डॉ. अस्मिता हवालदार
‘परतवारी’ पुस्तकाबद्दल मी खूप जणांकडून ऐकलं होतं. जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं तेव्हा भारावून गेले होते. पुस्तक वाचायचा सुद्धा योग यावा लागतो. सुधीर महाबळ यांच्या मुलाखती, भाषणं पण ऐकल्यावर पहिला प्रश्न मनात उमटला, ‘यांना कसं जमलं असेल? आणि मला कधी जमेल का?’
घर दार सोडून जाऊ विठ्ठलाच्या दारी
दरवर्षी म्हणतो करू पुढच्या वर्षी वारी
ही वैभव जोशींची कविता इतकी पटली! म्हणजे माझ्यासारखे बरेच आहेत. वारीला जायची खूप इच्छा आहे, पण ते घडत नाही. तुकोबांनी लिहून ठेवले आहे,
आवा चालली पंढरपुरा
वेशीपासून आली घरा…
मीही त्यातलीच एक आवा! वारी आणि मराठी माणूस यांचं नातं शब्दपलीकडचं आहे. कुलदैवताच्या दर्शनाला जाण्यात आणि वारीत फरक आहे. लेखक म्हणतो, ‘विठुराया स्वतः संन्यस्त. त्याच्याकडे काही मागायच नसतं. फक्त दर्शनाला जायचं असतं.’ हा नवस करण्याचा देव नाही, पण अतिशय लाडका, प्रेमाचा आहे. ‘विठ्ठलाकडे काय मागितलं’, असं विचारल्यावर एक माऊली म्हणाली, ‘तुकोबांना प्रत्यक्ष विठ्ठलाने “काय देऊ?” विचारलं होतं, त्यावर ते म्हणाले, “तुझ्याकडे आहेच काय मला द्यायला? कमरेवर हात घेऊन उभा आहेस.” तरी, विठ्ठलाने आग्रह केल्यावर तुकोबा म्हणाले, “हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.”’
लेखक कामाच्या व्यग्रतेमुळे वारीसाठी वेळ देऊ शकत नसल्याने परतवारीसाठी लागणारी फक्त दहा दिवसांची सुट्टी घेऊ शकत होते. त्यामुळे त्यांनी परतवारी करायची ठरवली. दुसरं कारण म्हणजे, वारी झाल्यावर वारकरी परत कसे जात असतील, याबद्दल त्यांना कुतूहल वाटत होते. यालाच ‘परतवारी’ म्हणतात. परतवारीत फार तर काही शे लोकांची गर्दी असते… वारीच्या लाखोंच्या तुलनेत काहीच नाही! परतवारीत तेवढी व्यवस्था नसते जेवढी वारीत असते. त्यामुळे परतवारीला ‘वैराग्यवारी’ म्हणतात. पहिली ‘ऐश्वर्यवारी’! मात्र, लेखकाला ‘परतवारी’ अनुभवांच्या, अनुभूतीच्या दृष्टीने ‘ऐश्वर्यवारी’च वाटते.
2005 सालापासून सतत परतवारी करताना त्यांना अनेक माऊली भेटल्या. वारीला प्रत्येक जण माऊली असतो. त्यांना बरे-वाईट सर्व प्रकारचे अनुभव आले. त्यांनी एका मुलाखतीत विलक्षण अनुभव सांगितला… गावाच्या बाहेर विठ्ठलाची मोठी तस्वीर लागलेली होती. त्यासमोर उभे राहून खेडूत बायका विठ्ठलाशी बोलत होत्या. एक म्हणाली, “यावर्षी मुलगी बाळंतपणाला आली आहे म्हणून तुला भेटायला येऊ शकले नाही. पण पुढच्या वर्षी नक्की येते.” या भक्तीला भाबडेपणा म्हणावे की, हा गुण आपल्यात नाही म्हणून दुःख करावे? मला समजलं नाही.
हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’
एका माळीणबाईने त्यांना खायला घातलं आणि पाय पुसणे मागितल्यावर स्वतःची साडी दिली म्हणाली, “विठ्ठलाचे दर्शन करून आलेले पाय माझ्या साडीने पुसले तर पुण्य मिळेल.” लेखक म्हणतो, ‘कपड्यांबद्दलच्या माझ्या कल्पनांना तडा गेला.’
