पोंगल हा दक्षिण भारतातील (विशेषतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये) अत्यंत लोकप्रिय, पारंपरिक आणि पौष्टिक असा एक मुख्य पदार्थ आहे. हा पदार्थ दक्षिण भारतातील मुख्य सण असणाऱ्या ‘पोंगल’ (मकर संक्रांतीच्या काळात साजरा होणारा सण) या उत्सवात नैवेद्यासाठी प्रामुख्याने केला जातो. तसेच तिथल्या रोजच्या जेवणातही हा आवडीने खाल्ला जातो.
पोंगल प्रामुख्याने दोन प्रकारचा बनवला जातो: एक गोड (सक्कराई पोंगल) आणि दुसरा तिखट किंवा नमकीन (खारा किंवा वेंकट पोंगल).
दक्षिण भारतात इ.स. पूर्व 200 ते इ.स. 300 या संगम काळातील साहित्यात ‘पोंगल’ या सणाचा आणि या विशिष्ट पदार्थाचा उल्लेख आढळतो. हा मुख्यत्वे दक्षिण भारतातील (तामिळनाडू) कृषी संस्कृतीशी जोडलेला सण आहे. हा प्रामुख्याने नवीन पिकांच्या (धान, मूळ, ऊस इ.) काढणीच्या वेळी सूर्यदेव, इंद्रदेव आणि मुकुलांची (बळीराजा) कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाणारा हा सण आहे. या सणाचा मुख्य नैवेद्य ‘पोंगल’च असतो.
तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तिन्ही राज्यांत पोंगल बनवला जात असला, तरी तिथल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीनुसार त्याच्या नावांत, फोडणीच्या साहित्यात आणि सोबत दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये काही सूक्ष्म तसेच महत्त्वाचे फरक आढळतात. तामिळनाडू येथे हा पदार्थ ‘वेंकट पोंगल’ (खारा) आणि ‘सक्कराई पोंगल’ (गोड) या नावांनी ओळखला जातो. कर्नाटकमध्ये याला पारंपरिक भाषेत ‘हुग्गी’ जसे की ‘खारा हुग्गी’ आणि ‘येक्के हुग्गी’ असे म्हणतात. तर आंध्रमध्ये तिखट प्रकाराला ‘कट्टे पोंगाली’ किंवा ‘कारा पोंगल’ म्हटले जाते.
या तीन राज्यांतील पोंगल मधील मसाले आणि फोडणीत असलेला फरकही जाणून घेऊ या. तमिळ पोंगलमध्ये मूग डाळ आणि तांदूळ समप्रमाणात किंवा डाळ थोडी कमी ठेवून प्रामुख्याने काळी मिरी, जिरे, हिंग, आले आणि भरपूर साजूक तूप यावर विशेष भर दिला जातो. यात काजूची फोडणी आवर्जून असते. कर्नाटकमध्ये खारा हुग्गी बनवताना काही वेळा मिरी-जिऱ्यासोबतच थोडे खडे मसाले (जसे की लवंग किंवा दालचिनी) सुद्धा वापरले जातात. तसेच काही भागांत यात हळद घातली जाते, ज्यामुळे त्याला छान पिवळसर रंग येतो (तामिळनाडूतील वेंकट पोंगल सहसा पांढरट रंगाचा असतो). आंध्र प्रदेशच्या कट्टे पोंगालीमध्ये सुद्धा मिरी आणि जिऱ्याचा वापर मुख्य असतो, परंतु तिथे काही वेळा डाळीचे प्रमाण थोडे वाढवून तो अधिक मऊ व घट्टसर बनवला जातो.
तामिळनाडू येथे पोंगल प्रामुख्याने सांबर आणि/ किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाल्ला जातो. कर्नाटकात खारा हुग्गी प्रामुख्याने ‘हुनासे गोज्जू’ नावाच्या पारंपरिक आंबट-गोड चिंचेच्या आमटीसोबत किंवा कढीसोबत खाण्याची पद्धत आहे, जी या पदार्थाची चव आणखी वाढवते.
थोडक्यात सांगायचे तर, मूळ घटक (तांदूळ आणि मूग डाळ) तेच असले, तरी वेगवेगळ्या प्रांतांत स्थानिक मसाल्यांचा प्रभाव आणि सोबतच्या चटणी-आमटीमुळे याच्या स्वादात थोडा वेगळेपणा दिसून येतो.
