ अशा वाक्प्रचारात व्हायचं. खरंतर त्याला पटायचं ते, पण कबूल करण्याचे धारिष्ट्य होत नसे! आजूबाजूचे ऐकणारे सुद्धी माझ्या सूचनांचे स्वागत करायचे. पण हा माणूस त्या सूचनांवर फुली मारून मोकळा व्हायचा… माझ्याकडे खाऊ की गिळू, अशी नजर टाकत!!

पण सगळेच दिवस सारखे नसतात. फाजील आत्मविश्वासचा फुगा देखील क्षणांत फुटू शकतो. त्याच्याही बाबतीत तेच झालं. माझ्या ध्यानीमनी नसताना एक दिवस त्याने मला फोन करून भेटायची इच्छा व्यक्त केली. काहीशा आश्चर्याने मी ठरल्याजागी पोहोचलो. तो माझ्या आधीच तिथे हजर होता. म्हणजे, मामला काहीतरी गंभीर असल्याचे मी जाणले. त्याने मग वेळ न घालवता थेट मुद्द्यालाच हात घातला.

तो कोकणात एक नवीन रिसॉर्ट सुरू करणार होता. त्याच्या ब्रोशरसाठी मी मजकूर लिहून द्यावा, अशी त्याची इच्छा होती. रिसॉर्टचं बांधकाम सुरू होतं. नंतर मग एक दिवस तिथे आम्ही दोघेही जाऊन, मी तिथल्या जागेची पाहणी केली. तिथे पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती करून घेतली. बांधकामाचा नकाशा बघितला. आवश्यक ती माहिती मी वहीत लिहून घेतली. त्याला अभिप्रेत असणारे पाहुणे, त्यांचा वयोगट, त्यांची अपेक्षित पसंती, तरुणाईच्या जिभेवर रेंगाळणारे शब्द आणि डायलॉग या गोष्टींचा खोलवर विचार करून मी ब्रोशरचा कच्चा आराखडा तयार करून त्याला पाठवला. ते पाहून तो ताडकन उडायचाच बाकी होता!

थोडीशी चर्चा करून मजकूर फायनल झाल्यावर आम्ही दोघांनीही डिझायनर सोबत सलगपणे भेटीगाठी घेऊन रंगसंगती, मजकूराची जागा, अक्षरांचा आकार आणि त्याचे स्वरुप या सगळ्याच्या आधारे तीन ब्रोशर तयार केली. त्यातून एक अंतिम तो निवडणार होता. शिवाय, सोशल मीडियावर टाकायचा मजकूर देखील त्याने माझ्याकडून तयार करून घेतला. प्रचंड मेहनत घेऊन केलेल्या आमच्या कामावर मी खूप खूश होतो.

हेही वाचा – बाप्पा… जगण्यासाठी पुरेसा!

…आणि अखेर आजवर मालगाडीप्रमाणे चालणाऱ्या आमच्या मैत्रीची आज बुलेट ट्रेन झाली होती… त्याने लिहिलेल्या ‘Without U it was Impossible’ या शब्दांनी! ईमेलच्या उत्तरात मी त्याला व्हॉट्स ॲपवर लिहून पाठवलं की,

“जेवढा तू माझा विनाकारण दु:स्वास आणि रागराग करायचास, तितकी अधिक घट्ट बनत चालली होती आपली मैत्री माझ्या मनांत… मला खात्री होती की, एक ना एक दिवस काही निमित्ताने माझे विचार तुला आवडतील. आज अखेर ते घडलं. एक लक्षांत ठेव, देवाच्या मनात ज्या ज्या व्यक्तींना तुझ्या आयुष्यात काही करण्याची जबाबदारी दिलेली असते, त्या व्यक्ती ती जबाबदारी पार पाडण्यासाठी कसून प्रयत्न करत असतात. फक्त त्या व्यक्ती कोण? हे मात्र ज्याचं त्यालाच ओळखावं लागतं. तुझ्यालेखी इतके दिवस मला विशेष किंमत नव्हती. पण जेव्हा ब्रोशरचा विषय निघाला तेव्हा तुझ्याच एका खास मित्राने माझ्या नावाची शिफारस तुझ्याकडे केली, तेव्हा मात्र नाईलाजाने का होईना, पण तुझ्या मनाची दारं माझ्यासाठी उघडली गेली. गेले काही महिने तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता माझ्यासाठी! माझ्या कल्पकतेचा आणि नाविन्यपूर्ण विचारांचा उपयोग तुला झाला म्हणून मी खूप आनंदी आणि समाधानी आहे…”

हेही वाचा – कलियुगातील सावित्री

प्रत्येकाच्या आयुष्यात देवाने ‘Without U’ चं लेबल लावलेली माणसं अगोदरच आणून ठेवलेली असतात. पण ‘Who They Are’ म्हणजेच त्यांना ओळखण्याची आवश्यक तेवढी दृष्टी आणि क्षमता मात्र ज्याच्या त्याच्यात असावी लागते. तुम्ही ती माणसं जेवढी लवकर ओळखता तेवढं लवकर तुम्ही आयुष्यात सुखसमृद्धी मिळवता. अशा पुष्कळ माणसांपैकी दोन माणसं सगळ्यांकडेच असतात आणि ती म्हणजे प्रत्येकाचे आई-वडील.ज्यांना कधीच अंतर द्यायचं नसतं!

शेवटी मी एवढंच म्हणेन की, जसं तुझ्यासाठी आणि तुझ्या व्यवसायासाठी तू मला ‘Without U’ असं हक्काने म्हणालास, तसंच मी देखील म्हणेन की माझं यापुढचं आयुष्य देखील कायमच राहील ‘With U’…!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!