नेहमीप्रमाणेच एक यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्टर वरद ऑपरेशन रूममधून बाहेर आले. आजची शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती आणि पेशंट कोणी सामान्य माणूस नव्हता, तर तो होता त्यांचा जिवलग मित्र डॉक्टर राज! शस्त्रक्रिया सुरू असताना राजची कन्या नेहा लगतच्या प्रतीक्षागृहात बसली होती.
“नेहा, तुझ्या बाबांचं ऑपरेशन यशस्वी झालं. अगं, आज माझा जीव टांगणीला लागला होता. खूप टेन्शन होतं. आज मला कोणत्याही परिस्थितीत हरायचं नव्हतं!”
नेहा आश्चर्याने डॉक्टरांकडे पाहत म्हणाली, “काका, तुम्ही आजपर्यंत केलेली सर्व ऑपरेशन्स यशस्वी झाली आहेत, मग आज कसलं एवढं टेन्शन होतं?”
डॉक्टर वरद तिच्या शेजारी बसले. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, “ऐक नेहा. ही गोष्ट आहे माझी, तुझ्या बाबांची आणि आमच्या आयुष्यभर चाललेल्या पहिल्या-दुसऱ्या नंबरच्या शर्यतीची…
राज आणि मी लहानपणापासूनचे जिवलग मित्र. वर्गात एकाच बाकावर बसणारे, दोघेही अभ्यासात हुशार. पण राज कायम पहिला आणि मी दुसरा! परीक्षेचा निकाल ठरलेला असायचा — राज पहिला, वरद दुसरा!
मी खूपदा राजला विचारायचो, “अरे, तू कायम पहिला कसा येतोस? मला कधीतरी पहिला नंबर मिळू दे की!”
राज हसत म्हणायचा, “अभ्यास जरा जास्त कर ना! मी तुला अडवलंय का?”
“अभ्यास मी खूप करतो. पण तुझा पहिला नंबर काही माझ्या वाट्याला येत नाही.”
“काळजी करू नकोस. दुसरा नंबरही वाईट नसतो!”
हेही वाचा – ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य
त्याचं हे वाक्य ऐकून मी कधी कधी त्याला प्रेमाने धपाटाही घातला आहे.
एकदा शिक्षकांनी वर्गात विचारलं, “मोठेपणी कोण काय होणार?”
राज म्हणाला, “मी डॉक्टर होणार!”
मीही तितक्याच उत्साहाने म्हणालो, “मीही डॉक्टर होणार!”
शिक्षक हसून म्हणाले, “वा! म्हणजे रुग्णांनाही पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या डॉक्टरांचा पर्याय मिळणार!”
संपूर्ण वर्गात हशा पिकला. राजने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले. मीही हसत त्याच्या पाठीवर थाप मारली.
आमची शर्यत फक्त परीक्षेपुरती नव्हती. वक्तृत्व स्पर्धा असो, निबंधलेखन असो किंवा चित्रकला स्पर्धा, राज माझ्या पुढेच असायचा; पण आमच्या मैत्रीत कधी स्पर्धेचा कटूपणा नव्हता. आम्ही दोघांनी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. अभ्यास केला, मेहनत घेतली आणि दोघांनाही वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळाला… तिथेही मी दुसरा!
राज बालरोगतज्ज्ञ झाला, तर मी हृदयशल्यविशारद. पुण्याच्या इस्पितळात नोकरीची ऑफर माझ्याआधी त्याला मिळाली. त्याचं जॉइनिंग माझ्याआधी, लग्न माझ्याआधी, स्वतःचं घर माझ्याआधी आणि दोघांच्या घरी नवा पाहुणा आला, पण तिथेही त्याने बाजी मारली. एवढंच काय, पण या जीवनाच्या रंगमंचावरदेखील हा पठ्ठ्या माझ्या आधीच दाखल झाला होता.
आता शाळेतल्या पहिल्या-दुसऱ्या नंबरच्या शर्यतीचं रुपांतर आयुष्यातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांत झालं होतं. राज लहान मुलांच्या आजारांवर उपचार करणारा आणि मी माणसांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणारा…
आमच्या व्यवसायातही आमची मैत्री कायम आहे. राज त्याच्या ओळखीच्या कोणाला हृदयविकाराचा त्रास असल्याचं लक्षात आलं की, मला फोन करतो आणि माझ्या ओळखीच्या एखाद्या कुटुंबाला मुलांच्या उपचारांसाठी मदत हवी असेल, तर मी राजकडे पाठवतो.
काही दिवसांपूर्वी राजची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीला त्याला थकवा जाणवत होता. नंतर छातीत दुखू लागलं. तपासण्या केल्यावर त्याच्या हृदयाची अवस्था गंभीर असल्याचं लक्षात आलं. त्याच्यावर जोखमीची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. राज माझा जिवलग मित्र असल्यामुळे त्याच्या प्रकृतीची काळजी मला वाटत होती. तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुला त्याच्या प्रकृतीबद्दल सर्व काही सांगितलं नाही.
डॉक्टर म्हणून मी अशा अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या. कठीण प्रसंगांना सामोरं गेलो होतो. रुग्णाच्या नातेवाइकांना धीर दिला होता. पण यावेळी रुग्ण माझा जिवलग मित्र होता… शस्त्रक्रियेच्या दिवशी तू मला विचारलं, “काका, बाबा बरे होतील ना?”
त्या प्रश्नाचं उत्तर “हो” असं देताना माझ्या मनात अनेक विचार आले. डॉक्टर म्हणून मला परिस्थितीचं गांभीर्य माहीत होतं. राजला काही झालं तर? ही कल्पनाही सहन होत नव्हती.
