आम्ही पाच-सात मित्र एका कॅफेमध्ये बसलो होतो. मी ‘रंगात’ येऊन एक गोष्ट सांगत होतो अध्यात्म्याबाबत…
“एक राजा असतो. अत्यंत चैनीत, विलासात राहणारा… शौकीन… त्याच्याकडे उत्तमोत्तम प्रकारचे मद्य होते. तो अनेक पशू-पक्ष्यांचे मांस खायचा… अनेकविध फळांचा रस चाखायचा… अनेक सुंदर स्त्रियांशी रममाण व्हायचा… त्याचा एक सुंदर महाल होता आणि वरती त्याचा शयनकक्ष. तो रात्री झोपायला जायचा, तेव्हा प्रत्येक पायरीवर एक सुंदर स्त्री उभी असायची. आधारासाठी तिच्या खांद्यावर हात ठेऊन तो वरची पायरी चढायचा…”
“हा राजा कुठला रे?” एका मित्राने विचारले.
“कुठला ते माहीत नाही… तर पुढे असे झाले की, या भोगविलासाचा अतिरेक झाल्याने…” मी पुन्हा सांगायला सुरुवात केली.
“तो महाल असेल का रे आता? ” दुसरा मित्र अगदी सीरियसली म्हणाला.
हेही वाचा – प्रेमळ रजिया आपा अन् शीर खुर्मा
“राजाच माहीत नाही, तर त्याचा महाल कुठे माहीत असणार? तर, मी काय सांगत होतो की, भोगविलासाचा अतिरेक झाल्याने….” मी पुन्हा सुरुवात केली.
“तो जिना एकदा बघायचा होता रे…” अजून एक मित्र बोलला.
“अरे, कसा सापडणार तो जिना? राजा माहीत नाही, तर महाल आणि जिना कसे माहीत होणार? सोड ते… तर, राजा भोगविलासाच्या अतिरेकांमुळे विटला, त्याची मनःशांती हिरावली गेली आणि पुढे तो अध्यात्माकडे…”
“मी काय म्हणतो विवेक? त्याचे जिन्यावर चढत असतानाचे तैलचित्र तर असेल ना, कोणीतरी चित्रकाराने काढलेले! ते बघायला मिळाले असते तर आम्हालाही मनःशांती मिळाली असती…” अजून एक मित्र अगदी कातर आवाजात म्हणाला.
हेही वाचा – कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…
मी गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न सोडून दिला. असे मित्र असल्यावर कसलं अध्यात्म आणि कसले काय?
तर मित्र हो, तुम्हाला माहीत आहे की, तो जिना कुठे आहे?
Sorry, तो राजा कोण आहे?
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H
या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.


