Saturday, August 2, 2025

banner 468x60

HomeललितUS tourists : शंका सरल्या, वाढली भारताबद्दलची ओढ!

US tourists : शंका सरल्या, वाढली भारताबद्दलची ओढ!

चित्रा आचार्य

भारतात पाऊल ठेवण्याआधी जवळपास दोन महिने डेबी ईमेलवर चॅटिंग करत होती. गप्पा कसल्या खरंतर शंका आणि विशेषकरून भारताविषयी कुशंकाच जास्त होत्या त्यात. मी जमेल तितकी तिच्या शंकांना उत्तरं देत होते. कुठला पोषाख करू… काय खाऊ, काय नको… एक ना अनेक!

तशी आमची तीन दिवसांची सोबत राहणार होती. मजल दरमजल करत डेबी शेवटी एकदाची पोहोचली भारतात. महाकाय अमेरिकेच्या एका टोकापासून इथवर यायला तीस तास लागलेच तिला… भारतात फिरायला आलेल्या पर्यटकांना जेट लॅगचे कौतुक करत बसणे शक्य होत नाही, तितका वेळही नसतो. त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही दक्षिण मुंबईतील विविध इमारती त्यांच्या स्थापत्यशास्त्राचा आस्वाद घेत पालथ्या घातल्या…

आमची सहल मस्त सुरू होती, परंतु काहीतरी अपूर्णता जाणवत होती… काय चुकते आहे आपलं? काही लक्षात येत नव्हतं. माझ्याकडून सर्वतोपरी पर्यटनाचा आनंद द्यायचाच प्रयत्न होता माझा… डेबी जरा हरवल्यासारखी तर तिची लेक जोएल मात्र एकदम तिच्याविरुद्ध… मुंबई बघून हरखून गेली होती.

रविवार होता आणि हॉर्निमन सर्कल इथे अजिबात रहदारी नसल्याने जोएल नुकताच अमेरिकन भारतीयांच्या लग्नात शिकलेला नाच ती आणि मी मनसोक्त नाचलो… फोटो काढून घेतले… जोएलची अखंड बडबड सुरू होतीच. तेवढ्यात रस्त्यावरच्या एका टपरीवर खूप गर्दी दिसली, म्हणून कुतूहलानं काय आहे, हे बघण्यासाठी ती पुढे सरकली. एक चहावाला कप आणि बशीतून चहा देताना तिने बघितला. झालं… आता तो चहा घ्यायचाच म्हणून लहान मुलांसारखी मागे लागली माझ्या… तिचा ‘इंडियन चाय’ पिऊन झाल्यावर एकदाचं तिचं समाधान झालं.

हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं

अधूनमधून मात्र डेबीच्या शंका… थोडा संशय डोके वर काढत होताच. तिच्या मनात कसली तरी अनामिक भीती होती. पण एकंदरीत टूर सुरळीत पार पडून शेवटाकडे आली. शेवटाकडे येईपर्यंत डेबी मात्र खुलायला लागली होती, अनेक भारतीय शब्द मी तिला शिकवले होते. अगदी मराठी गाणं देखील ती गुणगुणत होती!

रात्रीचे जेवण घेऊन भल्या पहाटे उत्तर भारताच्या दिशेने निघणार होत्या त्या दोघी… माझं काम मला त्यांना त्यांच्या ठरलेल्या हाॅटेलमध्ये सोडल्यावर संपणार होते. मलाही घरी निघायची घाई झाली होती..

सगळ्या सूचना तथा काय सावधगिरी बाळगायची, हे सांगून मी त्यांना हाॅटेलमध्ये सोडून त्यांचा निरोप घेतला. जड अंतःकरणाने पाठ वळवली आणि दरवाजातून बाहेर पडले असेनच, पण अगदी पाठोपाठ तिथला मॅनेजर माझ्या मागे आला आणि म्हणाला, “मॅडम त्या पाहुण्या जोरजोरात रडत आहेत.”

मी खरंच खूप काळजीत पडले आणि पुन्हा आत आले त्यासरशी डेबी माझ्या गळ्यात पडून बिलगली… थोडा वेळ तसाच गेला… नंतर तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, “जे काही असेल ते, पण आता उरलेली संपूर्ण टूर तू आमच्यासोबत हवी आहेस आम्हाला. तुझ्याशिवाय पुढील प्रवास निव्वळ अशक्य आहे. आम्ही तुझ्याशिवाय पुढे जाणार नाही.”

हेही वाचा – About Website : ‘अवांतर’ नावामागची कथा…

माझं मन त्या अनपेक्षित प्रेमाने भरून आले. ज्या बाईला भारतात येण्याआधीपासून ते अगदी टूर सुरू असताना इतक्या शंका होत्या… ती आता इथल्या माझ्या मायेत गुंतली होती.

मला तिच्यासोबत जाणं कसं शक्य नाही, हे तासभर समजावल्यानंतर आणि मी तिला दिवसाला तीन ते चार वेळा फोन करून तिची खुशाली घेत राहीन, या वचनावर आम्ही अखेर एकमेकींचा निरोप घेतला.

एक आयुष्यभराचा मैत्र आणि सहृदय मला मिळाली. आजही कधी तिचा मेसेज आला की, भारताविषयी तिची बदलेली चांगली मतं, तिचं प्रेम मला खूप खूप आनंद देऊन जातात…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!