अध्याय पंधरावा
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें । वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूचीं ॥1॥ ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रियकुड्मुळी । भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों ॥2॥ अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ ।ते लागलेसे अबोट । चंदनाचें ॥3॥ प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें । लेवऊं सुकुमारें । पदें तियें ॥4॥ घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी । तिये घालूं जोडी । आंगोळिया ॥5॥ आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ । तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी ॥6॥ तेथे अहं हा धूप जाळूं । नाहंतेजें वोवाळूं ।सामरस्यें पोटाळूं । निरंतर ॥7॥ माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण । करूं भोगमोक्षनिंबलोण । पायां तयां ॥8॥ इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा । जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे ॥9॥ ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी । जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु ॥10॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : माझें पैलपण जाये, भक्त हें ऐलपण ठाये
अर्थ
आता आपल्या शुद्ध अंत:करणाचा चौरंग करून त्यावर श्रीगुरूंच्या पावलांची स्थापना करू. ॥1॥ श्रीगुरु व आपण एक आहोत, अशा ऐक्यतेच्या समजूतरूपी ओंजळीत संपूर्ण इंद्रियरूपी कमळकळ्या भरून, त्या पुष्पांजळीचे अर्घ्य श्रीगुरुच्या चरणांवर देऊ. ॥2॥ एकनिष्ठतारूप स्वच्छ पाण्याने स्नान घालून, श्रीगुरूंच्या विषयी असलेली वासना, तेच श्रीगुरूंस (अनामिका नावाचे) गंधाचे बोट लावू. ॥3॥ (श्रीगुरुंविषयीचे) प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागर्यांचे वाळे सद्गुरुंच्या सुकुमार पायात घालू. ॥4॥ अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरुंविषयीचे दृढ प्रेम, हीच कोणी जोडवी, ती सद्गुरूंच्या पायांच्या अंगठ्यात घालू. ॥5॥ आनंदरूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी, हेच कोणी एक आठ पाकळ्यांचे कमळ, ते सद्गुरुंच्या पायावर वाहू. ॥6॥ देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहंवृत्ती, हाच कोणी एक धूप, तो श्रीगुरुचरणांजवळ जाळू. या देहादिकांपैकी मी कोणी नाही, अशी जी एक उत्पन्न झालेली निरभिमान बोधवृत्ती, हेच कोणी तेज, त्या तेजाने श्रीगुरुंस ओवाळू व त्या सद्गुरुचरणांस तदाकारतेने नेहेमी आलिंगन देऊ. ॥7॥ श्रीगुरुंच्या दोन्ही पायांत माझे शरीर व प्राण (स्थूलदेह व लिंगदेह) या दोन खडावा करून घालू व ऐहिकपारत्रिक भोग व मोक्ष हे श्रीगुरुचरणांवरून उतारा म्हणून ओवाळून टाकू ॥8॥ ज्याच्या योगाने धर्म, अर्थ, काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो, त्या दैवास, या श्रीगुरुंच्या चरणांच्या उपासनेने आम्ही योग्य होऊ. ॥9॥ ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणची विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते ॥10॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं मंडळ आणि चंद्रमा, दोन्ही नव्हती सुवर्मा


