केतकी दातार
“’आई’ अशी हाक जेव्हा तान्हुल्याच्या तोंडून एखादी स्त्री ऐकते तेव्हा तिला अगदी जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. जेव्हा स्त्री बाळाला जन्म देते तेव्हा तिचा पुनर्जन्म होतो, असं म्हणतात. या बाळामुळेच ती आई बनते. तिचं जीवन परिपूर्ण बनतं. अशा या आईची थोरवी सांगावी तेवढी थोडीच आहे,” असं म्हणून मीनाताईंनी आपलं भाषण संपवलं. पार्ल्यातील टिळक मंदिराचे सभागृह माणसांनी खचाखच भरलं होतं. ‘आई’ हा विषयच इतका संवेदनाशील, हळवा… आणि त्यात मीनाताईंची रसाळ वाणी! यामुळे श्रोतृवर्ग खूपच मंत्रमुग्ध झाला होता. आभार प्रदर्शनाच्या औपचारीक कार्यक्रमानंतर बरीचशी लोक निघून गेली. मीनाताई स्टेजवरून उतरल्यावर अनेकांनी त्यांना गराडा घातला. काहीजण त्यांची स्वाक्षरी घेत होते, तर काहीजण अभिनंदन करत होते, तर काही भाषणातील खास मुद्दे, खास वाक्य आवडल्याचं त्यांना सांगत होते. या सर्वामुळे त्या खूपच सुखावत होत्या. तेवढ्यात एक पन्नाशीची शेलाट्या बांध्याची, नाकेली बाई आली आणि तिनं नम्र स्वरात विचारलं, “मला तुम्हाला काही विचारायचं आहे, विचारू का?”
मीनाताई म्हणाल्या, “हो. विचारा ना.”
“आजचं तुमचं भाषण खूपच छान झालं. ‘आई’ ही संकल्पना खूपच विस्तृत आहे. हा तुमचा मुद्दा मला पटला. पण स्वतःच्या पोटी एखाद्या बाळाला जन्म दिल्यावरच स्त्री ‘आई’ बनते, हा संकुचित विचार मला अजिबात पटत नाही,” असं म्हणून ती पटकन निघून गेली. तिचं बोलणं ऐकून मीनाताई एकदम स्तब्ध झाल्या. यावर काय बोलावं हेच त्यांना कळेना. एवढ्यात कोणीतरी स्त्री बोलली, “अहो, मीनाताई हिला काय कळणार आहे, ‘आई’ होणं म्हणजे काय असतं ते. तिला काही मूलबाळ वगैरे नाही. गरीब बिचारी!”
यावर त्या काहीच बोलल्या नाहीत. कोणीतरी त्यांना हाक मारली आणि त्या तेथून निघून गेल्या.
*****
पुन्हा काही दिवसांनी एक पुस्तक प्रदर्शन बघायला मीनाताई गेल्या होत्या. तेव्हा भाषणाच्या वेळी त्यांना निरुत्तर करणारी स्त्री एक पुस्तक चाळताना दिसली. तिचं नाव विचारून ओळख करून घ्यावी, या विचारानं त्या तिच्याजवळ गेल्या. त्यांनी विचारलं, “भाषणाच्या वेळी मी तुमचं नाव विचारायचं विसरूनच गेले.” तेव्हा ती स्त्री म्हणाली, “खरंतर भावनेच्या भरात मी तुम्हाला काहीतरी विचित्र प्रश्न विचारला म्हणून तुमची माफी मागते.”
हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं
“अहो, यात माफी कसली मागताय? भाषण ऐकणारा वक्त्याच्या प्रत्येक मुद्द्याशी सहमत असतोच, असं नाही. बरं, तुमचं नाव सांगताय ना?”
“हो, बघा, परत बोलताना राहूनच गेलं. माझं नाव यशोदा…”
“अहो, आडनाव नाही सांगितलंत?”