हेही वाचा – Recipe : ढाबा स्टाईल लसुणी पालक!
मला साऊथमधील पदार्थांमध्ये विशेषत्वाने पोंगल हा प्रकार फार आवडतो, मध्यंतरी हम्पी येथे गेले असतांना पोंगलचे विविध प्रकार ट्राय करता आले, पोंगलचाच ‘कोरीॲन्डर पोंगल’ हा एक सुंदर चवीचा पदार्थ चाखायला मिळाला. आज मी हा पोंगल घरी करुन पाहिला! अफलातून चव आली! कशी ते खाली दिलेल्या रेसीपीमधून कळेल.
तमिळ पद्धतीचा कोरीॲन्डर पोंगल
साहित्य-
- एक वाटी चिनौर किंवा काली मुछ अथवा नेहमीच्या वापरातील कुठलाही तांदूळ, ( तांदूळ थोडा सुवासिक असेल तर उत्तम)
- एक वाटी पिवळी मूग डाळ,
- अर्धा वाटी कोथिंबीर,
- चार हिरव्या मिरच्या,
- दहा ते बारा कढीपत्त्याची पाने,
- पुदिन्याची पाने मूठभर
- एक इंच आलं बारीक चिरलेले,
- दोन टीस्पून जिरे,
- अर्धा चमचा हळद,
- आठ ते दहा मिरे,
- आठ ते दहा काजूचे तुकडे,
- चार ते पाच टेबलस्पून साजूक तूप,
- दोन टीस्पून हिंग,
- चवीनुसार मीठ
कृती
- प्रथम मूगाची डाळ आणि तांदूळ एकत्र करुन स्वच्छ धुवून घ्या
- मिक्सरवर मिरची, पुदिना, कढीपत्त्याची दहा बारा पाने, कोथींबीर, जिरे आणि थोडे पाणी यांची सरसरीत पेस्ट करुन घ्या.
- कुकरमध्ये धुतलेली डाळ आणि तांदूळ टाकून त्यामध्ये त्याच्या दुप्पटीपेक्षा थोडे जास्त म्हणजे साडेचार वाट्या पाणी घाला.
- नंतर त्यात एक टीस्पून हिंग, एक चमचा तूप, मिरची, कोथींबीरीची वाटलेली पेस्ट आणि मीठ टाकून कुकर गॅसवर मिडीयम फ्लेमवर ठेवून चार शिट्ट्या करुन डाळ तांदूळ शिजवून घ्यावे.
- कुकरचे प्रेशर गेल्यावर कुकरमधील डाळ/ तांदूळ एका पळीने छान एकत्र करून घ्या,
- दुसरीकडे एका छोट्या पॅनमधे उरलेले चार चमचे तूप गरम करुन त्यात पहिले काजूचे तुकडे तळून घ्यावे.
- नंतर त्याच तूपात एक टीस्पून जिरे, एक टीस्पून हिंग, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकून ही फोडणी काजूंसह शिजलेल्या पोंगलवर टाकून परत एकदा सर्व मिश्रण एकत्र करावे.
असा हा कोथिंबीर, पुदिन्याच्या चवीचा पोंगल शिजतानाच त्याचा सुवास सगळ्या घरामधे पसरतो. या पोंगलसोबत ओल्या खोब-याची चटणी आणि रस्सम किंवा सांबर पानामधे घ्यावे. साऊथमधे पोंगल सकाळच्या नाश्त्याकरता करतात पण आमच्या घरी पोंगल विशेषतः संध्याकाळच्या जेवणात घेतला जातो. यासोबत आमच्या घरी घट्ट गोड दही किंवा ताक, मठ्ठा घ्यायला आवडतं. एखादे वेळेस यासोबत ताकाची कढीपण केली तर या पोंगलची चव आणखी खुलते.
हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट पडवळाची आमटी आणि दोडके भात…
फक्त साध्या साजूक तुपाने आणि हिरव्यागार कोथिंबीर-पुदिन्याच्या सुगंधाने नटलेला हा पोंगल म्हणजे अस्सल दक्षिण भारतीय स्वादांचा आपल्या ताटात एकत्रित झालेला मिश्र चवींचा मिलाफचं म्हणावा लागेल!


