लंडनमध्ये दहाव्या मजल्यावरील आलिशान फ्लॅटच्या खिडकीतून दिसणारं विहंगम दृश्य नेहा कौतुकाने पाहत असताना तिचा मोबाईल वाजला. पुण्यातील तिच्या मैत्रिणींचा व्हिडीओ कॉल होता. बऱ्याच दिवसांनी सगळ्यांशी बोलताना ती मनमोकळेपणाने हसली. गप्पा संपल्या आणि फोन ठेवल्यावर काही क्षणांपूर्वी हसऱ्या असलेल्या नेहाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. मैत्रिणींच्या बोलण्यातला वरवरचा गोडवा तिला जाणवत होता; पण त्या गोड बोलण्यामागचे त्यांचे खरे चेहरे ती विसरू शकली नव्हती.
तिला पुण्यातील काही महिन्यांपूर्वीचे प्रसंग आठवू लागले…
राज हा एका छोट्याशा गावातून पुण्यात आलेला अत्यंत हुशार आणि कष्टाळू तरुण. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टांच्या जोरावर एका नामांकित कंपनीत उच्च पद मिळवलं. राज स्वभावाने शांत, संयमी आणि मितभाषी. त्याची पत्नी नेहा त्याच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. हसरा चेहरा, मनमिळाऊ, बोलकी आणि सदैव उत्साही असणारी. मैत्रिणींच्या प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणं, सहलींचं नियोजन करणं, सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणं आणि कोणाला अडचण आली की मदतीला धावून जाणं, हा तिचा स्वभाव होता.
लग्नानंतर सुरुवातीला दोघं एका छोट्याशा भाड्याच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. राजच्या मेहनतीमुळे आणि प्रगतीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. काही वर्षांतच त्यांनी एका नामांकित सोसायटीमध्ये प्रशस्त थ्री बीएचके फ्लॅट खरेदी केला. नंतर घरात सुबक फर्निचर, आकर्षक सजावट अशा गोष्टींची भर पडली.
“नेहा, सगळ्या मैत्रिणींना घरी बोलवत जाऊ नकोस. काही लोक जेलस असतात, इतरांची प्रगती त्यांना बघवत नाही,” राज तिला समजावून सांगायचा.
“राज, तू पण ना! अरे, माझ्या मैत्रिणी खूप श्रीमंत आहेत. त्यांच्यापुढे आपण काहीच नाही,” नेहा हसून उत्तर द्यायची.
हेही वाचा – फिरकी… 1100 रुपयांचं बक्षीस!
नेहाला मैत्रिणींच्या मनातली असूया आणि तिच्या प्रगतीविषयीचे संशय हळूहळू जाणवू लागले होते. तिच्यासमोर त्या घराचं आणि तिच्या प्रगतीचं तोंडभरून कौतुक करायच्या; पण तिच्या पाठीमागे मात्र वेगळंच बोलत असल्याचं तिला जाणवत होतं.
एकदा नेहाच्या घरी मैत्रिणी जमल्या असताना, ती काही कामासाठी दुसऱ्या खोलीत गेली. तेव्हा त्यांच्यापैकी एकीने दुसरीला हळूच विचारलं, “अगं, एवढ्या कमी काळात एवढी प्रगती? काहीतरी वेगळंच गणित असावं!”
दुसरी म्हणाली, “हो ना! राजचा पगार एवढा असेल असं वाटत नाही. बहुतेक गैरमार्गाने पैसे मिळवले असतील.”
तेवढ्यात तिसरी म्हणाली, “अगं, नेहा दिसायला सुंदर आहे आणि तिची अनेक मोठ्या लोकांशी सलगी आहे. काय सांगावं, तिच्या सौंदर्याच्या मोबदल्यात मोठं घबाड मिळत असेल.”
नेहाच्या कानावर मैत्रिणींचं हे बोलणं पडलं आणि ती जागीच थबकली. ज्या मैत्रिणींना ती मनापासून आपलं मानत होती, त्यांच्याच मनात आपल्याविषयी इतके खालच्या पातळीचे विचार असतील, याची तिला कल्पनाही नव्हती. त्या प्रसंगानंतर तिचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला.
