लेक म्हणते…
रात्री का हो लवकर झोपता?
दोन-तीन वाजता झोपण्यात गंमत असते,
बारा वाजता swiggy वरून pastry मागवण्यात मौज असते.
तो आनंदही घेऊन बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
रोजच काय हो सहाला उठता?
जरा दहा-अकरा वाजेपर्यंत झोपून तर बघा,
लोळत पडण्यातला आनंद घेऊन तर बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
पोहे, उपमा, थालीपीठच रोज काय खाता?
Corn flakes नाहीतर Oats खाऊन तर बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
सकाळी उठून चालायला जाता,
हलकाफुलका व्यायाम करता,
जरा अंथरुणातच व्यायाम करून तर बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
सकाळीच आंघोळ का हो करता?
रात्रीची आंघोळ सुखाची असते,
वेळेच्या बंधनाची नसते.
तशी छान आंघोळ करून बघा,
बाबा जरा आमच्या सारखं जगून तर बघा!!
हेही वाचा – न्याहारी… लेकीच्या हातची सुखावणारी!
फेसबुकवर लिहिता, नवे स्नेही जोडता,
जरा इन्स्टावर रील टाकून तर बघा,
हजारो Views घेऊन तर बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
लता, किशोर, आशा आणि मुकेशच काय ऐकता?
पॉप आणि रॅप ऐकून तर बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
वरण-भात भाजीपोळी तर नेहेमीच खाता,
जरा पिझ्झा, नूडल्स, बर्गर आणि पास्ता खाऊन तर बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
वायरवले जुने इअरफोन्स वापरता,
गुंडाळून नीट डबीत ठेवता,
ब्लू टूथ पॉडस वापरून तर बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
खिसा आणि कॉलरवाला टी-शर्ट,
पारंपरिक जीन्स घालता,
जरा राऊंड नेक वाला टी-शर्ट घालून तर बघा,
विटलेली जीन्स वापरून तर बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
‘एक्सप्रेस-वे’ला 80च्या वेगाने,
डावीकडच्या लेनमध्ये गाडी चालवता,
100-110च्या सुसाट वेगाने ओव्हरटेक करून तर बघा
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!
मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पाहताना,
पॉपकॉर्नची किंमत बघून,
नको ते पॉपकॉर्न असं का म्हणता?
जरा मुक्तपणे पैसे उधळून तर बघा,
काटकसर जर बाजूला ठेवून तर बघा,
बाबा जरा आमच्यासारखं जगून तर बघा!!
नको गं पोरी, चुकतंय कुठेतरी, काहीतरी.
राहूनराहून सांगावंसं वाटतं,
या जगण्याला भुलू नका,
रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करू नका,
उतू नका, मातू नका,
परंपरांचा वसा टाकू नका…
कधीतरी, अगदी कधीतरी,
आमच्यासारखं साधसुधं जगून तर बघा…


