चंद्रशेखर माधव
भिडे काका म्हणजे माझ्या वहिनीचे वडील. आमच्या दोघांच्या वयामध्ये अंदाजे 30 ते 33 वर्षांचा तरी फरक असावा. कसं कोणास ठाऊक, पण सुरुवातीपासूनच माझी अन् त्यांची मैत्री जमली. मैत्रीच म्हणायला हवं. कारण तसं बघायला गेलं तर सांगण्यासारखं असं नातं आमच्यामध्ये नव्हतं. कधीही काही कार्यक्रमानिमित्त किंवा इतर वेळप्रसंगी भेटले की, भरपूर गप्पा मारत असत. त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप होतं आणि माझ्याकडे घेण्यासारखं! माणूस खूप बुद्धिमान आणि उच्चशिक्षित होता. यापलीकडे म्हणजे, आयुष्यात कमावलेला अनुभव. त्यामुळे एकूणच ते जेव्हा बोलायचे तेव्हा ऐकायला एकदम मजा यायची. खूप शिकायला मिळायचं.
सुमारे दोन-तीन वर्षांनंतर अचानक एक दिवस माझ्या वडिलांचा अपघात झाला. त्यात मेंदूला इजा झाल्यामुळे सुमारे साडेपाच महिने माझे वडील रुग्णालयात होते. यादरम्यान सुरुवातीचे काही दिवस नातेवाईक आजूबाजूला होते. पण हळूहळू जसं एकूणच उपचार लांबत गेले, तसतसे एक एक नातेवाईक नाईलाजाने आपापल्या मार्गाला लागला. जसा वेळ मिळेल, तसं ते वडिलांसाठी येत असत, पण मर्यादा पडत होत्या. यादरम्यान अनिल काका आणि माझा चुलत भाऊ केदार हे दोघे मात्र खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते.
यानंतरची तिसरी व्यक्ती, जी कायम माझ्या पाठीशी उभी राहिली, ते म्हणजे भिडे काका. यादरम्यानच मला “आपल्या जवळचा कोण आणि परका कोण,” याची नीट पारख झाली. पुढे मी या अनुभवातून मी खूप काही शिकलो.
हेही वाचा – Harishchandra gad Trek : सरांबद्दलचा आदर आणखी वाढला
हा मनुष्य अक्षरशः रोज संध्याकाळच्या वेळी हॉस्पिटलमध्ये न चुकता सलग साडेपाच महिने अव्याहातपणे येत होता. रोजच्या रोज हॉस्पिटलचा काय खर्च झाला आहे, याचे स्टेटमेंट घेणे, आदल्या दिवशीच्या स्टेटमेंटशी ते नीट तपासून पाहणे, त्याच्यात काही शंका आली तर जाऊन विचारणे… या सर्व गोष्टी त्या दगदगीच्या आणि मानसिक वेदनेच्या काळात त्यांनी मला शिकविल्या. ते स्वतः बरेचदा या गोष्टींमध्ये बारकाईने लक्ष घालत आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधून त्याचा निवाडा करून घेत असत.
आता ते सगळं आठवलं आणि विचार केला की असं वाटतं, “अरे, आपण हे सगळं आजच्या काळात कोणासाठी करू शकू का?” याचं प्रामाणिक उत्तर अर्थातच शक्य नाही असं आहे. भिडे काकांची ही प्रतिमा कायमची माझ्या मनात राहिली आहे.
हेही वाचा – वहिनीची माया