पूर्वी तिच्या प्रत्येक गोष्टीत रस घेणाऱ्या मैत्रिणी आता तिच्याशी तुटकपणे वागू लागल्या. काही जणी तर तिच्या आर्थिक प्रगतीबद्दल थेट प्रश्न विचारू लागल्या. एक-दोघींनी मात्र तिची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. पण एकूणच मैत्रिणींच्या वागण्यामुळे नेहाला मनस्ताप झाला. त्यामुळे ती हळूहळू त्यांच्यापासून दूर राहू लागली आणि नकळत एकाकी पडली.
राजला कंपनीकडून दोन वर्षांसाठी लंडनला जाण्याची संधी मिळाली. राजने ही बातमी नेहाला सांगितली. नेहाने आनंदाने म्हटलं, “गुड न्यूज, राज! आपण जाऊ या.” मैत्रिणींच्या वागण्यामुळे आधीच नाराज असलेल्या नेहाने ही संधी आनंदाने स्वीकारली होती. दोन वर्षांसाठी पुण्यातील फ्लॅट भाड्याने देण्याचं काम तिने एका एजंटला दिलं.
नेहाने तिच्या मैत्रिणींना लंडनला जाण्याबद्दल काहीच सांगितलं नाही.
एके दिवशी सकाळी एका मैत्रिणीने फोन करून सांगितलं, “आम्ही चार दिवस गोव्याला जाणार आहोत. पंचवीस हजार रुपये प्रत्येकी खर्च येईल, एक जागा शिल्लक आहे. तू येतेस का?”
नेहाने शांतपणे नकार दिला. नेहमी सहलींच्या नियोजनात पुढाकार घेणारी नेहा चक्क गोव्याच्या सहलीला नकार देते, याचं मैत्रिणींना आश्चर्य वाटलं.
काही दिवसांनी पेपरमधील “फ्लॅट भाड्याने देणे आहे” ही जाहिरात एका मैत्रिणीच्या नजरेस पडली. तो नेहाचाच फ्लॅट होता. लगेच मैत्रिणींमध्ये चर्चा सुरू झाली.
“अगं, नेहाच्या आयुष्यात काहीतरी बिनसलं असावं. एवढा छान फ्लॅट भाड्याने द्यायची वेळ का आली असेल?” एकीने विचारलं.
दुसरी म्हणाली, “पण अचानक काय झालं असेल? राजची नोकरी तर गेली नसेल? तो भ्रष्टाचारात पकडला तर गेला नसेल? म्हणूनच की काय ती गोव्याला आली नाही?”
तिसरी म्हणाली, “अगं, म्हणतात ना, अंथरूण पाहून पाय पसरावे. शो केला, मजा मारली, मग दुसरं काय होणार? बरं झालं, ठेच लागली.”
त्यांनी नेहाला फोन केला, पण फोन लागला नाही.
“पैसे भरले नाहीत म्हणून तर फोन बंद नाही?” एकीने संशय व्यक्त केला.
“काय झालं असेल ते कसं समजणार? आपण एजंटला फोन करून खात्री करून घेऊया.”
दोन-तीन मैत्रिणींनी वेगवेगळ्या वेळी जाहिरातीतील एजंटला फोन केला. पण फोनवरून समाधान न झाल्याने दोघींनी प्रत्यक्ष एजंटच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. नेहाच्या आयुष्यात नेमकं काय घडलं आहे, हे जाणून घेण्याची त्यांना विलक्षण उत्सुकता होती.
“हो मॅडम, नेहा मॅडमचाच फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे,” एजंटने सांगितले.
“पण अचानक फ्लॅट भाड्याने का देत आहेत? काही आर्थिक अडचण आली आहे का? राज सरांची नोकरी गेली का? कर्जाचे हप्ते थकले म्हणून फोन बंद ठेवला आहे का? की दोघं गेले खडी फोडायला?” एका मैत्रिणीने उत्सुकतेने प्रश्नांची सरबत्तीच केली.
एजंटला त्यांच्या प्रश्नांचं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, “हो, ते दोघं गेलेत.”
“किती दिवसांसाठी?”
“दोन वर्षांसाठी.”