“मी नवीन ओळख झालेल्यांना फक्त नावच सांगते. कारण आपण कुणाचं आडनाव ऐकलं की, आपल्याही नकळतपणे आपण त्याच्या जातीचा विचार करतो आणि त्यानुसार आपली त्या व्यक्तीविषयीची मतं बनतात. असं आपलं मला वाटतं हो!”
“काय वेगळीच मतं आहेत या बाईंची!” असा विचार मीनाताईंच्या मनात आला. काही तरी विचारायचं म्हणून त्यांनी विचारलं, “कोणतं पुस्तक बघताय?”
“बालमानसशास्त्राचं. छानच आहे हो! आता हेच पुस्तक यांना माझ्यासाठी घ्यायला सांगते.”
तेवढ्यात “यशोदाsss” अशी कोणीतरी हाक मारली. “येते हं!” असा सुहास्य वदनाने निरोप घेऊन ती निघून गेली. थक्क होऊन तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघण्याची मीनाताईंची ही दुसरी वेळ होती. त्या स्वतःशीच विचार करू लागल्या… “अशी काय ही बाई चमत्कारीक आहे! तिला मूल नाही, असं कोणाकडून तरी ऐकलं. मग हे बालमानसशास्त्राचे पुस्तक हिला काय करायचंय? का लहान मूल नाही म्हणून अशा पुस्तकांचं जास्त attraction वाटतंय हिला! जाऊ दे, असतात अशाही वल्ली. पण एखाद्या कथेसाठी छान पात्र आहे ना!” असा विचार करतच त्या प्रदर्शनाच्या हॉलमधून बाहेर पडल्या.
*****
“मीनाताई, अहो मीनाताई…” या हाकेमुळं मीनाताईंनी मागं वळून पाहिलं तर, यशोदा त्यांना हाक मारत होती.
“आज इकडं कुठे?” यशोदा.
“अहो, एका कार्यक्रमाला आले होते; पण काही कारणानं तो रद्द झाला.”
“म्हणजे आज तुम्हाला वेळ आहे तर!”
“वेळ म्हणजे…”
त्यांनी काही बोलायच्या आतच यशोदा म्हणाली – “हे बघा, या समोरच्याच बिल्डिंगमध्ये मी रहाते. आज तुम्हाला वेळ आहे, तर थोड्या वेळासाठी चला ना. तुमचं लिखाण, भाषणं मला खूप आवडतात. तुम्ही माझ्या घरी आलात तर, मला खूप-खूप बरं वाटेल…”
यशोदेचा एवढा प्रेमळ आग्रह मीनाताईंना मोडवेना, त्या तिच्याबरोबर तिच्या घरी गेल्या. यशोदेचं घर खूपच नीटनेटकं होतं. हॉल छानच सजवला होता. त्यांना हॉलमध्ये बसवून पाणी आणायला ती आत गेली. छान जाळीदार अनारसे आणि पाणी तिने टीपॉयवर ठेवलं. त्या अनारशांकडे बघून त्यांना उगाचच वाटलं,
“खरंच ही इतरांपेक्षा वेगळी ना? इतर घरातून चिवडा, चकल्या असे पदार्थ ठेवतात, अनारशांसारखा वेगळाच पदार्थ घेऊन आलीय.”
“अहो, घ्या ना एखादा अनारसा…”
तिच्या बोलण्याने त्या भानावर आल्या. “अंs, घेते ना… छान झालेत हो अनारसे, तुम्ही केलेत?”
“हो…”
“…आणि हा हॉलही छान सजवला आहे.”
“थँक्स हं.”
“तुमचे यजमान कुठं सर्व्हिस करतात?”
“ते L&T मध्ये मॅनेजर आहेत.”
हेही वाचा – About Website : ‘अवांतर’ नावामागची कथा…
“आणि तुम्ही?”