‘सखा’ नावाचा शून्यातून श्रीमंत झालेला वारकरी दरवर्षी अन्नदान करतो, वारकऱ्यांना जेवणावळ घालतो. स्वतः व्यवस्था पहायला उभा असतो. तो कोणाकडून हे काम करून घेऊ शकला असता, पण स्वतः जातीने उभे राहून करतो. लेखकाला एक वारकरी म्हणाला, ‘हे तुम्हीच करता आणि नाव सखाचे घेता!’ लेखकाने हे सांगितल्यावर शांतपणे सखा म्हणाला, “माऊली, तुम्ही आणि मी एकच आहोत की!!” ‘जीवो ब्रह्म’ हेच आहे…
एक अंध वारकरी इतके तन्मयतेने अभंग गात होता की, सुरेल मैफलीची आठवण व्हावी… त्याने भावपूर्ण अभंग गाऊन सर्वांना भक्तीतून मिळणाऱ्या आनंदाचा परिचय करून दिला होता. तर, आपल्या मुलीच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी सुद्धा नियम मोडू नये म्हणून अन्नदान करणारी माऊली जीवनाचे तत्वज्ञान शिकवते. ‘जाणारी गेली पण वारकऱ्यांची सोय करायला हवी,’ असं ती म्हणते.
वारी किंवा परतवारी म्हटल्यावर पडणारे प्रश्न म्हणजे इतकं चालायला जमेल का? कुठेही खाऊन-पिऊन तब्येत बिघडेल का? उघड्यावर विधी उरकता येतील का? कुठेही झोप लागेल का? लेखकाने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. वारीत गेल्यावर हे प्रश्न गौण होतात आणि ते जाणवतही नाहीत. पायाने अधू असलेली माऊली सुद्धा वारी करते. स्वतःची सोय पाहताना काही वेळा आपण दुसऱ्याची गैरसोय करत असतो. माऊलीच राहणार, माऊलीच जाणार, माऊलीच रक्षण करणार म्हणणारा वारकरी… ‘मामेकं शरणं व्रज’ भगवंतांना हेच सांगायचं असेल.
परतवारी करताना गर्दी कमी असते, त्यामुळे स्वतःशी संवाद साधायला खूप वेळ मिळतो. लेखकाने 35 मैलांचा प्रवास अनेकदा केला आहे. प्रत्येक वेळी वेगळे अनुभव घेतले, पण त्यांची श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. माऊलींच्या पावलांवर किडा-मुंगी दिसली नाही, पण कोणाला दिसली तर, असू शकते, असे लेखक म्हणतो. लेखकाला जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, माणसांवरचा कमी झालेला विश्वास. ‘निर्मळ मनाची भाबडी माणसे माझ्या डेटामध्ये नाहीत; त्यामुळे पटकन कोणावर विश्वास ठेवता आला नाही,’ असे त्यांनी लिहिले आहे.
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
कायमवारी म्हणजे सतत वारी करत राहणे. पंढरपूरला पोहोचल्यावर परतवारी सुरू. मग पुन्हा वारी… असे आयुष्यभर करणारे लोक आहेत. गेली तीस-पस्तीस वर्षे घरदार सोडून कायमवारी करणारे एक वारकरी लेखकाला भेटले. काही कामधंदा न करता सतत अशी वारी करणे योग्य आहे का? असाही प्रश्न त्यांना पडतो.
वारी करणे जमेल का? या प्रश्नाचे मूळ शोधले तर ते आपणच स्वतःवर चढवून घेतलेल्या आणि इतरांनी आपल्यावर चढवलेल्या झुलींमध्ये आहे, हे सहज कळेल. आरामाची जीवनशैली असल्यामुळे कुठल्याही कष्टांची भीती वाटते. लेखकाने जेव्हा यातून मुक्ती मिळवली तेव्हा त्यांना खरे समाधान मिळाले, आनंद मिळाला! सकाळी उठल्यावर ‘जनाबाईचा गोड अभंग कानी पडणे, भोळ्या-भाबड्या स्वच्छ मनाच्या माणसांचा सहवास मिळणे, कुठलीही चिंता न करता सगळे विठ्ठलावर सोडून देणे, दोन वेळच्या भाकरीची सुद्धा चिंता नसणे, डोक्यावर आभाळ आणि पायाखाली जमीन हेच सुख असणे, माऊलींच्या पादुकांवर डोके ठेवल्यावर डोळ्यांत आलेले समाधानाचे अश्रू… जीवन जीवन म्हणतात ते हेच!’ लेखक म्हणतो, वारीत त्या आभाळाखाली माऊली पाहत आहोत. सामान्यांसाठी हेच विश्वदर्शन आहे…
पुस्तक वाचल्यावर वारीला जायलाच हवे असे वाटू लागते. कुठेतरी लेखकाचा हेवा वाटू लागतो. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे त्याप्रमाणे, ‘मला माहीत नाही, हेच मला माहीत नाही!’
काहीतरी अनमोल आपली वाट पाहत आहे, हातून निसटण्यापूर्वी गळाभेट घ्यायला हवी, हेही जाणवते. मी पुन्हा मनाशी निश्चय करते, पुढच्या वर्षी वारी नक्की!