“म्हणजे खूप मोठ्ठा घोटाळा केला असणार, बरोबर ना?”
“अहो, तसं काहीही नाही. राज सरांना कंपनीने दोन वर्षांसाठी लंडन ॲाफिसला ट्रान्स्फर केल्याने दोघंही लंडनला गेले आहेत. म्हणून फ्लॅट भाड्याने देत आहेत.”
नेहाच्या आयुष्यात काहीतरी संकट ओढवलं हे ऐकायला मिळेल या अपेक्षेने आलेल्या मैत्रिणींना एजंटचं उत्तर ऐकून क्षणभर काय बोलावं तेच सुचेना. एकमेकींकडे पाहत त्यांनी कसंबसं हसू चेहऱ्यावर आणलं. काही क्षणांपूर्वी उत्सुकतेने प्रश्न विचारणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यांवर आता निराशा स्पष्ट दिसत होती. नेहाच्या दुर्दशेची बातमी ऐकण्याची त्यांची उत्सुकता सपशेल फोल ठरली होती. तिच्या आणखी एका प्रगतीची बातमी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारी होती.
मैत्रिणींच्या चेहऱ्यावरचे बदल पाहून एजंटलाही त्यांच्या चौकशीमागचा हेतू लक्षात आला.
फ्लॅट भाड्याने दिला, हे सांगताना एजंटने नेहाच्या मैत्रिणींनी कुत्सितपणे केलेली चौकशी आणि तुम्ही लंडनला गेल्याचं समजलं तेव्हा त्यांचे पडलेले चेहरे याबद्दल नेहाला सविस्तर सांगितले होते.
…आणि नेहा भानावर आली. त्या आठवणी तिच्या मनात पुन्हा ताज्या झाल्या.
राज तिच्या मनातील अस्वस्थता ओळखून म्हणाला, “काय झालं, नेहा? मैत्रिणींचा विचार करतेस?”
नेहा म्हणाली, “हो, राज! ज्या मैत्रिणींना मी आपलं मानलं, त्याच आपल्या प्रगतीमुळे अस्वस्थ झाल्या आणि आपल्यावर संकट आल्याचं वाटल्याने त्या आनंदी झाल्या. आता मात्र मी दूर गेल्यावर त्यांना माझी आठवण येते.”
राज तिला समजावत म्हणाला, “काही जण आपल्या आनंदात सहभागी असल्याचं दाखवतात, पण मनातून ते आपल्या दुःखाचीच वाट पाहत असतात. लक्षात ठेव, नेहा, खरा मित्र तोच असतो जो आपल्या यशात मनापासून आनंदी होतो आणि संकटात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहतो. बाकीचे फक्त मैत्रीचे मुखवटे घालून वावरत असतात.”
नेहा काही क्षण शांत राहिली. तिने पुन्हा एकदा खिडकीबाहेर नजर टाकली. आपली खरी श्रीमंती ही राजने मेहनतीने मिळवलेलं यश, दोघांचं आनंदी आयुष्य आणि एकमेकांवरील विश्वास यातच आहे, याची तिला जाणीव झाली.
तिने राजचा हात घट्ट धरला आणि हलकेच म्हणाली, “खरंच राज, मुखवटे माणसांचे खरे चेहरेच लपवतात.”
हेही वाचा – नाते… रक्ताचे अन् प्रेमाचे!
राज हसून म्हणाला, “म्हणूनच आयुष्यात मित्र-मैत्रिणी किती आहेत यापेक्षा, आपल्या सुख-दुःखात आपल्या सोबत राहणारे किती आहेत, हे महत्त्वाचं!”
नेहाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. आयुष्यात कोण आपलं आणि कोण परकं, हे त्यांच्या शब्दांवरून नाही, तर त्यांच्या वागण्यावरून ओळखायचं असतं, याची तिला नव्याने जाणीव झाली.
चेहऱ्यावरचे मुखवटे जेव्हा गळून पडतात
माणसांचे खरे चेहरे तेव्हाच दृश्य होतात…
(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा विषय सुचवल्याबद्दल आदरणीय महादेव कुंभार साहेब (मुंबई पोलीस विभाग) यांचे मनःपूर्वक आभार.)