शस्त्रक्रियेची तयारी सुरू झाली. ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी मी राजकडे पाहिलं. तो हसला.
“वरद, का एवढी धावपळ करतोस? घेऊ दे मला या रंगमंचावरून एक्झिट, तुझ्या आधी!”
मी त्याचा हात हातात घेतला आणि त्याला सांगितलं, “गप्प बस! तू पेशंट आहेस आणि मी डॉक्टर.”
तो फक्त हसला.
शस्त्रक्रिया सुरू झाली. मी माझं संपूर्ण लक्ष कामावर केंद्रित केलं. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. वैद्यकीय कौशल्य, अनुभव आणि संयम यांची कसोटी लागली होती. शस्त्रक्रिया करताना माझ्या डोळ्यांसमोर आमच्या बालपणीच्या आठवणी तरळत होत्या. शाळेतला एकच बाक, एकमेकांचे डबे, परीक्षेचे निकाल, आमचे वाद, आमचं हसणं… आणि आज त्याच मित्राचं हृदय माझ्या हातात होतं.
मी स्वतःला सावरलं. त्या क्षणी भावनेपेक्षा कर्तव्य महत्त्वाचं होतं. माझ्या मनात एकच विचार आला—राजला माझ्या आधी जायचंय? नाही! यावेळी तरी त्याला पहिला नंबर मिळू द्यायचा नाही. मला त्याला वाचवायचंच आहे!
चार तासांच्या प्रयत्नांनंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मी सुटकेचा मोठा श्वास घेतला. माझ्या टीमच्या चेहऱ्यावरही समाधान उमटलं.
राजला अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर होण्यासाठी पुढील काही तास महत्त्वाचे होते.
मी नेहाला म्हणालो, “राजची प्रकृती स्थिर होईपर्यंत मी तुझ्यासोबतच थांबणार आहे.”
हे सर्व ऐकून नेहाच्या डोळ्यांत पाणी आलं. तिने डॉक्टर वरदचा हात घट्ट धरला आणि ती म्हणाली, “काका, मला हे सर्व नवीन आहे. मला तुमच्या शर्यतीची काहीच कल्पना नव्हती.”
वरद तिच्याकडे पाहत म्हणाला, “नेहा, आज शर्यत नव्हतीच. मला फक्त माझा मित्र हवा होता. त्याच्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ उरला नसता. म्हणून मला हरायचं नव्हतं ते जिंकण्यासाठी नाही, तर माझ्या मित्राला वाचवण्यासाठी!”
नेहा शांतपणे ऐकत होती. तिने डॉक्टर वरदच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि अश्रूंना वाट करून दिली.
काही वेळाने राजने बोटांची हालचाल केली आणि हळूहळू डोळे उघडले. त्याला शुद्धीवर आल्याचं पाहून वरद आणि नेहा दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद पसरला.
हेही वाचा – रिटर्न गिफ्ट
पुढील काही दिवसांत राजची प्रकृती सुधारू लागली आणि प्रकृती पूर्णपणे स्थिर झाल्यानंतर त्याला इस्पितळातून घरी सोडण्यात आले.
दोन आठवड्यांनी वरद राजच्या घरी आला, तेव्हा राजने वरदला नेहमीच्या खोडकर आवाजात विचारलं, “वरद, यावेळी मात्र तू मला पहिला नंबर मिळवू दिला नाहीस!”
वरद हसत म्हणाला, “अरे, इतकी वर्षं तू मला दुसऱ्या नंबरवर ठेवलंस, म्हणून तुला पहिल्या नंबरपासून दूर ठेवायचं होतं मला.”
नेहा म्हणाली, “बाबा, आता तुम्ही दोघांनीही पहिला नंबर विसरायचा, कारण तुम्ही दोघंही आम्हाला हवे आहात.”
राजने चमकून विचारलं, “नेहा, तुला पहिल्या नंबरचा प्रकार समजला की काय? आणि आम्ही दोघं कोणाला हवे आहोत?”
“मला आणि त्याला…” असं म्हणताना नेहा लाजली. मग हळूच म्हणाली, “आम्ही दोघं दोन महिन्यांपूर्वी एका संगीत कार्यक्रमात भेटलो आणि…” पुढे बोलताना ती आणखी लाजली.
वरदसोबत आलेल्या त्याच्या मुलाने होकारार्थी मान हलवली. राज आणि वरद यांनी एकमेकांकडे पाहिलं. आपल्या मुलांच्या मैत्रीचं रूपांतर नात्यात होणार असल्याचं समजताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
राज म्हणाला, “वरद, आता आपली शर्यत संपली!”
वरदने राजचा हात घट्ट पकडला आणि तो म्हणाला, “हो राज! आता पहिला किंवा दुसरा नंबर महत्त्वाचा नाही. महत्त्वाची आहे आपली मैत्री आणि आपल्या मुलांमुळे निर्माण झालेलं हे नवीन नातं!”
आयुष्यभर पहिल्या-दुसऱ्या नंबरसाठी धावणाऱ्या त्या दोन मित्रांची शर्यत अखेर संपली होती. त्यांच्या मुलांनी निर्माण केलेलं नातं आता जिंकण्यासाठी नव्हतं, तर आयुष्यभर जपण्यासाठी होतं.
राज आणि वरद एकसुरात म्हणाले —
खेळ असा आम्ही खेळणार
ज्यात कोणी नाही हरणार
विजय होणार दोघांचा
आनंद कृतकृत्य होण्याचा


