शहरातील एका उच्चभ्रू वस्तीत असलेल्या एका आलिशान संकुलातील गगनचुंबी इमारतीत ती सकाळपासून राबत होती. नाव तिचं लक्ष्मी, पण नशीब मात्र नेहमीच अंधारात चाचपडणारं! लक्ष्मी आतल्या खोलीची खिडकी पुसत होती, पण तिचं मन मात्र दूर, त्या लहानशा खोलीत घिरट्या घालत होतं… “लक्ष्मी, अगं किती वेळ ती आतली खोलीच साफ करत बसली आहेस? आटोपून घे ती आणि ये इथे… आता फक्त चकल्या करायच्या आहेत. तेवढ्या झाल्या की, जा तू घरी…”
सुधाच्या आवाजाने ती भानावर आली.
लक्ष्मीच्या पोटात कालवून आलं. आज दिवाळीचा पहिला दिवस. तिला आजतरी घरी लवकर जायला मिळेल, असं वाटलं होतं. पण मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी सलत होतं, “घरी जाऊन तरी काय करणार आपण? साधं कौलारू दोनच खोल्यांचं घर. त्यात रमेश रात्रीच्या ड्युटीवर जाणार. आलोकला बाबांशिवाय अजिबात करमत नाही. तो दाखवत नसला तरी, बाबा दिवाळीच्या रात्री त्याच्यासोबत नाहीत म्हणून खूप नाराज झालाय. शिवाय, यंदा आपण दिवाळीत लेकराला एखादा नवीन कपडा तरी कुठे घेऊन देऊ शकलो आहोत? खिशात खडखडाटच होता. दिवाळीनिमित्त चार पैसे जमवले होते, ते मागच्या महिन्यात आलोक तापाने आजारी पडला त्यात खर्च झाले. तरी देवाचे आभार मानले पाहिजेत निदान रमेशना दारूचं व्यसन नाही. नाहीतर रोजच्या मारझोडीत आपला जीव मेटाकुटीला आला असता…”
”अगं ए लक्ष्मी, ऐकलंस की नाही?” सुधाच्या या हाकेने ती पुन्हा वर्तमानात परतली. “हो हो वहिनी, आलेच… झालं आहे इथलं काम…”
ती गडबडीने बाहेर आली. त्यानंतर सुधा आणि लक्ष्मीने मिळून गप्पा- गोष्टी करत खमंग, कुरकुरीत चकल्या केल्या.
हेही वाचा – भाऊबीज
सुधा आणि तिचा नवरा शेखर दोघंही नामांकित कंपनीत उत्तम पदावर कामाला होते. त्यांची लाडकी लेक मायरा इंग्रजी शाळेत शिकत होती. अतिशय सुखी आणि संपन्न असलेल्या या घरात लक्ष्मी गेली आठ वर्षे काम करत होती. मायरा जेव्हा अवघ्या पाच-सहा महिन्यांची होती, तेव्हापासून ते आता ती आठ वर्षांची होईपर्यंत लक्ष्मीनेच या घराचा सांभाळ केला होता. सुधा घरी नसताना सगळं हवं नको बघणं, मायराला सांभाळणं अगदी घरातली असल्यासारखं ती करायची… आणि संध्याकाळी बरेचदा सुधाच्या आधी शेखर यायचा. दोघांपैकी एकजण आलं की, लक्ष्मीची पावलं आपल्या घराकडे परतायची. मायराला तर जणू लक्ष्मीचं वेडच होतं; आईपेक्षाही तिला लक्ष्मीमावशी जास्त जवळची वाटे!
हो… नाही… म्हणता म्हणता संध्याकाळ झाली. चकल्यांचं काम संपवून, दिव्यांच्या माळा लावून लक्ष्मी पिशवी घेऊन जायला निघणार इतक्यात सुधा म्हणाली, “थांब गं लक्ष्मी, एवढ्या गडबडीत कुठे चाललीस? आधी चहा घेऊन जा. दिवसभर नुसती राबते आहेस. ”
”नाही वहिनी, अंधार होतोय… आलोक पण वाट बघत असेल,” लक्ष्मीने पदराने चेहऱ्यावरचा घाम पुसत म्हटलं.
”अगं हो गं बाई, थोडं थांब ना…” लक्ष्मी सुधाला ‘नाही’ कधी म्हणूच शकायची नाही. तिने आज चक्क नाही म्हणता म्हणता सुधाच्या हातचा चहा पटापट घशात ओतलाच जणू! तेवढ्यात दाराची बेल वाजली. शेखरने दार उघडताच लक्ष्मी अवाक् झाली. आईच्या ओढीने तिला भिरभिर शोधणारी नजर आणि त्यामागे थकलेला पण समाधानाने कळी खुललेला चेहरा बघून लक्ष्मी थक्कच झाली! तो दुसरा-तिसरा कोणी नसून तिचा नवरा रमेश आणि छोटा आलोक होता!
