अध्याय पंधरावा
परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे । काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ॥214॥ गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावें । होआवें मग तोडावें । खपुष्प कीं ॥215॥ तैसा संसारु हा वीरा । रुख नाहीं साचोकारा । मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी ॥216॥ आम्हीं सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी । ते वांझेचीं घरभरी । लेकुरें जैशीं ॥217॥ कय कीजती चेइलेपणीं । स्वप्नींचीं तिये बोलणीं । तैशी जाण ते काहाणी । दुगळींचि ते ॥218॥ वांचूनि आम्हीं निरूपिलें जैसें । ययाचे अचळ मूळ असे तैसें । आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥219॥ तरी कोणाचेनि संतानें । निपजती तया उन्मूळणें । काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा ॥220॥ म्हणौनि पैं धनंजया । आम्हीं वानिलें रूप तें माया । कासवीचेनि तुपें राया । वोगरिलें जैसें ॥221॥ मृगजळाचीं गा तळीं । तिये दिठी दुरूनि न्याहाळीं । वांचूनि तेणें पाणियें साळी केळी । लाविसी काई ॥222॥ मूळ अज्ञानचि तंव लटिकें । मा तयाचें कार्य हें केतुकें । म्हणोनि संसाररुख सत्य कें । वावोचि गा ॥223॥ आणि अंतु यया नाहीं । ऐसें बोलिजे जें कांहीं । तेंही साचचि पाहीं । परी येकी ॥224॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : माजीं वेदांचा पाला दाट, तो करी सुविद्येचा झडझडाट
अर्थ
परंतु याला उपटून टाकण्याचा हेतु जर असेल तर त्याला उपटून टाकण्याच्या कामी श्रमच ते काय आहेत? (म्हणजे श्रम नाहीतच). मुलाकरता (लेकराची भीती नाहीशी व्हावी म्हणून) बागुलबुवास खरोखर देशोधडीस लावावा लागतो काय? ॥214॥ ढगांच्या आकृतीत दिसणारे किल्ले पाडून टाकले पाहिजेत काय? सशाचे शिंग मोडून टाकले पाहिजे काय? आकाशाचे फूल असावे आणि मग ते तोडावे ॥215॥ त्याप्रमाणे अर्जुना, हा संसारवृक्ष जर खरा नाही, तर मग त्याला उपटून टाकण्याची भीती तरी कसली? ॥216॥ आम्ही संसारवृक्षाच्या मुळाच्या व फांद्यांच्या उत्कर्षाचा (विस्ताराचा) जो प्रकार सांगितला, तो (प्रकार) जसे काही वांझेची घर भरून लेकरे आहेत (असे सांगण्याच्या प्रकारापैकीच होय). ॥217॥ जागे झाल्यावर मग ती स्वप्नातील बडबड काय कामाची? त्याप्रमाणे ही संसारवृक्षाची गोष्ट पोकळ आहे, असे समज. ॥218॥ याशिवाय आम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे याचे मूळ जर दृढ असते आणि हा (संसारवृक्ष) जर आम्ही सांगितलेल्याप्रमाणे (स्वरूपेकरून) खरा असता ॥219॥ तर कोणता असा मायेचा पूत आहे की, ज्याच्या सामर्थ्याने याची पाळेमुळे खणून काढण्याचे काम घडून येईल? अर्जुना, नुसत्या फुंकण्याने हे (एवढे) आकाश उडून जाईल काय ? ॥220॥ म्हणून अर्जुना, आम्ही जे या संसारवृक्षाचे वर्णन केले, ते खोटे आहे. (कसे? तर) जशी राजाला कासवीच्या तुपाने मेजवानी करावी तसे. ॥221॥ बा अर्जुना, मृगजळाची जी तळी आहेत, ती दृष्टीने दुरूनच पहावी, नाहीतर त्या मृगजळाच्या पाण्याने भात व केळी लावता येतील काय? ॥222॥ बा अर्जुना, या संसारवृक्षाचे मूळ जे अज्ञान, तेच आधी खोटे आहे, तर मग त्याचे कार्य ते केवढे! (काय किंमतीचे असणार?) म्हणून संसारवृक्ष खरा कोठून असणार? तर तो मिथ्याच आहे. ॥223॥ आणि या संसारवृक्षाला अंत नाही, असे जे काही म्हणतात, तेही एक प्रकाराने खरेच आहे असे समज. ॥224॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि, मनुष्यत्वचि होय आदि