“अहो, मी नाही सर्व्हिस करत. सुरुवातीला एका कॉलेजमध्ये मानसशास्त्र शिकवायचे. पण या मुलांच्या आजारपणामुळे जमतच नाही.”
यशोदेच्या कोड्यात टाकणाऱ्या बोलण्यानं मीनाताईंना काहीच कळेनासं झालं. मग त्यांनी विचारलं – “किती मुलं आहेत तुम्हाला?”
“दोन”
“काय करतात दोघं?”
या प्रश्नावर उत्तरादाखल ती म्हणाली – “आत या ना. माझ्या मुलांची ओळख करून देते”
मीनाताई जरा बावरूनच आत गेल्या. बघितलं तर अतिशय स्वच्छ आणि नीटनेटक्या असणाऱ्या खोलीत, एका कॉटवर एक वृद्ध गृहस्थ झोपले होते. यशोदा त्यांच्याजवळ गेली आणि त्यांच्या पायाशी बसली. पायांवरून हात फिरवून म्हणाली, “लौकिक अर्थानं हे माझे सासरे आहेत. आता वृद्धावस्थेमुळे स्वतःची स्मृती हरवून बसलेयत. श्वास घेता येतोय, हृदय चाललंय म्हणून जिवंत आहेत, असं म्हणायचं. आम्ही त्यांचे कोण? ते स्वत: कोण? त्यांना काहीही कळत नाही आणि आठवतही नाही. लहान मुलासारखं त्यांचं सगळं करावं लागतं. मी हे त्यांचं सर्व काही करते म्हणून ते माझे लहान मूलं आहेत आणि मी त्यांची ‘आई’ आहे.”
मीनाताई थक्क होऊन पाहातच राहिल्या. यशोदा म्हणाली, “या, आपण हॉलमध्येच बोलत बसू.”
मीनाताई म्हणाल्या, “तुम्हाला स्वतःला मूलबाळ…”
त्यांचा प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच ती उत्तरली, “सुरुवातीला मलापण खूप वाटायचं, आपल्याला बाळ व्हावं. पण दैवाला ते मंजूर नव्हतं. त्या काळात मी खूपच विचित्र बनले होते. आपण कितीही शिकलो तरी काही मतांचा, विचारांचा आपल्या मनावर खूप मोठा पगडा बसलेला असतो. मला दिवस जायचे, पण माझ्या पोटात गर्भच टिकायचा नाही. एखादं तरी मूल व्हावं, असं वाटायचं. मूल झाले नाही तर मी वेडी होईन की काय, अशी भीती वाटायची. आपल्या नशिबात जेवढे उपभोग असतात ते आपल्याला मिळतात. ते आपण आनंदाने स्वीकारतो. अशा प्रसंगी त्या सर्वेश्वराला, देवाला विसरतो. ‘भोग’ भोगायची जेव्हा वेळ येते तेव्हा ‘तो’ आठवतो. मला मिळालेले भोग भोगताना देवाला आठवूनही हे भोग कमी नाही, पण सुसह्य मात्र झाले. माझ्या या वेड्यापिशा अवस्थेतून मला माझ्या नवऱ्यानं आणि सासू-सासऱ्यांनी सावरलं, आवरलं. हळवेपणाचा शेवट वेडातच होतो. या शेवटापर्यंत जाता-जाता मी परतले, ती माझ्या सासू-सासऱ्यांमुळे.”
एक क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. ती पुन्हा बोलू लागली, “मी बालमानसशास्त्राचं पुस्तक घेत होते, तेव्हा तुम्ही चकीत झाला होतात ना?”
“हो ना. ते कुणासाठी घेतलंत?”
“ते माझ्या सासूबाईंसाठी. त्या पण आता खूप थकल्यात. माझे मिस्टर त्यांना बागेत घेऊन गेलेयत. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच असतं ना? त्या तशा चालल्या-फिरत्या आहेत; पण वयोमानानुसार थकल्यात. काहीही खाता, पिताना खूप हट्टीपणा करतात. स्वतःच्या नवऱ्याचं काही करता येत नाही, सगळं मलाच करावं लागतं म्हणून काही वेळा लहान मुलासारखं रडतातही.’
