वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे.
अध्याय पहिला
जे अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ।।49।। आतां भारतीं कमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेसी ॥50॥ ना तरी शब्दब्रह्माब्धि । माथिलेया व्यासबुद्धि । निवडिलें निरवधि | नवनीत हें ॥51॥ मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेकें । पद आलें परिपाकें । आमोदासी ।।52|| जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनु- भविजे संतीं । सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥53॥ जें आकर्णिजे भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं । ते भीष्मपर्वी संगती । सांगिजैल ॥54॥ जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनी प्रशंसिजे । जें सनकादिकीं सेविजे । आदरेसीं ॥55॥ जैसे शारदियेचे चंद्रकळे – । माजीं अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ।।56।। तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपण चित्ता । आणूनियां ॥57II हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासी ।।58|| जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥59॥ कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंदु प्रगटतां । हा अनुरागु भोगितां। कुमुदिनी जाणे ॥60॥ ऐसोनि गंभीरपणें । स्थिरावलेनि अंतःकरणें । आथिला तोचि जाणे । मानूं इये ॥61॥
हेही वाचा – Dnyaneshwari : ॐ नमो जी आद्या…
अर्थ
ऐका, हे महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असे मांगल्याचे ठिकाण आहे. 49. आता जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवादरूपाने उपदेशिला, तो गीता नावाचा प्रसंग (विषय) भारतामध्ये कमलातील परागाप्रमाणे आहे. 50. अथवा, व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे भारतरूपी अमर्याद लोणी काढले. 51. मग ते (भारतरूप) लोणी ज्ञानरूप अग्नीच्या संसर्गाने विवेकाचा कढ देऊन कढविल्यावर त्याचा परिपाक होऊन त्याला सुगंध प्राप्त झाला. (त्याचे गीतारूप साजूक तूप बनले). 52. वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवितात आणि सोऽहंभावनेने पार पावलेले जेथे रममाण होतात; 53. भक्तांनी जिचे (गीतेचे) श्रवण करावे, जी तिन्ही लोकांत प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे, ती गीता भीष्मपर्वात प्रसंगानुरोधाने सांगितली आहे. 54. जिला भगवद्गीता असे म्हणतात, ब्रह्मदेव आणि शंकर जिची प्रशंसा करतात आणि जिचे सनकादिक आदराने सेवन करतात; 55. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोरांची पिले मृदु मनाने वेचतात; 56. त्याप्रमाणे चित्त अगदी हळुवार करून (वासनांचे जाड्य काढून) मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. 57. हिची चर्चा शब्दांवाचून करावी (मनातल्या मनात हिचा विचार करावा), इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा आणि हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या शिद्धान्तांचे आकलन करावे. 58. कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते; या ग्रंथाचे सेवन करण्याची रीत तशी आहे; 59. किंवा चंद्र दिसू लागताच चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्ल होऊन, आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते; हे प्रेमसौख्य कसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊक! 60. त्याचप्रमाणे गंभीर आणि शांत अंतःकरणाने जो संपन्न आहे, तोच या गीतेचे रहस्य जाणतो. 61.
हेही वाचा – Dnyaneshwari : द्वैताद्वैत तेचि निकुंभ