कधी कधी सहज टाइमपास म्हणून रद्दीच्या दुकानात वेळ घालवताना एखादे दुर्मीळ आणि सुंदर पुस्तक गवसून जाते आणि घालवलेला वेळ सार्थकी लागतो. तसेच काहीसे झाले यावेळी. मुळात राजीव खंडेलवाल हा आवडता कलाकार असल्याने, टाटा बिंजवर सर्फ करताना ‘कोर्ट मार्शल’ नावाचे एक पोस्टर दिसले. पोस्टरवर संपूर्ण लष्करी गणवेशात हाताची घडी घालून उभ्या असलेल्या राजीवचे चित्र आहे. एकतर ‘कोर्ट मार्शल’ हे नाव, लष्करी गणवेशातील नायकाचे चित्र आणि या आधी पाहिलेले तसेच प्रचंड आवडलेले ‘कोर्ट मार्शल’ या विषयावरील ‘A Few Good Men’ आणि ‘शौर्य’ हे दोन चित्रपट… यामुळे साहजिकच तिथे थबकलो. जी थोडीशी माहिती दिलेली असते चित्रपटाची त्यावरून समजले की, सवार रामचंदर या शिपाई रँकच्या व्यक्तीने कप्तान रँकच्या एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या तर दुसऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केला आहे… आणि त्यासाठी त्याचे आर्मीच्या प्रीसायडिंग कमिटीसमोर कोर्ट मार्शल करण्यात आलेले आहे. कॅप्टन बिकाश रॉय (राजीव) नावाचा एक अधिकारी त्याची केस हॅण्डल करतो आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो.
पहिला विचार मनात आला तो म्हणजे, ‘च्यामारी अ फ्यु गुड मेन’ची ही कितवी तरी भ्रष्ट कॉपी दिसतेय. चित्रपट पाहावा की, स्किप करून दुसरा शोधावा, या विचारात पडलो. पण पुन्हा मोहाने मात केली. डोळ्यासमोर जॅक निकोलसन आणि टॉम क्रुझ (कर्नल नॅथन जेस्सप आणि लेफ्टनंट डॅनियल) यांची अप्रतिम जुगलबंदी उभी राहिली. के. के. मेनन आणि राहुल बोस (ब्रिगेडियर रूद्रप्रताप सिंह आणि मेजर सिद्धार्थ चौधरी) यांच्या अफलातून अदाकारीने रंगलेला कोर्ट रूम ड्रामा उभा राहिला आणि नकळत चित्रपट सुरू केला. विचार केला – नक्कलही सही, विषय माहिती आहे, आवडीचा आहे… बघूयात झालं.
पण पहिल्या पाचच मिनिटात गैरसमज दूर झाला. हा नावाप्रमाणेच एक कोर्ट रूम ड्रामा आहे. संपूर्ण चित्रपट एकाच रुममध्ये घडते. समोर न्यायाधिकारी कमिटी, एक आरोपी, समोर समोरासमोर चार – चार अश्या एकूण आठ खुर्च्या मांडलेल्या, त्यावर बसलेले आर्मी ऑफिसर्स आणि दारातला एक सेंट्री, बस इतकाच तामझाम.
सुरुवातीला सरकारी वकील (इथे आर्मीचे वकील) कर्नल पुरी आपलं ओपनिंग स्टेटमेंट मांडताना वारंवार आरोपीचा उच्चार जवान रामचंदर असा करतात, ज्याला आरोपीचा वकील बिकाश अर्थात आपला नायक आक्षेप घेतो आणि सांगतो की, रामचंदरची रँक सवार आहे जवान नाही, तेव्हा त्याचा उल्लेख सवार असाच करावा. माहितीसाठी म्हणून, जवान ही रँक आर्मीतल्या शक्यतो पायदळातील सर्वसामान्य कर्मचारी वर्गासाठी वापरली जाते. मग त्यात अगदी आर्मी मेसमध्ये काम करणाऱ्या खानसाम्यापासून ते हवालदार, सुभेदार या सर्व कॅटेगरीज देखील येऊ शकतात. तर, सवार ही देखील आर्मीतील सर्वात खालच्या दर्जाची पण बखतरबंद, सशस्त्र शिपायाची कॅटेगरी आहे. पूर्वीच्या घोडदळातील ‘घोडेस्वार’चे ‘सवार’ झालेले आहे. इथे सर्वात प्रथम अंदाज येतो की, चित्रपट ‘A few good men’ची अजून एक आवृत्ती नसून विषय काही वेगळाच आहे.
हेही वाचा – ‘तहादेर कथा’… आदर्शांच्या मृत्यूची कथा
पुढच्या हियरिंग्जमध्ये कळून चुकते की, कॅप्टन मोहन वर्मा आणि कॅप्टन बी. डी. कपूर बुलेटवरून कॅम्पमध्ये शिरतात आणि शिरत असताना ड्युटीवर असलेला सवार रामचंदर त्यांच्यावर गोळ्या झाडतो. कॅप्टन वर्मा जागच्या जागी ठार होतात, तर कॅप्टन कपूरना गोळी निसटती चाटून जाते आणि ते वाचतात. लगेच रामचंदरला ताब्यात घेतले जाते आणि आवश्यक कारवाईनंतर त्याला कोर्ट मार्शलसाठी हजर केले जाते.
इथून पुढे नाट्य रंगत जाते. आपल्या डोळ्यावर आणि मनावर ‘शौर्य’ किंवा ‘A few good men’ची जादू अजून असते. आपण हे दोन्ही चित्रपट डोळ्यासमोर ठेवून पुढचे अंदाज करायला लागतो आणि प्रत्येक टप्प्यावर चित्रपट धक्के देत जातो. भारतीय सैन्यदलातील काही महत्त्वाच्या उणिवांवर नेमके बोट ठेवत चित्रपट एका फार महत्त्वाच्या समस्येला हात घालतो. चित्रपट संपतो तेव्हा आपण सुन्न झालेलो असतो.
हेही वाचा – माझ्या पोतडीतला मदन मोहन…
यात फार काही लक्षवेधक डायलॉग नाहीयेत, फार मोठे असे काही रहस्य नाहीये किंवा फार महान असे दिग्दर्शनही नाहीये. गद्दारी, स्पायिंग किंवा देशद्रोह अशा चावून चावून चोथा झालेल्या विषयाची पुनरावृत्ती देखील नाहीये. पण तरीही आपण पाहात राहतो. चित्रपट संपताना काय होते? रामचंदरला काय शिक्षा होते? सत्य काय असते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिथेच घेतलेली बरी.
फार काही अपेक्षा ठेवू नका. पण एक मात्र नक्की की संपता- संपता चित्रपट आपल्याला अंतर्मुख करून जातो. सौरभ श्रीवास्तव या नव्या दमाच्या दिग्दर्शकाचा हा अवघ्या 96 मिनिटांचा चित्रपट. संगीत, गाणी वगैरे काहीही नसून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा एक विलक्षण अनुभव.
Z5 या वाहिनीवर हा चित्रपट उपलब्ध आहे.