“म्हणूनच म्हणते, स्वतःच्या पोटी जन्म नाही दिला तरी, हे वृद्ध सासू-सासरे माझी मुलंच नाहीत का? आता मी त्यांची ‘सून’ म्हणून नव्हे तर, ‘आई’ ‘म्हणून हे सारं करतेय. त्यामुळे त्यांचं करण्यातही एक प्रकारचा आनंद आहे. स्त्रीला अपत्यप्राप्तीनंतर मिळालेलं नाव म्हणजे ‘आई’. अशी आई या नावाची संकुचित व्याख्या होऊच शकत नाही. तर, ‘आई’ म्हणजे माया, अमाप माया, सागराएवढी माया, ममत्व म्हणूनच ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीत आईचा, तिच्या बाळावरील प्रेमाचा, मायेचा वारंवार उल्लेख केलाय. कोणतीही व्यक्ती जेव्हा दुसऱ्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता प्रेमानं, आपलेपणानं त्याची सेवा-शुश्रूषा करते, तेव्हा ती त्या व्यक्तीची ‘आई’ असते. मग सेवा करणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष!”
दाराची बेल वाजल्यानं यशोदा भानावर आली आणि म्हणाली, “सॉरी हं! भावनेच्या भरात मी काहीतरी बोलत राहिले.”
“पण या भावनेच्या भरातच अगदी खरं आणि योग्य तेच बोलतात.”
यशोदेच्या हातात हात घालून, प्रेमळ निरोप घेऊन मीनाताई तिच्या घराबाहेर पडल्या. यशोदेचा विचार करताना त्यांना “हिचं ‘यशोदा’ हे नाव किती योग्य आहे ना? यशोदेनं जसं स्वत:च्या मुलाप्रमाणे कृष्णाचं सर्व काही केलं, अगदी तसंच ही आजच्या काळातील यशोदा स्वतःच्या वृद्ध सासू-सासऱ्यांचं सर्व काही करतेय, त्यांना जपतेय, खरंच सध्याच्या काळात अशी ‘आई’, ही यशोदा हरवत चाललीय.”
हेही वाचा – Indra Nooyi Book : सॅनिटरी पॅड, एक प्रवास….
खूप छान कथानक आहे….मनाला भावून गेली कथेतील यशोदा ……आणि आजच्या काळात अशी सासू साऱ्यांची सेवा करणारी आई ही नवीन कल्पना पण आवडली धन्यवाद केतकी ताई
आईपणाचा हा प्रवास इतक्या हळुवार आणि संवेदनशील शब्दांत मांडलेला वाचून मन थरारून गेलं. लेखामधील प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करते, आणि आईच्या ममतेचं, तिच्या त्यागाचं आणि निस्वार्थ प्रेमाचं उत्कट चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.
आई म्हणजे केवळ जन्म देणारी व्यक्ती नसून ती प्रत्येक क्षणात आपलं अस्तित्व विसरून आपल्या लेकरासाठी जगणारी देवता आहे, हे या कथेत फार सुंदर पद्धतीने उमटलं आहे.
आईचं कधी न थांबणारं संघर्षमय जीवन, तिचं हास्याच्या मागे लपलेलं दुःख, आणि तरीही लेकरासाठी अखंड उर्जा देणारा तिचा आत्मा… हे सर्व इतक्या सहजतेने लेखात गुंफलेलं आहे की वाचताना डोळ्यात पाणी येतं.
केतकी मॅडम मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो, की तुम्ही एवढं हृदयस्पर्शी आणि भावनिक लिखाण आमच्यासमोर मांडलं. अशाच कथा आम्हाला आयुष्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतात.
शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद! 🙏💐
यशोदा छान, एक हृदय स्पर्श कहाणी