डॉ. किशोर महाबळ
विधि महाविद्यालयाचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. काही दिवसांतच एका प्राध्यापकाच्या (Professor) लक्षात आले की, पहिल्या वर्षाचा एक नियमित असणारा विद्यार्थी कोणत्याही चर्चेत सहभागी व्हायला नाखूष असतो किंवा प्रश्नांची उत्तरे देणेही टाळतो. एके दिवशी तो खूप घाबरलेला आणि सतत कशाची तरी भीती वाटत असल्यासारखा दिसत होता. खरंतर, तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच ही गोष्ट लक्षात आली होती, मात्र त्यामागचं कारण कोणीही त्याला विचारलं नाही. त्या प्राध्यापकाच्याही ते लक्षात आलं आणि त्याला त्यांनी कारण विचारलं. आधी काहीच बोलायला तयार नसलेला तो विद्यार्थी खूप समजावल्यानंतर म्हणाला, “सर, मला वाटतं की, मी वार्षिक परीक्षेत नापास होणार आहे.”
त्याचं हे उत्तर ऐकून वर्गातले सगळे विद्यार्थी हसायला लागले. प्राध्यापकांनी त्यांना हसण्याचं कारण विचारल्यावर त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “सर, ही तर सत्राची (सेमिस्टरची) सुरुवात आहे, सात महिन्यांनंतर जी परीक्षा घेण्यात येणार आहे, त्याची आतापासूनच काळजी करणं, ही भीतीच निराधार आहे आणि म्हणून आम्ही हसतोय.”
आपलं लेक्चर संपल्यानंतर त्या प्राध्यापकांनी अबोल विद्यार्थ्याला सगळी लेक्चर्स संपल्यानंतर आपल्याला येऊ भेट, असं सांगितलं आणि त्याला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनदेखील दिलं. त्याप्रमाणे तो विद्यार्थी सरांना भेटायला गेला. सरांशी बोलताना विद्यार्थी म्हणाला, “सर, मी हिंदी माध्यमाच्या शाळेतून इथे आलो आहे. महाविद्यालयात काय शिकवलं जातं, हे मला समजत नाही आणि म्हणून मला सतत भीती वाटते की, मी वार्षिक परीक्षेत नापास होणार आहे.” हे ऐकल्यावर प्राध्यापकांनी त्याला इंग्रजी शिकण्यासाठी आणि वाटत असलेल्या भीतीवर मात करण्यासाठी काही गोष्टी सुचवल्या.
असेच काही दिवस गेल्यानंतर, प्राध्यापकांनी वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांना वाटणाऱ्या भीतीबद्दल विचारायला सुरूवात केली. एकापाठोपाठ एक सर्वच विद्यार्थ्यांनी त्यांना कशाची भीती वाटते, हे सांगितलं. बेरोजगारी, गरीबी, मागासलेपण, अज्ञान, कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय एकटं राहावं लागण्याची शक्यता, समाजातील वाढत चाललेली हिंसा, असमानता, अन्याय, समाजातील शोषण, लैंगिक असमानता अशा काही गोष्टींची विद्यार्थ्यांना सर्वात जास्त भीती वाटत असल्याचं प्राध्यापकांच्या लक्षात आलं.
हेही वाचा – ‘तू मूर्ख’ आहेस!
प्राध्यापकांनी सगळ्यांचं म्हणणं धीरानं ऐकले. शेवटी, ते मोठ्यांदा हसत म्हणाले, “मला विचाराल तर, तुम्हा सगळ्यांना वाटणारी भीती निराधार आहे, चुकीच्या समजुतींवर आधारित आहे आणि म्हणूनच ती खरी नाही. भविष्यात तुम्हाला ज्या समस्या कदाचित भेडसावणार आहेत, त्यांना तुम्ही आताच का घाबरता?”
विद्यार्थ्यांना प्राध्यापकांची ही टिप्पणी आवडली नाही. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी ते सगळे उठले आणि म्हणाले, “सर, आम्हाला या सगळ्या गोष्टींची भीती वाटण्याचं कारण जाणून न घेताच तुम्ही कसं काय म्हणू शकता की, आमच्या भावना खऱ्या नाहीत आणि त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही म्हणून?”
प्राध्यापक त्यावर म्हणाले, “अरे, मी तुमच्याच पावलावर पाऊल टाकत आहे!” त्यांच्या प्रतिक्रियेसाठी आपण कसे जबाबदार आहेत, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी “याचा अर्थ काय?” असं विचारल्यावर प्राध्यापकांनी उत्तर दिलं, ” मागच्या वेळी तुम्ही केलेली चूक मला तुमच्याच निदर्शनास आणून द्यायची होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा एका विद्यार्थ्याने अंतिम परीक्षेची भीती वाटते आणि त्यासाठी घाबरत असल्याचं सांगितलं, तेव्हा त्यामागचं कारण न शोधता तुम्ही सर्वांनी एकमुखाने सांगितलं की, त्याच्या भावना खऱ्या नाहीत आणि त्याक्षणी परीक्षेला घाबरण्याचं काही कारण नाही. त्याचप्रमाणे आज मी पण सांगू शकतो की, तुमचीही भीतीची भावना खरी नाही. पण मी तसं म्हणणार नाही. मला वाटतं की, तुमची भीती अत्यंत योग्य आहे आणि त्यावर काहीतरी उपाय करणं आवश्यक आहे.”
हेही वाचा – Qualities or Attire : प्राध्यापकांना महत्त्वाचे काय, गुणवत्ता किंवा छानछोकी?
आपलं बोलणं पुढे सुरू ठेवत ते म्हणाले, “एक गोष्ट सगळ्यांनीच कृपा करून लक्षात ठेवा की, जशी तुमच्या भावनांची कदर केली जावी, अशी तुमची इच्छा आहे, त्याचप्रमाणे इतरांच्या भावनांचाही आदर करा, कदर करा. सर्वसाधारणपणे आणि कोणत्याही सामान्य परिस्थितीत वाटणारी भीतीची भावनासुद्धा नेहमीच खरी असते. त्यामुळे कोणालाही वाटणाऱ्या कोणत्याही भीतीच्या भावनेवर तुम्ही हसू नका, तर त्या भीतीमागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्या भीतीवर मात करण्यासाठी त्याला मदत करा. त्यासाठीच कायम लक्षात ठेवा की, तुमची भीती जशी खरी आहे तशीच इतरांना वाटणाऱ्या भीतीची भावनाही खरी आहे. तुम्ही इतरांच्या भावना निराधार आणि कमअस्सल असं म्हणून त्यांच्या भावनांची कमी कदर करण्यास सुरुवात केली तर, तुम्ही एक चांगले वकील कसे बनणार?”
(कै. डॉ. किशोर महाबळ यांच्या ‘Feeling are always genuine…” या कथेचा आराधना जोशी यांनी केलेला स्वैरानुवाद)
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.