”रमेश? तुम्ही इथे? आणि आलोक असा अचानक?” लक्ष्मीच्या डोळ्यांतून आनंदाचे आणि आश्चर्याचे दोन भरजरी थेंब ओघळले. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तिने आलोकला पटकन जवळ घेतलं. पोर अगदी आनंदाने दुडूदुडू धावत येत बिलगलं आईला.
तेवढ्यात पाठीमागून मायराने येऊन आलोकचा हात धरला आणि ती आनंदाने म्हणाली, “मावशी! आम्हीच बोलावले त्यांना! आज आपली दिवाळी इथेच एकत्र साजरी होणार आहे!”
लक्ष्मी सुधाकडे बघतच राहिली. त्यावर गोड हसत सुधा पुढे आली आणि तिने लक्ष्मीच्या खांद्यावर हात ठेवला. तिने एक मोठी पिशवी लक्ष्मीच्या हातात दिली आणि भरल्या आवाजात म्हणाली, “अगं लक्ष्मी, आठ वर्षांपासून तू आमच्या संसाराचा सांभाळ करते आहेस, पण कधी आमच्यासोबत असा सण साजरा केलाय का तू? तू गरोदर असतानासुद्धा अगदी शेवटपर्यंत घरातली कामं करत राहिलीस. बाळ झाल्यावर सुद्धा ‘मायराची गैरसोय होते’ म्हणून मी नको म्हणत असताना, अवघ्या दोन महिन्यांत तान्ह्या बाळाला घरी ठेवून तू कामावर हजर झालीस. तू इथे असताना रमेश पण कुठलीही तक्रार न करता सगळं तुमच्या घरचं सांभाळतात. कोण करतं गं इतकं आजकाल? पण आम्ही आमच्या रोजच्या धावपळीत इतके व्यग्र होतो की, कधी तुझं घर, तुझं मन आम्हाला समजावूनच घेता आलं नाही.
परवा मायराने जेव्हा सहज विचारलं, ‘आई, आपण आलोक आणि मावशीला दिवाळीला इथेच का नाही बोलावून घेत?’ तेव्हा आमचीच चूक आमच्या लक्षात आली! यात आम्ही काहीच वेगळं केलेलं नाही गं, माझी धाकटी बहीण समजून हा छोटासा प्रयत्न केलाय. आता दर वर्षी दिवाळीचा पहिला दिवस आमच्यासोबतच साजरा करायचा… आणि यात कुठलीही सूट नाही बरं!”
सुधा पुढे म्हणाली, “…आणि हो, रमेशची ड्युटी रात्रीची असते ना? म्हणून मी कालच रमेशना फोन करून सांगून ठेवलं होतं, त्यांची ड्युटी आजपुरती बदलून घ्यायला आणि तुझ्यापासून हे सरप्राईज पूर्णपणे लपवायला. नाहीतर तू बाई, हे काही करूच दिलं नसतं! आणि हे बघितलं का… मायराने अगदी आवडीने तिच्या मावशीसाठी आणि आलोकसाठी खास नवीन कपडे निवडले आहेत. रमेशसाठी शेखरने हा नवीन कुर्ता घेतलाय. दिवाळी ही कोणा एकाची नसते, ती सगळ्यांची असते! चल आता पटकन, तयार हो साडी नेसून… हाच ब्लाऊज या साडीवर छान दिसेल बरं!”
लक्ष्मी सुन्न झाली. तिचे डोळे भरून आले. तिला शब्दच फुटेनात. जी गरिबी आणि हतबलता काही क्षणांपूर्वी तिच्या उराशी काचत होती, ती या मायेच्या आणि आपुलकीच्या उबेने क्षणात विरघळली होती. पैशांनी श्रीमंत असणारी घरं या जगात खूप असतात, पण मनाची श्रीमंती आणि माणसांना जपणारी मनं फक्त भाग्यवान लोकांनाच लाभतात!
हेही वाचा – दृष्टिकोन…
सगळे तयार होऊन आल्यावर मायराने आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि तिने आलोकला मांडीवर घेत प्रेमाने लाडू खाऊ घातला. रमेशच्या चेहऱ्यावरही आज पहिल्यांदाच संसाराच्या ताणातून आणि गरिबीच्या ओझ्यापासून पूर्णपणे मुक्त झालेलं एक निवांत, समाधानाचं हसू खेळत होतं…
लक्ष्मी आणि रमेशला असं आनंदाने हसताना पाहून सुधाच्या मनात एकच विचार आला — “लक्ष्मीपूजन म्हणजे नक्की काय असतं? सोन्या-नाण्यांपेक्षा आपल्या घरात येणारी आणि माणसांना जोडणारी हीच तर खरी लक्ष्मी आणि हीच आपली माणसं!”
बाहेर दिवाळीचे दिवे लुकलुकत होते आणि त्या अंधारलेल्या वाटेवरून चालत आलेल्या लक्ष्मीच्या आयुष्यात आज प्रेमाचा असा काही लख्ख प्रकाश पडला होता, ज्याच्यापुढे सोन्या-नाण्यांची आणि ऐहिक वैभवाची चकाकीही अगदी फिकी वाटत होती.


