डॉ. सारिका जोगळेकर
(होमिओपॅथिक तज्ज्ञ)
‘मन निरोगी तर तन निरोगी!’ शरीर आणि मनाचे अतूट नाते आज विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. मन आणि शरीर हा संवाद मुख्यतः मेंदूतील न्यूरॉन्स, हार्मोन्स आणि स्नायूसंस्था यांच्या माध्यमातून घडतो. मन शांत, सकारात्मक आणि आनंदी असते, तेव्हा शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते, हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि ऊर्जा पातळी सुधारते. पण जेव्हा मन तणावग्रस्त, अस्वस्थ किंवा नकारात्मक भावनांनी भरलेले असते, तेव्हा शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. त्यानंतर कालांतराने डायबिटीस, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल अशा आजारांचा प्रवास सुरू होतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव वाढत चालले आहेत. त्यामुळे मानसिक आजाराचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. शरीरात एखादी वेदना झाली की, आपण डॉक्टरकडे धाव घेतो, पण मन आजारी पडले की, त्याकडे हमखास दुर्लक्ष केले जाते. अनेकांना असा गैरसमज आहे की, ‘मानसिक आजार म्हणजे वेडेपणा’. पण हा समज अत्यंत चुकीचा आहे; या उलट मानसिक आजार म्हणजे संवेदनशील असणं आणि त्यात लाज वाटावी, असं काहीही नाही. तिथे संवेदनशीलता असते तिथेच खरी माणुसकी जन्म घेते. जो माणूस स्वतःच्या भावनांना समजतो, तोच माणूस इतरांच्या भावनांचा आदर सुद्धा करतो.
सतत असलेला ताणतणाव, कौटुंबिक किंवा आर्थिक अडचणी, स्पर्धेचा दबाव तसेच त्यामुळे येणारी अपयशाची भीती, किंवा कुठल्यातरी घटनेमुळे मनावर झालेला आघात… यापैकी कुठल्याही कारणांमुळे मनाचे संतुलन बिघडू शकते. तणाव हाताळण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. ही क्षमता जेव्हा टोक गाठते, तेव्हा मानसिक आजाराची सुरुवात होते. मानसिक आजाराची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात; पण स्वतःमध्ये निर्माण झालेल्या नकारात्मक भावनांची जाणीव होऊन त्या स्वीकारणं, हेच मुळात माणसाला कठीण जातं आणि त्यामुळे अनेकदा वेळ टळून जाते.
हेही वाचा – Homeopathy : शुद्ध आणि सुसंवादी आरोग्याचा मार्ग
मानसिक आजाराची सुरुवात कशी ओळखावी?
छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे, भूक कमी होणे किंवा जास्त खाणे, झोप नीट न लागणे किंवा खूप झोप येणे, कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे, सतत भीती आणि चिंता, असुरक्षितता वाटणे, आत्मविश्वास कमी असणे, लोकांपासून दूर राहायची इच्छा या लक्षणांनी मानसिक आजाराची सुरुवात होते आणि नेमकं याच भावनांकडे आपण दुर्लक्ष करतो. मग हळूहळू या भावनांची आपल्याला सवय होते. मग त्या वाढू लागतात आणि जेव्हा या लक्षणांमुळे आपल्या कामावर किंवा दैनंदिन आयुष्यावरती परिणाम होतो, तेव्हा आपण त्याला मानसिक आजार असं म्हणायला सुरुवात करतो पण वास्तविक त्याची सुरुवात खूप आधीच झालेली असते. वेळीच त्याची जाणीव होऊन ते ओळखले गेले तर, काही जीवनशैलीतले बदल सुद्धा माणसाला पुन्हा पूर्ववत करू शकतात. बदल घडण्यासाठी आधी त्याची जाणीव होणं आणि ते स्वीकारणं, हे महत्त्वाचं असतं.
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण व्यायाम, आहार याकडे लक्ष देतो, पण मनाचे काय? शरीराच्या आधी मन बोलते आणि त्याकडे दुर्लक्ष केले की, मग शरीर बोलायला लागते. जर आपण मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले आणि मनाच्या तक्रारी वेळीच हाताळल्या तर, शारीरिक आजार आपण सहज दूर ठेवू शकतो.
मनाचे आरोग्य जपण्यासाठी काय करावे? याचे उत्तर अगदी सोपे आहे ते म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये थोडासा बदल.
- नियमित व्यायाम – चालणे, योग, प्राणायाम.
- ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम
- संतुलित आहार – पौष्टिक अन्नामुळे मनःस्थिती सुधारते.
- पुरेशी झोप – मन शांत राहते.
- छंद जोपासणे – काहीतरी केल्याचं समाधान सहजपणे मिळून जातं.
- मनातल्या भावना, मुख्यतः नकारात्मक भावना बोलून हलक्या होऊ शकतात. जी व्यक्ती विश्वासनीय आणि जवळची वाटेल तिच्याशी संवाद साधावा. डायरीमध्ये लिहिणं, हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे.
हेही वाचा – प्राणशक्ती, आरोग्य आणि होमिओपॅथी : एक वैज्ञानिक दृष्टिकोन
शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नुसते औषधोपचार पुरेसे नसतात. शरीर आणि मनाचा संबंध हा फक्त म्हणीपुरता नाही तर, प्रत्यक्ष अनुभवता येणारं सत्य आहे. निरोगी मनामुळे निरोगी शरीर तयार होते आणि निरोगी शरीरामुळे मन शांत, स्थिर आणि आनंदी राहते. शरीर आणि मनाचे संतुलन हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
HOLISTIC HOMOEOCURE CLINIC
ऋतू पार्क, ठाणे वेस्ट
मोबाइल – 9890533941
FB – https://www.facebook.com/share/1YnodU891Z/?mibextid=wwXIfr
Insta – https://www.instagram.com/holistichomoeocure?utm_source=qr