“छातीत खूपच दुखतंय… इकडं देवळेकरांकडं आलोय… लवकर ये…”
ओपीडीच्या बाहेरून कुणा तरी इसमाचा फोनवर बोलण्याचा आवाज आला… “निघालीस का? लवकर ये… डॉक्टर कदाचित ॲडमिट करतील…”
पाच मिनिटांनी पुन्हा त्याच इसमाचा आवाज आला!
तेवढ्यात दोन पेशंट येऊन औषधंही घेऊन गेले, तरी इसमाचं आपलं सुरूच… “कुठवर आलीयेस? लवकर ये की!”
“यांना आत बोलवा, पल्स, बीपी, ओटू, बीएसएल चेक करा…” मी सिस्टरना फर्मावलं.
“चला आत, चेकअप करूया,” सिस्टरनं इसमास विनंती केली.
“थांबा, एकच मिनिट… ती पोहोचेलच आता…” इसमानं अजिजीनं विनंती केली.
हेही वाचा – गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…
मागाहून अजून दोन पेशंट येऊन गेले, पण इसमाची गाडी आपली तिथंच… “अगं कुठपर्यंत आलीयेस? खूप दुखतंय छातीतऽऽ किती वेळऽऽ?”
“सिस्टर काय करताय? घ्या की यांना आत लवकर!” मी सिस्टरांवर अंमळ रागावलोच.
सिस्टर पुन्हा बाहेर गेल्या, “त्या येतील तेव्हा येतील, आपण आधी चेकअप करू… पैश्याबिश्याचं आता टेन्शन नका घेऊ…” बिचाऱ्या सिस्टरनी शक्य तितका संयम राखत इसमास जवळपास विनंतीच केली.
“मला काही होत नाहीये, सरप्राइज होतं… वीकेंड आहे… बाहेरही जायचंय… असं लवकर ती निघणार नाही, त्यामुळं फोन करतोय… इथून जात होतो तर डोक्यात ही आयडीया आली म्हणून इथं थांबून कॉल केला…” इसमानं एकदाचा सस्पेन्स उघड केला!
हेही वाचा – ठोकताळा वेळ वाचवतो, पण…
काय असतं, एक थॅाट प्रोसेस असते –
छातीत दुखतंय तर काय शक्यता असतील?
प्लान ए काय असावा?
आधी ईसीजी करावा की थेट रेफर करावं?
बीपी वाढलेलंच असेल, पण कार्डीॲक एलमेंट असेल की सेरेब्रल?
कार्डिॲक असेल तर अरेस्ट की अटॅक?
सेरेब्रल असेल तर? बरं असलं तर ब्लिड असेल की इम्फ्राक्ट?
इथंच काही झालं तर?
…ॲड्रेनालिन अगदी पीकवर पोहोचलेलं असतं, आणि त्यात इसमाचं असं पांचट सरप्राइज!
एक बरं आहे, मी लवकर पॅनिक होत नाही… अन्यथा एवढ्या वेळात तर एखाद्या डॅाक्टरलाच अटॅक यायचा!!!


